Sunday 30 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ११ (a) ...

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र
द्वितीय विवाहानंतर

      इ स १९२० डिसेंबर ला डॉ संतांची फिरती नोकरी संपून त्यांची नेमणूक बिलासपूर येथील तुरुंग व पोलीस हॉस्पिटल मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून झाली. इ.स. १९२२ मध्ये त्यांच्या जीवनात एक महत्वाची घटना घडली - ती म्हणजे , त्यांच्या मामे बहिणीशी त्यांच्या हस्ते माझा विवाह मुंबई येथे २० मे १९२२ मध्ये झाला. तिचे नाव सौ चंद्रिका ठेवण्यात आले आणि विज्ञान जनात तिला आज फार महत्वाचे स्थान आहे.
      इ स १९२० पासून १९५६ पर्यंत  सर्व जीवन बिलासपुरताच व्यतीत झाले. सन १९२४ मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन बिलासपूरलाच खाजगी प्रॅक्टिस सुरु केली. त्यावेळी त्यांच्या सर्व हितचिंतकांनी ह्या गोष्टीस मोडता घातला कारण,  बिलासपूर सारख्या मागासलेल्या गावी ह्यापूर्वी ज्या काही डॉक्टरांनी खाजगी दवाखाने घातले होते ते २-४ महिन्यातच गुंडाळून त्यांना आपले चंबूगबाळे आवरावे लागले होते. कारण तो प्रांत व जिल्हा जवळ अत्यंत मागासलेला होता. जनतेस इंग्रजी औषधे वापरण्याचा सराव नव्हता. परंतु डॉ संतांनी एकदा केलेला निश्चय मागे घेतला नाही. सरकारी नोकरी सोडून खाजगी दवाखाना घालून जीवन व्यतीत करण्याचा पक्का निश्चय होण्याचे कारण हेच होते कि , सरकारी नोकरीत नेहेमी बदल्या होत असत . त्यांच्या मातोश्रींची प्रकृती नेहेमीच उदार विकाराने त्रस्त असे , वडिलांचे हि वय होत चालले होते. मातृसेवा व पितृसेवेचे ध्येय सरकारी नोकरीत राहून सिद्ध होणे फार कठीण असे. म्हणून एकाच ठिकाणी राहून आपल्या व्यवसायाने त्यांची सेवा घडावी - हाच नोकरीचा राजीनामा देण्यामागील उद्देश होता.
      बिलासपूर हे शहर डॉ संतांसारख्या पुण्यामुंबईकडील महाराष्ट्रीयास आपले नित्याचे व्यवसाय स्थान बनविणे , पसंत पडण्यासारखे नव्हते. पाण्याचे नळ , विजेचा प्रवाह, मोटारीची रहदारी इत्यादी आधुनिक सुखसोयी त्या वेळी तिथे नव्हत्या. तेथील महाराष्ट्रीय म्हणविणारी जनता, छत्तीसगडी जनतेच्या मानाने अतिशय अल्प प्रमाणात होती आणि त्यांच्यात महाराष्ट्रीयत्वाचा अभिमान व संस्कृतीही मुळीच नव्हती. त्यांना शुद्ध मराठी बोलता येत नसे. हिंदी मिश्रित नागपुरी बोलीत ते मराठी बोलत असत. त्यांची सोदाहरण व्यवहाराची भाषा बहुतांशी हिंदी च असे. खाजगी डॉक्टरी व्यवसाय सुरु करणाऱ्या डॉक्टरांना तिथे अपयश येत असे. अशा प्रकारचा बिलासपूरचा इतिहास प्रसिद्ध होता.
      डॉ संतांचा स्वभाव मुळात प्रवाहपतित होण्याचा नव्हता, पण प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन तिला स्वतःच कर्तबगारीने अनुकूल बनविण्याचा त्यांचा स्वभाव असल्यानेच , त्यांनी बिलासपूर हे शहर खाजगी व्यवसायाकरिता निश्चित केले. दुसरे कारण म्हणजे त्यावेळी, बिलासपूरमध्ये अन्नधान्याची स्वस्ताई कमालीची असे. त्यांच्या जवळ धनसंचय फार थोडा होता. महाराष्ट्रातील इतर शहरात व्यवसाय त्यांनी सुरु केला असता तर , तो जमवून कुटुंब पोषणास पुरेशी मिळकत होई पर्यंत पुरेल , इतका धनसंचय त्यांच्याजवळ नव्हता. म्हणून स्वस्ताई असलेले बिलासपूर  - पण आप्तांपासून दूर त्यांनी मातृसेवा व पितृसेवेच्या ध्येयाने पसंत केले. नोकरीच्या निमित्ताने जवळ जवळ ३ वर्षे त्यांना  बिलासपूरी राहण्याची संधी मिळाली. तुरुंग व पोलीस खात्यातील डॉ म्हणून त्यांना खाजगी प्रॅक्टिस करता येत नव्हती तरी शहरातील महाराष्ट्रीय व इतर  त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे डॉक्टर ह्या नात्यामुळे येत असे. म्हणून बिलासपूरलाच प्रॅक्टिस सुरु करण्याचा हा निश्चय त्यांनी त्यांनी पक्का केला आणि १९२४ मध्ये त्यांनी खाजगी दवाखाना उघडला.
     पहिल्या ६ महिन्यांचे त्यांचे उत्पन्न अत्यंत संतोषजनक ठरले. बिलासपुरास खाजगी डॉक्टरांचा उदरनिर्वाह होत नाही , ह्या  समजुतीला त्यांनी जबरदस्त धक्का दिला. त्यांचे डॉक्टरी धंद्यातले ज्ञान रोग्यांशी व रोग्याच्या कुटुंबातील माणसांशी आपुलकीने वागण्याची पद्धत , गरीब रोग्यांची विनामूल्य सेवा व त्यांचे उच्चनैतिक आचरण , सहानुभूतीयुक्त प्रेमळ स्वभाव इत्यादी उत्तम गुणांनी त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीचा  होऊ लागला . तो काही कालानंतर इतका वाढला कि सन १९२९ मध्ये त्यांनी आपले स्वतःचे भव्य घर प्रमुख रस्त्यावर बांधून तिथेच एक मोठा दवाखाना व घरातील सर्व मंडळींची राहण्याची सोय केली.
      डॉ संत दिवसरात्र आपल्या व्यवसायात गुंतलेले असले तरीही समाजकार्यात पुढे भाग घेत. रायगडला एका प्रसंगी महानदीला अचानक महापूर आला होता , त्यावेळी डॉ संत इतर समाज नेत्यांसह लोकांना मदत करण्यास व उपचारासाठी धावून गेले होते. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात देश सेवेच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील डॉक्टर लोकांनी इंग्रजी सेनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहन पर भाषणे देण्यासाठी डॉ संतांनी मध्य प्रांतांचा सर्व विभागांचा दौरा काढला. त्यांचे हे वागणे त्यावेळच्या मध्य प्रदेशच्या सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्यांना "रावसाहेब" हा सन्माननीय 'किताब अर्पण करण्यात आला. बिलासपूर जिल्ह्याच्या रेडक्रॉस शाखेचे मंत्रिपद तेथील सिव्हील सर्जन व डेप्युटी कमिशनर ने त्यांच्याकडे सोपविले. रेडक्रॉसच्या २२ जिल्ह्यातील मंडळींची बिलासपूर ला डॉ  नेहेमी ये जा असे. ऑल इंडिया मेडिकल प्रॅक्टिशनर्स डॉक्टर्स अससोसिएशन च्या मध्य प्रांतीय शाखेचे अध्यक्ष स्थानी ते निवडून  होते. सण १९३२ ते १९५६ पर्यंत ते अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. त्याचप्रमाणे मध्यप्रांतीय मेडिकल एक्झामीनेशन बोर्ड , मध्यप्रांतीय नर्सेस असोसिएशन, रेडक्रॉस कमिटी इ. अनेक मेडिकल संस्थेतून ते काम करत असत व आपली खाजगी प्रॅक्टिस सांभाळून अनेक प्रकारची राष्ट्रउपयोगी व जनकल्याणकारी कार्ये तन ,मन ,धन अर्पून करत असत. ह्या सर्व कामानिमित्ताने त्यांना नागपुरास यावे लागले तरी हे सर्व ते अतिउल्हासाने व प्रेमाने करत असत.
      डॉ संतांची मेडिकल प्रॅक्टिस वरच्या स्तराची असे. शास्त्रात लागणाऱ्या नित्य नवीन शोधांचे ज्ञान असावे म्हणून त्यांनी स्वतःची लायब्ररी अगदी अपटुडेट मेडिकल पुस्तकांनी संग्रहित केली होती. ह्या सर्व पुस्तक संचयाची किंमत पाच हजार रुपयांहून अधिक जास्त होती. ते, रोगाचे निदान - रक्त , मूत्र, लघवी , थुंकी, मल इ.ची परीक्षा आणि तपास मायक्रोस्कोप ने करून निश्चित करत असत. त्यावेळच्या बिलासपूरच्या कोणत्याच खाजगी डॉक्टर जवळ अश्या प्रकारच्या तपासणी करण्याची साधने नव्हती, म्हणून इतर डॉक्टर त्यांच्या लॅबोरेटरीचा उपयोग करून घेत असत व त्यांना consult करीत असत. त्यावेळेला अश्या प्रकारची तपासणीची साधने पूर्णतः सरकारी दवाखान्यातूनही नसत , म्हणून डॉ संत आपली लॅबोरेटोरी सर्व साधनसामुग्रीने परिपूर्ण ठेवून चालवीत असत.  तपासणीबद्दलचे मूल्य त्यांना साधारण रोग्यांकडून क्वचितच प्राप्त होत असे. तरीपण सर्व प्रकारच्या परीक्षा व आवश्यक तपासणीत ते भेदभाव न करता पूर्णतः करत असत.
तात्पर्य, हे कि त्यांचे नाव उत्तम चिकित्सक वैद्य व उत्तम नेत्र शल्य चिकित्सक म्हणून दिवसेंदिवस वाढू लागले . त्याच प्रमाणात संपत्ती व कीर्तीची व कुटुंबाचीही वृद्धी होत गेली.


(क्रमशः ) 



     
      

No comments:

Post a Comment