मी व माझे सदगुरु

मी रसिका राहूल संत, कॉमर्स ची पदवी घेतली आणि वर्ष भरायच्या आतच लगेच लग्नाच्या सुंदर बेडीत अडकले!! शालेय शिक्षण G.E.S H.A.L High School, ओझर टाऊनशिप, नासिक येथे आणि BYK College of Commerce, Nasik येथे पदवी चे शिक्षण पूर्ण केले.  

लहानपणापासूनच अंतर्मुख स्वभाव, स्वत:तच रमायची जास्त आवड, खूपच कमी मैत्र परिवार, स्वयंपाकाची जास्त आवड नाही. पण जे पदार्थ करेन ते मनापासून. कार्यालयीन कामाची जास्त आवड. देवाच्या अस्तित्वास जास्त मानलं नाही. त्यामूळे गुरू - सद्गुरू ह्यांचा माझ्याशी संबंधच नाही. 

२७ ऑक्टोबर २००५ रोजी डॉ अनिरूद्ध (बापू) धैर्यधर जोशी यांच्या कार्याशी ओळख झाली ती कायमचीच!!

बापू ज्या सहजतेने, ते कुठल्या ही विषयावर साधे सरळ सोपे मार्गदर्शन करतात ह्याकडे मी जास्त आकर्षित झाले. विनाकारण कुठलेही मुद्दे मांडत नाहीत. अगदी सामान्यतला सामान्य व्यक्ती सहजरित्या मान्य करेल, अशी उदाहरणे देऊन एखादी कठीण वाटणारी गोष्ट सोप्पी करुन सांगतात. 

ह्याशिवाय प्रत्येक गोष्टीकडे 'डोळस" वृत्तीने पहाणे, हे मी माझ्या बापूंकडून शिकले. बापूंच्या कार्यात जसजसे गुंतत गेले तशी आजपर्यंत आपण किती अंधारात वावरत होतो, ह्याची हळूहळू जाणीव होऊ लागली. 
भक्ती व सेवेद्वारे दीन -दुबळ्या, असहय्य पिडीतांची सेवा करून स्वत:चे प्रारब्धभोग संपवण्याची मला दिलेली एक अनमोल संधी  बापूंनी त्यांच्या श्रद्धावान भक्तांना दिली आहे. "अनिरूद्धाज इंस्टीट्यूट ऑफ ग्रामविकास" द्वारे कमीत कमी जागेत स्वत: सेंद्रीय शेती कशी करावी, शिवाय गोविद्यापिठम् येथे "सेंद्रीय शेती व पशुपालनाचे कोर्स" करून आपल्या आजूबाजूस असलेल्या पिडीत शेतकर्यांना नवीन वाटा दाखवतात. 

माझे बापू फक्त अध्यात्मिक ज्ञानच् देत नाहीत तर, स्वत: एक योद्धा आहेत. प्राचीन बलविद्यांचे फक्त पुरूषांनाच नाही, तर स्त्रीयांनादेखील स्वसंरक्षणासाठी 'बल' चे धडे देऊन, रडत न बसता परिस्थितीशी दोन हात करायला शिकवतात. स्त्रीयांनी रिकाम्यावेळी स्वत:च्या कलाकुसरींनी सदुपयोग करून घ्यावे, यासाठी 'आत्मबल' सारखी वार्षिक शिबीरांचे आयोजन करतात. माझ्या सद्गुरूंकडे मी "मानवता" शिकले. आपल्या वागणूकीतून इतरांना सत्य प्रेम आनंद कसा द्यायचा हे शिकले. 

"जिथे आहेस तिथूनच सुरूवात कर, कारण आपण दोघे मिळून अशक्य असे ह्या जगात काहीच नाही कारण मी तुला कधीच टाकणार नाही आणि हळूहळू माझा बापू माझ्यासाठी सर्वकाही नीट करतंच आहे" ही त्यांची ग्वाही माझ्या जगण्याचा 'आधारस्तंभ' आहे.

'श्री साईसत्चरित्र 'या अपौरूषेय ग्रंथावर आधारित परिक्शा देऊन बापूंनी माझा अध्यात्म व विज्ञानाचा संबंध समजाऊन सांगितला आणि खरंच ह्यातली गोडी व विचारशक्ती वाढवली. 
कॉलेज जीवनात NCCतले अपूर्ण राहीलेले स्वप्न बापूंनी AADM द्वारे जणू पूर्णच केले आहे. शिवाय Rescue Methods आणि First Aid and CPRचे प्रशिक्शण देऊन शिकवण्याची आवड पूर्ण केली. सतत काहीतरी नवीन करण्याच्या आवडीमूळे सत्संगात हिरीरीने सहभागी करून घेतले. "इच्छा व करण्याची जिद्द असेल तर  अशक्य असे काहीही नाही",  हे दरवेळी माझे बापू जाणवून देतात.

बापू आपल्याला आधार देऊन आधार द्यायला शिकवतात. आज, तसे पहायला गेले तर प्रत्येकाला मानसिक आधाराची नितांत गरज आहे. आधाराविना माणूस कोलमडून पडतो. आम्ही असे खूप अनुभव घेतलेत. आधार - कुणाला कसा व का द्यावा हे कसे ठरवावे हेदेखील बापूंनी शिकवलंय. बापूंकडे जो येतो त्याला ही प्रचिती येतेच येते. आणि मग हा भक्कम आधार मिळला कि आपण बिनधास्त रहायला शिकतो. कारण आपल्याला माहीत असतं की, "माझे सदगुरु माझ्या बरोबर सतत आहेच १०८%" . मग मी का डगमगू? हा विश्वासच मला कुठल्याही परिस्थितीत तारून नेतो. 

"मायेची सावली" आज जगातून नाहीशी होते आहे. ती माझ्या बापूंकडून शिकतो. मन थोडसं मोठं करून क्षमा करायला शिका, नाहीतर मनातले द्वंद्व वाढत जाऊन आपणच् आपल्याच माणसांशी युद्ध पुकारतो

देव आहेच. त्यावर विश्वास ठेवा. पृथ्वीच्या प्रत्येक कणांत देवाचे अस्तित्व आहे. फक्त मला, त्याला जाणून घ्यायाचे आहे. तरच मानवी मनात पेटलेला युद्धाचा वणवा थांबू शकेल. रिकाम्या वेळेत डोक्यांत व मनात हर प्रकारे विचारांचे तांडव सुरू होते. रिकाम्या वेळेत देवाच्या स्मरणाचे महत्व सांगून " रामनाम " व " अंजनामाता" वही मधून दररोज किमान ४ पाने लिहीण्याची गरज माझ्या सदगुरुंनी पटवून दिली. 

 देवाचे अस्तित्व व त्यांचे कार्य ह्यावर माझा हळूहळू विश्वास बसू लागला. ही माझी जिज्ञासा रामरसायन, मातृवात्सल्यविन्दानम् , मातृवात्सल्य - उपनिषद ह्या पवित्र ग्रंथांनी पुर्ण केली. 

माझ्या मनात सतत काहीतरी लिहावं असे वाटत असे, पण सुरूवात कशी करावी, कुणी हसेल नावं ठेवेल ह्या भितीने मी कधीच धाडस केले नाही लिखाणाचे. पण बापूंनी "प्रत्यक्ष" या दैनिकात "व्यासपीठ" सुरू करून माझ्या मनातील विचारांना एक हक्काचे स्थान मिळवून दिलंय. प्रेम, विश्वास आणि आधार ह्या ३ मुलभूत गरजा मिळाल्याने माणूसकी जीवंत रहाते - हे मी बापूंकडून शिकले.   

मला जर माझे इप्सित ध्येय साधायचे असतील तर त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून, वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून सभोवतालीच्या वातावरणात होणार्या बदलांशी तारतम्य साधून माझ्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे सतत प्रयास करत रहायचेच आहे" हे मी माझ्या बापूंकडून शिकून आत्मसात करू शकले. 
"तू अर्धवट आहेस" ही लहानपणीची सल खोडून, माझ्या बापूंनी दाखवलेल्या रस्त्यावरून चालवून "मी परिपूर्ण आहे" माझ्या बापूच्या शिकवणीनूसार - हे सिद्ध केलंय.

माझा सद्गुरू - माझे बापू - माझे मित्र- माझे रक्षक - मार्गदर्शक !! किती लिहू !!  तुमच्यापुढे माझा शब्द भांडार कमीच आहे. माझ्या जीवनाला तुम्ही भक्कम आधार आहात! बापू मी अंबज्ञ आहे.

2 comments:

  1. Really nicely written . I think your life story is story of each and every shraddhavan .
    HARI OM SHREE RAM AMBADNYA

    ReplyDelete
  2. Best wishes... keep doing good work

    ReplyDelete