Friday 14 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सतगुरूचरित्र...भाग ८...

उदार कल्पतरू अर्थात सतगुरूचरित्र

बालपण व शिक्षण

लेखक :- श्री दिनकर यादवराव मार्डीकर

     आमचे कथानायक पुंडलिक हरी संत , ह्यांचे शैशव व बालपण फार थोडे दिवस मुंबईस गेले.जन्म झालेल्या विठ्ठल मंदिरात एका शिक्षकाने मुलांची खाजगी शाळा काढली होती. तिथे ते, वयाच्या चौथ्या वर्षापासूनच , त्यावेळी प्रचारात असलेल्या धूळपाटी पद्धतीने मुळाक्षरांचे वाचन लेखन शिकले. श्री गणेशाय नमः ह्या प्रथम पाठातील श्री हे अक्षर वळविताना "श्री " ह्या अक्षराला ते विठ्ठलमंदिराचा दरवाजा म्हणत असत. त्यांचे वडील , हरिभाऊ मुंबईतील अनेक कारखान्यातून यांत्रिक भागात काम करून कुटुंबाचे पालनपोषण करत असत. साधारण खालच्या स्तराचे काम करीत  असतांना सुद्धा त्यांचे यंत्रकलेचे विज्ञान  इतक्या उच्च प्रतीचे असे कि त्या काळातील उच्च परीक्षा उत्तीर्ण झालेले पदवीधर यांत्रिक काम  करणारे,त्यांना आपले त्या कलेतील गुरु मानत असत, आणि त्यांच्या अनुभवापासून फायदा घेत असत. अश्या उच्च यांत्रिक कलेच्या पदवीधर हितचिंतकांनी एकदा त्यांना म्हंटले, " तुमचे ज्ञान, विज्ञान ह्या कलेत इतके उच्च असूनही तुम्ही आमच्या प्रमाणे परीक्षेस बसून इंजिनियर चे प्रमाण पत्र का प्राप्त करून घेत नाही ?" त्यावर, हरिभाऊ म्हणाले, "या कलेचे परीक्षेत लागणारे सर्व ज्ञान इंग्रजीत आहे. माझ्या वडिलांनी हि भाषा मला शिकविली नाही . मग मला ते कसे जमावे ?" त्यांना त्यांच्या एका पारशी इंजिनीअर ने एक गुजराथी भाषेत लिहिलेला यांत्रिक विषयाचाच ग्रंथ दिला आणि सांगितले कि हे अध्ययन करून इंजिनीअर च्या परीक्षा पास करता येतात. त्याने अशी आग्रहाची माहिती दिली. त्याप्रमाणे हरिभाऊंनी नोकरी सांभाळून व अभ्यास करून आधी तृतीय श्रेणीचे आणि काही काळानंतर द्वितीयश्रेणीचे प्रमाणपत्र प्राप्त केले व ते इंजिनीअर बनले. त्या प्रमाणपत्रांच्या आधारे मग त्यांना वर्हाड खान्देश गुजरात राजपुताना इत्यादी प्रांतांतून , जिनिंग व प्रोसससिंग फॅक्टरीतून इंजिनीअर पदाच्या वरच्या नोकऱ्या मिळू लागल्या.
       तेव्हा मुंबई सोडून त्यांचे वास्तव्य नोकरीच्या निमित्ताने वारंवार बदलणाऱ्या शहरी होऊ  लागले.  इंजिनीअर च्या पहिल्या क्लास ची परीक्षा त्यावेळच्या रिवाजानुसार इंग्रजी भाषेतून होत असे.  परीक्षा हरिभाऊंनी पास करणे शक्य नव्हते व त्यामुळे ते फर्स्ट क्लास इंजिनियर होऊ शकले नाहीत. तरी त्यांचे अनुभवी ज्ञान कोणत्याही फर्स्ट क्लास इंजिनियरपेक्षा जास्तच  होते यात काही संशयाच नाही. त्यावेळच्या स्टीम व ऑइल पॉवरवर चालणाऱ्या मशिनरीचे ज्ञान विज्ञान त्यांना पूर्ण माहित होते. त्या वेळचे फर्स्ट क्लास इंजिनियर त्यांना आपल्या गुरूच्या असत व त्यांच्या अगाध अनुभव व ज्ञानापासून उपदेश व फायदा घेत असत.
      सन १९२४ साली त्यांनी वर्हाडातील खामगाव येथील श्रीराम गोपाळ फॅक्टरी ची  मशिनरी बदलवून कुणाही सुशिक्षित इंजिनीअर ची मदत न घेता  नवी मशिनरी  बसविली . त्यावेळी त्यांचे चिरंजीव पुंडलिक मराठी ३ऱ्या वर्गात तेथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होते. व त्यांचे वय १० वर्षाचे होते. तो काळ स्वदेशी मालाचा वापर व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या चळवळीचा होता. शाळेमध्ये एक आंदोलनकर्त्या व्याख्यात्याचे भाषण झाले. त्यात त्यांनी मुलांना चहा न पिणे व दिवाळीत फटाके न उडविणे, ह्या  विषयावर व्याख्यान दिले. त्याचा परिणाम  ध्येय विषयक संवेदनशील मनावर इतका जबर झाला कि , वयाच्या २१व्या वर्षापर्यंत सुद्धा घरातील इतर सगळे लोक चहा पीत असतांनासुद्धा तो स्वतः चहा घेत नसे. तसेच दिवाळीत फटाक्यांची हट्ट तर करणे दूरच राहिले पण आणलेल्या फटाक्यांना तर त्याने हातसुद्धा लावला नाही.
      त्यापूर्वी  पुंडलिक आपल्या वयाच्या सातवे वर्षी, आजोळी - मामाकडे नाशकात असतांना त्याने तेथील काळ्या  रामाच्या मंदिरात ह.भ.प. श्री पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली विदेशी कापडाची होळी करून स्वदेशी च्या पुरस्कर्त्यांनी सभा भरलेली असतांना, सात वर्षाच्या पुंडलिकाने नुकतीच घेतलेली जरी ची टोपी घातलेली होती. आपल्या मामासह तो तिथे व्याख्यानाला आला होता पण, तिथे इतर वक्त्यांची भाषणे ऐकून त्याने स्वतः व्याख्यान देण्याचा आपल्या मामांजवळ हट्ट धरला . हा त्याचा हट्ट पुरवण्याकरता मामाने त्याला १० ओळींचे व्याख्यान तिथेच तयार करून दिले. सभा मंडप चिक्कार भरला असतांना टेबलावर उभे राहून , ह्या चिमुकल्या वक्त्याने हावभावासकट पाठ केलेले १० ओळींचे भाषण केले. नंतर झालेल्या कपड्यांच्या  होळीत आपली जरीची टोपी पण  जाळून टाकली. याचा परिणाम घरी आल्यावर मातोश्रीने दिलेल्या त्याच्या पाठीवरील रामराट्टयात झाला हे वेगळे.  पण, लहानपणापासूनच  मनास पटेल त्या लहरींत अत्यंत ध्येयाने कर्म प्रवृत्त होणे हा त्याचा स्वभाव जन्मजातच म्हणावा लागेल.
      हरिभाऊंचा स्वभावसुद्धा फारच स्वाभिमानी. मालकांची हांजी हांजी करून नोकरी करणे त्यांना कधीच आवडले नाही. भांडवलशाहीची लुटालूट त्यांना जशी पसंत नव्हती तसेच मालकाच्या धंद्याकरता त्यांच्या हुकूमशाहीपुढे मान झुकवून त्याच्या कारस्थानात सहयोग  त्यांची नेहेमीच इच्छा नसे. असे प्रसंग येताच हरिभाऊ म्हणत, " हि सांभाळा तुमची नोकरी. मी, ती सोडून चाललो. " ह्या त्यांच्या स्वभावामुळे वाढत्या कुटुंबाचे पालनपोषण , मुलामुलींचे शिक्षण इत्यादी जबाबदाऱ्या असतांनासुद्धा हरिभाऊ फार वर्षे कुठेच टिकून राहू शकले नाहीत. त्यामुळे इंग्रजी ३ऱ्या वर्गाच्या खामगावास झालेल्या शिक्षणानंतर , पुंडलिकास नासिक येथे आपल्या मामा डॉक्टर धोंडोपंत ह्यांच्या घरी पुढील शिक्षणाकरता आईवडिलांना सोडून राहणे भाग पडले. तिथे त्यांनी नासिक हायस्कूलात प्रवेश घेतला.

(क्रमशः )

1 comment:

  1. खूपच छान , रासीकावीरा . अम्बज्ञ

    ReplyDelete