Saturday 22 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ९ (b) ...

पहिला विवाह काळ 
१९०८ ते १९११ 
४ (ब ).... 

      बऱ्याचदा हेड मास्तरांनी पंडलिकाची हट्टी प्रवृत्ती बघून त्याला धुडकावून लावले. त्यावेळी हिस्लॉप हाय स्कूल चे हेड मास्तर श्री हरदास  गृहस्थ होते. ते मात्र सर्वांनाच अपवाद निघाले. त्यांना पुंडलिकाच्या निश्चयाचे कौतुक वाटले. तसेच त्याच्या शोकग्रस्त रडव्या चेहेऱ्याकडे बघून त्यांना त्याची दया आली.  तडजोड शोधून काढली. काही दिवस त्यांनी पुंडलिकाला ६व्या वर्गात बसवले व मग त्याची योग्यता पाहून , त्याला ७व्या वर्गात प्रोमोट  केले. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी श्री हरदास यांनी एक वेगळा वर्ग काढलेला होता. त्या वर्गात ७वी चे सर्व विषय  शिकवले जात व आखलेल्या विषयांचा अभ्यास पूर्ण करून घेतला जाई. याचा फायदा पुंडलिकास मिळाला.
      शाळेच्या मॅट्रिक परीक्षेसाठी फॉर्म भरण्याकरता जी टेस्ट परीक्षा घेतली जाई , तीत ह्या ६व्या वर्गातील स्टुडंट्स ना बसण्याची परवानगी दिली जात असे. उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मॅट्रिक ला बसण्याचे फॉर्म दिल्या जात असत, मात्र फेल झाल्यास व शाळा सोडली तर फक्त ६वी चे सर्टिफिकेट दिले जात असे; ७वी चे नाही. "तुला ह्या वर्गात  प्रवेश दिला तर चालेल? ह्या खेरीज मी तुझ्याकरता जास्त काहीही करू शकत नाही. उगीचच माझ्या घरी येऊन माझी पूजा अर्चेची वेळ खराब करीत जाऊ नकोस " असे हेड मास्तर म्हणाले.
      हे ऐकून तर पुंडलिक प्रसन्न झाला आणि म्हणाला, "पाहिजे तर मला पहिल्या इंग्रजीत बसवा पण १९१३ च्या मॅट्रिक ला माझे बसणे कसेही करून साध्य करून द्याच. मी  उपकार विसरणार नाही, " ह्या प्रमाणे पुंडलिक त्या शाळेत जाऊ लागला. त्याचा मॅट्रिक च्या परीक्षेसाठी घनघोर अभ्यास सुरु झाला. परीक्षेला फक्त ९ महिनेच राहिले होते. सर्वच विषय नवीन होते. सर्व विषयांचा अर्धा अधिक अभ्यास वर्गात पुढे गेला होता, तरीही त्याने कोणतीही हयगय केली नाही, ते ९ महिने त्याने अभ्यासाच्या समाधीत कसे घालवले , हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्याची आठवण मात्र चिरकाल टिकणारी ठरली.
      घरी त्याची लहान पत्नी नाशिकहून येऊन आता सासरपणाकरिता येऊन राहिली होती. त्यांचे पतिपत्नीचे नातेही राजरोस सुरु झाले होते. सकाळी ४ वाजता त्याला उठवून चहा करून देण्याचे काम आता त्याची पत्नी दुर्गा करीत असे. पुंडलिकाचे वय १९ वर्षाचे आणि त्याच्या पत्नीचे वय १४ वर्षाचे त्यावेळी होते. "मातेच्या  स्तनावरुन पत्नीच्या स्तनावर हात जात नाहीत तो पवतोच विद्यार्थी दशा खरी, त्यानंतर विद्यार्थी  असते, असे म्हणतात." परंतु पुंडलिकाचे उदाहरण त्याला अपवाद होते. इतकेच नव्हे पण तो त्या वर्षीच अलाहाबाद विश्वविद्यालयाच्या मॅट्रिक ला बसून २ऱ्या क्लास मधे उत्तीर्ण हि झाला. हि विशेष नवलाची  गोष्ट आहे. डॉ संत जेव्हा ह्या घटनेचा उल्लेख कधी गप्पा गोष्टीत करीत असतात, त्यावेळी मोठ्या सलगीने म्हणतात, " त्या ९ महिन्यात मला फक्त तीनच गोष्टींची जाणीव असे - कुलदैवत दुर्गा देवी, माझी चिमुकली गृहस्वामिनी दुर्गा पत्नी व पुस्तके. मी इतके अविश्रांत श्रम करूच कसे शकलो ह्याचे माझे मलाच नवल वाटते. ७वी च्या वर्गात हमखास पास होणारच , असे समजले गेलेले विद्यार्थी नापास झाले , व त्यांतही मी मात्र दुसऱ्या श्रेणीत कसा पास झालो  कुणास ठाऊक. पण इतकी गोष्ट मात्र खरी आहे कि , माझ्या पत्नीने मला साहाय्य दिले नसते तर हे दिव्या माझ्या हातून कदापिही पार पडले नसते. "

(क्रमशः )

No comments:

Post a Comment