Sunday 30 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ११ (a) ...

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र
द्वितीय विवाहानंतर

      इ स १९२० डिसेंबर ला डॉ संतांची फिरती नोकरी संपून त्यांची नेमणूक बिलासपूर येथील तुरुंग व पोलीस हॉस्पिटल मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून झाली. इ.स. १९२२ मध्ये त्यांच्या जीवनात एक महत्वाची घटना घडली - ती म्हणजे , त्यांच्या मामे बहिणीशी त्यांच्या हस्ते माझा विवाह मुंबई येथे २० मे १९२२ मध्ये झाला. तिचे नाव सौ चंद्रिका ठेवण्यात आले आणि विज्ञान जनात तिला आज फार महत्वाचे स्थान आहे.
      इ स १९२० पासून १९५६ पर्यंत  सर्व जीवन बिलासपुरताच व्यतीत झाले. सन १९२४ मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन बिलासपूरलाच खाजगी प्रॅक्टिस सुरु केली. त्यावेळी त्यांच्या सर्व हितचिंतकांनी ह्या गोष्टीस मोडता घातला कारण,  बिलासपूर सारख्या मागासलेल्या गावी ह्यापूर्वी ज्या काही डॉक्टरांनी खाजगी दवाखाने घातले होते ते २-४ महिन्यातच गुंडाळून त्यांना आपले चंबूगबाळे आवरावे लागले होते. कारण तो प्रांत व जिल्हा जवळ अत्यंत मागासलेला होता. जनतेस इंग्रजी औषधे वापरण्याचा सराव नव्हता. परंतु डॉ संतांनी एकदा केलेला निश्चय मागे घेतला नाही. सरकारी नोकरी सोडून खाजगी दवाखाना घालून जीवन व्यतीत करण्याचा पक्का निश्चय होण्याचे कारण हेच होते कि , सरकारी नोकरीत नेहेमी बदल्या होत असत . त्यांच्या मातोश्रींची प्रकृती नेहेमीच उदार विकाराने त्रस्त असे , वडिलांचे हि वय होत चालले होते. मातृसेवा व पितृसेवेचे ध्येय सरकारी नोकरीत राहून सिद्ध होणे फार कठीण असे. म्हणून एकाच ठिकाणी राहून आपल्या व्यवसायाने त्यांची सेवा घडावी - हाच नोकरीचा राजीनामा देण्यामागील उद्देश होता.
      बिलासपूर हे शहर डॉ संतांसारख्या पुण्यामुंबईकडील महाराष्ट्रीयास आपले नित्याचे व्यवसाय स्थान बनविणे , पसंत पडण्यासारखे नव्हते. पाण्याचे नळ , विजेचा प्रवाह, मोटारीची रहदारी इत्यादी आधुनिक सुखसोयी त्या वेळी तिथे नव्हत्या. तेथील महाराष्ट्रीय म्हणविणारी जनता, छत्तीसगडी जनतेच्या मानाने अतिशय अल्प प्रमाणात होती आणि त्यांच्यात महाराष्ट्रीयत्वाचा अभिमान व संस्कृतीही मुळीच नव्हती. त्यांना शुद्ध मराठी बोलता येत नसे. हिंदी मिश्रित नागपुरी बोलीत ते मराठी बोलत असत. त्यांची सोदाहरण व्यवहाराची भाषा बहुतांशी हिंदी च असे. खाजगी डॉक्टरी व्यवसाय सुरु करणाऱ्या डॉक्टरांना तिथे अपयश येत असे. अशा प्रकारचा बिलासपूरचा इतिहास प्रसिद्ध होता.
      डॉ संतांचा स्वभाव मुळात प्रवाहपतित होण्याचा नव्हता, पण प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन तिला स्वतःच कर्तबगारीने अनुकूल बनविण्याचा त्यांचा स्वभाव असल्यानेच , त्यांनी बिलासपूर हे शहर खाजगी व्यवसायाकरिता निश्चित केले. दुसरे कारण म्हणजे त्यावेळी, बिलासपूरमध्ये अन्नधान्याची स्वस्ताई कमालीची असे. त्यांच्या जवळ धनसंचय फार थोडा होता. महाराष्ट्रातील इतर शहरात व्यवसाय त्यांनी सुरु केला असता तर , तो जमवून कुटुंब पोषणास पुरेशी मिळकत होई पर्यंत पुरेल , इतका धनसंचय त्यांच्याजवळ नव्हता. म्हणून स्वस्ताई असलेले बिलासपूर  - पण आप्तांपासून दूर त्यांनी मातृसेवा व पितृसेवेच्या ध्येयाने पसंत केले. नोकरीच्या निमित्ताने जवळ जवळ ३ वर्षे त्यांना  बिलासपूरी राहण्याची संधी मिळाली. तुरुंग व पोलीस खात्यातील डॉ म्हणून त्यांना खाजगी प्रॅक्टिस करता येत नव्हती तरी शहरातील महाराष्ट्रीय व इतर  त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे डॉक्टर ह्या नात्यामुळे येत असे. म्हणून बिलासपूरलाच प्रॅक्टिस सुरु करण्याचा हा निश्चय त्यांनी त्यांनी पक्का केला आणि १९२४ मध्ये त्यांनी खाजगी दवाखाना उघडला.
     पहिल्या ६ महिन्यांचे त्यांचे उत्पन्न अत्यंत संतोषजनक ठरले. बिलासपुरास खाजगी डॉक्टरांचा उदरनिर्वाह होत नाही , ह्या  समजुतीला त्यांनी जबरदस्त धक्का दिला. त्यांचे डॉक्टरी धंद्यातले ज्ञान रोग्यांशी व रोग्याच्या कुटुंबातील माणसांशी आपुलकीने वागण्याची पद्धत , गरीब रोग्यांची विनामूल्य सेवा व त्यांचे उच्चनैतिक आचरण , सहानुभूतीयुक्त प्रेमळ स्वभाव इत्यादी उत्तम गुणांनी त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीचा  होऊ लागला . तो काही कालानंतर इतका वाढला कि सन १९२९ मध्ये त्यांनी आपले स्वतःचे भव्य घर प्रमुख रस्त्यावर बांधून तिथेच एक मोठा दवाखाना व घरातील सर्व मंडळींची राहण्याची सोय केली.
      डॉ संत दिवसरात्र आपल्या व्यवसायात गुंतलेले असले तरीही समाजकार्यात पुढे भाग घेत. रायगडला एका प्रसंगी महानदीला अचानक महापूर आला होता , त्यावेळी डॉ संत इतर समाज नेत्यांसह लोकांना मदत करण्यास व उपचारासाठी धावून गेले होते. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात देश सेवेच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील डॉक्टर लोकांनी इंग्रजी सेनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहन पर भाषणे देण्यासाठी डॉ संतांनी मध्य प्रांतांचा सर्व विभागांचा दौरा काढला. त्यांचे हे वागणे त्यावेळच्या मध्य प्रदेशच्या सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्यांना "रावसाहेब" हा सन्माननीय 'किताब अर्पण करण्यात आला. बिलासपूर जिल्ह्याच्या रेडक्रॉस शाखेचे मंत्रिपद तेथील सिव्हील सर्जन व डेप्युटी कमिशनर ने त्यांच्याकडे सोपविले. रेडक्रॉसच्या २२ जिल्ह्यातील मंडळींची बिलासपूर ला डॉ  नेहेमी ये जा असे. ऑल इंडिया मेडिकल प्रॅक्टिशनर्स डॉक्टर्स अससोसिएशन च्या मध्य प्रांतीय शाखेचे अध्यक्ष स्थानी ते निवडून  होते. सण १९३२ ते १९५६ पर्यंत ते अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. त्याचप्रमाणे मध्यप्रांतीय मेडिकल एक्झामीनेशन बोर्ड , मध्यप्रांतीय नर्सेस असोसिएशन, रेडक्रॉस कमिटी इ. अनेक मेडिकल संस्थेतून ते काम करत असत व आपली खाजगी प्रॅक्टिस सांभाळून अनेक प्रकारची राष्ट्रउपयोगी व जनकल्याणकारी कार्ये तन ,मन ,धन अर्पून करत असत. ह्या सर्व कामानिमित्ताने त्यांना नागपुरास यावे लागले तरी हे सर्व ते अतिउल्हासाने व प्रेमाने करत असत.
      डॉ संतांची मेडिकल प्रॅक्टिस वरच्या स्तराची असे. शास्त्रात लागणाऱ्या नित्य नवीन शोधांचे ज्ञान असावे म्हणून त्यांनी स्वतःची लायब्ररी अगदी अपटुडेट मेडिकल पुस्तकांनी संग्रहित केली होती. ह्या सर्व पुस्तक संचयाची किंमत पाच हजार रुपयांहून अधिक जास्त होती. ते, रोगाचे निदान - रक्त , मूत्र, लघवी , थुंकी, मल इ.ची परीक्षा आणि तपास मायक्रोस्कोप ने करून निश्चित करत असत. त्यावेळच्या बिलासपूरच्या कोणत्याच खाजगी डॉक्टर जवळ अश्या प्रकारच्या तपासणी करण्याची साधने नव्हती, म्हणून इतर डॉक्टर त्यांच्या लॅबोरेटरीचा उपयोग करून घेत असत व त्यांना consult करीत असत. त्यावेळेला अश्या प्रकारची तपासणीची साधने पूर्णतः सरकारी दवाखान्यातूनही नसत , म्हणून डॉ संत आपली लॅबोरेटोरी सर्व साधनसामुग्रीने परिपूर्ण ठेवून चालवीत असत.  तपासणीबद्दलचे मूल्य त्यांना साधारण रोग्यांकडून क्वचितच प्राप्त होत असे. तरीपण सर्व प्रकारच्या परीक्षा व आवश्यक तपासणीत ते भेदभाव न करता पूर्णतः करत असत.
तात्पर्य, हे कि त्यांचे नाव उत्तम चिकित्सक वैद्य व उत्तम नेत्र शल्य चिकित्सक म्हणून दिवसेंदिवस वाढू लागले . त्याच प्रमाणात संपत्ती व कीर्तीची व कुटुंबाचीही वृद्धी होत गेली.


(क्रमशः ) 



     
      

Wednesday 26 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १० ...


मॅट्रिक नंतर 

लेखक :- श्री दी या मार्डीकर 

      माणसाच्या जीवनात काही  घटना अशा घडतात कि त्यामुळे त्याचे पुढचे आयुष्य अचानक वेगळेच वळण घेते. त्याच प्रमाणे मॅट्रिक ची परीक्षा १९१३ मध्ये पास झाल्याने पुंडलिकाचे पुढील जीवन सर्वस्वी बदलले हे  मात्र खरे. त्याच्या वडिलांना आनंद झाला . अर्थात तो आनंद अवर्णनीय असा होता.
      हरिभाऊंचे मासिक उत्पन्न जेमतेमच होते व वाढत संसार होता. ३ मुली शाळेत शिकत होत्या व त्यांचे वय लग्नाचे होत चालले होते. त्यांच्या अतिशय स्वाभिमानी स्वभावामुळे आणि पुंजीपती मालकाच्या लहरीपणामुळे त्यांची नोकरी कधीही एके ठिकाणी कायमची टिकत नसे.  तरी पण इतक्या हिरीरीने व अविश्रांत श्रम घेऊन, मॅट्रिक पास होणाऱ्या पुंडलिकास त्याच्या मनासारखे विश्वविद्यालयीन उच्च शिक्षण  देण्याचा  त्यांनी आपला मनोनिग्रह  सांगून,त्याला पुढच्या शिक्षणाची विचारणा केली. पुंडलिकाने काही आपल्या मित्रांच्या सल्ल्याने वैद्यकीय शिक्षणाची निवड  केली. त्याकरिता मुंबई च्या ग्रांट मेडिकल कॉलेज मध्ये त्यावेळच्या एल. एम अँड एस च्या डिग्री कोर्से मध्ये प्रविष्ट होण्याचे पुंडलिकाने ठरवावे , असे हरिभाऊंचे मत होते. परंतु कुटुंबाची इतर जबाबदारी लक्षात घेऊन सतत ५ वर्षे दरमहा रु १००/- खर्च होतील, या कारणामुळे पुंडलिकाने मुंबई चे हे शिक्षण  घेण्याचे नाकारले. हरिभाऊंनी  अनेक रीतींनी त्याची समजूत घालून पहिले व सांगितले कि, यासाठी त्यांच्या मिळकतीचा अर्धा हिस्सा जरी खर्च झाला तरीही  हरकत नाही. ५ वर्षे गरिबीत काढून पुंडलिकाचे शिक्षण पूर्ण करण्याचे  ठरवले . परंतु पुढे येणार असणाऱ्या धाकट्या बहिणीचा  लग्नाचा विचार करून , पुंडलिकाने स्पष्ट सांगून टाकले कि, वडिलांचा उदारपणाचा फायदा घेऊन सर्व कुटुंबास दीर्घ आर्थिक अडचणीत ठेवण्यास मी कधीही तयार होणार नाही. म्हणून त्याने ह्या गोष्टीस साफ नकार दिला.
      परंतु सुदैवाने त्याच वर्षी सन १९१४ मध्ये नागपुरात नव्यानेच स्थापन झालेल्या रॉबर्टसन स्कूल मध्ये पुंडलिकास प्रवेश मिळाला. ह्या एल. एम. पी च्या वैद्यकीय शिक्षणात हरिभाऊंचा विशेष खर्च ही झाला नाही. कारण विद्यार्थ्यांना ४ वर्षेपर्यंत दरमहा रु १२ शिष्यवृत्ती व अभ्यासाची सर्व पुस्तके सरकारी खर्चाने मिळत असत. त्याशिवाय शरीर शास्त्र (anatomy) व शरीर स्वास्थ्य शास्त्र   (physiology) ह्या विषयांचे नकाशे   (Diagrams)  चित्रित करून ते शाळेला विकून पुंडलिक द्रव्य मिळवत असे. १९१८ सालच्या अंती येथील ४ वर्षाचा मेडिकल शिक्षण क्रम पूर्ण करून त्याने त्याच वर्षांपासून मध्य प्रांतीय सरकारी वैद्यक खात्यामध्ये दरमहा ४५ रु  सब - अससिस्टन्ट सर्जन ची नोकरी मिळवली. पहिल्या ३ वर्षे पावेतोची नोकरी अत्यंत हाल अपेष्टांची अशीच होती. संसर्गजन्यक रोगप्रतिबंधक खात्यातील त्या नोकरीत नित्य प्रवास करावा लागेच पण, मध्य प्रदेशाच्या त्या वेळच्या २२ जिल्ह्यात जेथे जेथे प्लेग , कॉलरा इत्यादि रोगांचा प्रसार होत असे त्या ठिकाणी पुंडलाकीची म्हणजे डॉ पुं ह संत यांची बदली होत असे. बुलढाणा अकोला यवतमाळ रायपूर मंडला सागर इत्यादी जिल्ह्यातील गावोगावी बदली होत असे आणि खेड्यापाड्यातून बैलगाडीतून  कुठल्याही अवेळी प्रवास करावा लागत असे. स्वतःची  व अतिशय परिश्रमी डॉक्टर म्हणून पुंडलिकाची ख्याती पसरली होती. या कारणामुळे केंद्रीय खात्याकडून इतर डॉक्टर उपलब्ध असतांनाही डॉ संत यांचीच नेमणूक होत असे.
      डॉ संत यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना ता १८ जुलै १९१७ ला  झाले होते. त्याचे नाव विनायक ठेवले होते. डॉ संत ची नोकरी सुरुवातीस फिरतीची असल्याने त्यांना आईवडील पत्नी व पुत्र ह्यांच्यासह कौटुंबिक सहवासात राहण्याची संधीच  मिळाली नाही,ते रायपूर जिल्ह्यात जंगलातील फिरतीच्या नोकरीवर असतांना  अत्यंत दुःखदायक प्रसंग ओढवला. त्यांचे वडील मलकापूर येथे इंजिनीअर असतांना १९१८ च्या भारतव्यापी इन्फ्लुएंझा च्या प्राणघातक साथीत त्यांचे कुटुंब सौ दुर्गादेवी सापडल्या व त्याला बळी पडले. पत्नीच्या स्वर्गवासाची हि बातमी तारेने कळताच ते घाईने स्वगृही परतले, परंतु आपल्या धर्मपत्नीचे अंतिमदर्शन म्हणजे तिच्या शवाचे दर्शनच त्यांच्या नशिबी लिहिले होते. या दुःखाच्या जबरदस्त आघाताने त्यांचे जीवनातील सर्व लक्षच उडाले. तेव्हा  विनायक हा अवघा ६ महिन्यांचा होता. त्याला टाकून  स्वर्गवासी झाली होती आणि आपल्या नातवाचे  कार्य हरिभाऊ व सौ यमुनाबाई ह्या आजोबा आजीवर येऊन पडले. तो असहय्य दुःखहाभार हृदयाशी बाळगून डॉ संत पुन्हा नोकरीवर हजर झाले.
      रायपूरच्या निर्जन भयानक जंगलातील खेड्यापाड्यातून इन्फ्लुएंझा च्या रोगावर उपचार करीत करीत ते हिंडत असत व सभोवार माणसे कुत्र्यामांजरासारखी मरत असत. डॉ संत हिरीरीने त्यांच्यावर उपाय करून त्यांची शुश्रूषा करत असत. इच्छा एकाच कि  सर्वस्व हरपल्यामुळे , इतर रोग्यांप्रमाणे ईश्वराने आपल्यालाही घेऊन जावे. परंतु ईश्वर संकेत निराळाच असल्याने त्यांना कधीही अपाय झाला नाही. त्याच वेळी जगातले १ले महायुद्ध सुरु झाले होते. डॉ  युद्धाच्या आघाडीवर जाण्याकरिता सैन्याच्या डॉक्टरी  विभागात अर्ज केला. हि गोष्ट त्यांच्या एका मित्राला समजताच , त्यांनी ती मालकापुरास त्यांच्या वडिलांना  कळवली. वडिलांकडून तातडीचे बोलावणे येताच , ते घरी गेले. त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री इत्यादिकांस इन्फ्लुएंझाचा तडाखा बसला होता. सर्वांनी डॉ संतांची मनधरणी करून युद्धावर न जाण्याचा आग्रह केला. डॉ संतांचे नाव पुंडलिक होते व त्या पुंडलिक भक्ताप्रमाणे स्वभावाने ते परममातृभक्त होते. मातेच्या मनाविरुद्ध न  वागण्याचे वाचन त्यांनी दिले. याचा परिणाम असा झाला कि त्यांना आपल्या मनाविरुद्ध द्वितीय विवाहाच्या बंधनात पडावे लागले. सन १९१९ मध्ये पुण्याच्या मोरोबादादाच्या वाड्यात त्यांचा विवाह  प्रसिद्ध ह. भ.प  श्री लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या द्वितीय कन्या श्रीमती शांताबाई यांच्याशी मोठ्या थाटामाटाने पार पडला.

(क्रमशः )
      

Saturday 22 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ९ (b) ...

पहिला विवाह काळ 
१९०८ ते १९११ 
४ (ब ).... 

      बऱ्याचदा हेड मास्तरांनी पंडलिकाची हट्टी प्रवृत्ती बघून त्याला धुडकावून लावले. त्यावेळी हिस्लॉप हाय स्कूल चे हेड मास्तर श्री हरदास  गृहस्थ होते. ते मात्र सर्वांनाच अपवाद निघाले. त्यांना पुंडलिकाच्या निश्चयाचे कौतुक वाटले. तसेच त्याच्या शोकग्रस्त रडव्या चेहेऱ्याकडे बघून त्यांना त्याची दया आली.  तडजोड शोधून काढली. काही दिवस त्यांनी पुंडलिकाला ६व्या वर्गात बसवले व मग त्याची योग्यता पाहून , त्याला ७व्या वर्गात प्रोमोट  केले. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी श्री हरदास यांनी एक वेगळा वर्ग काढलेला होता. त्या वर्गात ७वी चे सर्व विषय  शिकवले जात व आखलेल्या विषयांचा अभ्यास पूर्ण करून घेतला जाई. याचा फायदा पुंडलिकास मिळाला.
      शाळेच्या मॅट्रिक परीक्षेसाठी फॉर्म भरण्याकरता जी टेस्ट परीक्षा घेतली जाई , तीत ह्या ६व्या वर्गातील स्टुडंट्स ना बसण्याची परवानगी दिली जात असे. उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मॅट्रिक ला बसण्याचे फॉर्म दिल्या जात असत, मात्र फेल झाल्यास व शाळा सोडली तर फक्त ६वी चे सर्टिफिकेट दिले जात असे; ७वी चे नाही. "तुला ह्या वर्गात  प्रवेश दिला तर चालेल? ह्या खेरीज मी तुझ्याकरता जास्त काहीही करू शकत नाही. उगीचच माझ्या घरी येऊन माझी पूजा अर्चेची वेळ खराब करीत जाऊ नकोस " असे हेड मास्तर म्हणाले.
      हे ऐकून तर पुंडलिक प्रसन्न झाला आणि म्हणाला, "पाहिजे तर मला पहिल्या इंग्रजीत बसवा पण १९१३ च्या मॅट्रिक ला माझे बसणे कसेही करून साध्य करून द्याच. मी  उपकार विसरणार नाही, " ह्या प्रमाणे पुंडलिक त्या शाळेत जाऊ लागला. त्याचा मॅट्रिक च्या परीक्षेसाठी घनघोर अभ्यास सुरु झाला. परीक्षेला फक्त ९ महिनेच राहिले होते. सर्वच विषय नवीन होते. सर्व विषयांचा अर्धा अधिक अभ्यास वर्गात पुढे गेला होता, तरीही त्याने कोणतीही हयगय केली नाही, ते ९ महिने त्याने अभ्यासाच्या समाधीत कसे घालवले , हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्याची आठवण मात्र चिरकाल टिकणारी ठरली.
      घरी त्याची लहान पत्नी नाशिकहून येऊन आता सासरपणाकरिता येऊन राहिली होती. त्यांचे पतिपत्नीचे नातेही राजरोस सुरु झाले होते. सकाळी ४ वाजता त्याला उठवून चहा करून देण्याचे काम आता त्याची पत्नी दुर्गा करीत असे. पुंडलिकाचे वय १९ वर्षाचे आणि त्याच्या पत्नीचे वय १४ वर्षाचे त्यावेळी होते. "मातेच्या  स्तनावरुन पत्नीच्या स्तनावर हात जात नाहीत तो पवतोच विद्यार्थी दशा खरी, त्यानंतर विद्यार्थी  असते, असे म्हणतात." परंतु पुंडलिकाचे उदाहरण त्याला अपवाद होते. इतकेच नव्हे पण तो त्या वर्षीच अलाहाबाद विश्वविद्यालयाच्या मॅट्रिक ला बसून २ऱ्या क्लास मधे उत्तीर्ण हि झाला. हि विशेष नवलाची  गोष्ट आहे. डॉ संत जेव्हा ह्या घटनेचा उल्लेख कधी गप्पा गोष्टीत करीत असतात, त्यावेळी मोठ्या सलगीने म्हणतात, " त्या ९ महिन्यात मला फक्त तीनच गोष्टींची जाणीव असे - कुलदैवत दुर्गा देवी, माझी चिमुकली गृहस्वामिनी दुर्गा पत्नी व पुस्तके. मी इतके अविश्रांत श्रम करूच कसे शकलो ह्याचे माझे मलाच नवल वाटते. ७वी च्या वर्गात हमखास पास होणारच , असे समजले गेलेले विद्यार्थी नापास झाले , व त्यांतही मी मात्र दुसऱ्या श्रेणीत कसा पास झालो  कुणास ठाऊक. पण इतकी गोष्ट मात्र खरी आहे कि , माझ्या पत्नीने मला साहाय्य दिले नसते तर हे दिव्या माझ्या हातून कदापिही पार पडले नसते. "

(क्रमशः )

Tuesday 18 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ९ (a)...

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र

पहिला विवाह काळ
१९०८  ते  १९११

४ (अ )

लेखक : श्री दि.या. मार्डीकर

      पुंडलिकाची आई सौ यमुनाताई व मामा डॉ धोंडोपंत सुदुम्बरेकर यांचे बंधू भगिनी प्रेम असामान्य असे होते. दोघांचेही बालपण अत्यंत गरिबीच्या हलाखीत गेलेले. पण पुढील आयुष्यात सामाजिक प्रतिष्ठा व सांपत्तिक स्थिती दोघांनाही  समाधानकारक प्राप्त झालेल्या होत्या. हरिभाऊ संतांना जवळचे प्रेमाचे नातेवाईक कोणी नव्हते, त्यामुळे त्यांचाही ओढा सुदुम्बरेकर कडे साहजिकच असे. त्यात डॉ धोंडोपंतांना  वर्षे  झाली,तरी पोटी पुत्रसंतान नव्हते. लहानपणापासूनच मामा मामीचे प्रेम पुत्रवत पुंडलिकावर जडले होते. हरिभाऊ नोकरीनिमित्त वर्हाड, खान्देशातील अनेक शहरी असतांना उन्हाळ्याचे २ महिने यमुनाताई व मुले  नाशकास आपल्या बंधू कडे अनेकवेळा येणे  होत असे. तात्पर्य हे कि, पुंडलिकाच्या शिक्षणास्तव त्याचे  मामा मामीस आवडले. इ.स. १९०५ मध्ये पुंडलिकाच्या वडिलंबहीणीचे लग्न व त्याची मौंज हि कार्ये नाशकास त्यांच्या मामाच्या घरीच झाली होती. धोंडोपंतांची पत्नी गंगाबाई हि विंचूर येथील असल्यामुळे ह्या शुभ कार्यासाठी तिच्या माहेरची सर्व नातलग मंडळी पाहुणे म्हणून आलेली होती. गंगाबाईंची मावशी गोजराबाई व तिचे कृष्णराव यार्दी आपल्या मुलाबाळांसह आले होते. कृष्णराव यार्दी ह्यांची सुकन्या दुर्गा उर्फ चमी हि पण त्यात होती.
       डॉ धोंडोपंतांचे घर म्हणजे नेहेमीच पाहुण्यांच्या सत्काराचे घर होते. आलेले पाहुणे खुशाल महिना महिना वास्तव्य करीत. एके दिवशी पुंडलिक व दुर्गा ह्यांना खेळीमेळीने खेळताना पाहून कृष्णराव यार्दी  धोंडोपंतांना म्हणाले, " आमच्या दुर्गीला सून कराल काय ?  दोघांचा  जोडा कसा छान दिसतो पहा. " तेव्हापासूनच म्हणजे पुंडलिक ११ वर्षाचा व दुर्गा आठ वर्षाची असतांना गंमतीगमतीत त्यांच्या विवाहाचा वाङ्निश्चयाच झाला . पुढे सन १९०८ मध्ये बालविवाहाचे मूर्त स्वरूप धुमधडाक्यात साकार झाले.
      कृष्णराव यार्दी हे विंचूरकर संस्थानिकाकडे नोकरी करत होते. हे विंचूरकर  नाशकास राहावयास लागले होते. इ.स .१९०८ मध्ये वर्हाड मधील खामगावच्या हायस्कूलातील ३ऱ्या इंग्रजीचे शिक्षण पूर्ण करून पुंडलिकाने त्यानंतर नासिकच्या हाय स्कूल मध्ये मामाचे घरी राहून चवथ्या वर्गात प्रवेश मिळवला. तो आपल्या वयाच्या १४व्या  वर्षीच विवाहबद्ध झाला. त्या काळात मुलामुलींची लग्ने बहुतेक करून अश्याच प्रकारे बाल्यावस्थेतच वडीलधारी मंडळी उरकून घेत असत.
      विवाहापूर्वीच २ वर्षे पुंडलिक व दुर्गा दोघे एकमेकांना कित्येक प्रसंगी वाग्दत्त वधूवरांप्रमाणे भेटत असत. इ.स. १९११ मध्ये नासिकचे स्कूल फायनलचे शिक्षण संपले. पुंडलिकाला तेव्हा हायस्कूलात असतांना  ओढा लागला होता. त्यावेळेच्या स्कूल ऑफ आर्ट , मुंबई च्या ३हि परीक्षा तो अतिशय उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. चित्रकलेचे त्याचे शिक्षक त्याच्या चित्रांचे नमुने इतर विद्यार्थ्यांना आदर्श म्हणून अभ्यासावयास सांगत असत. त्याचा परिणाम म्हणून पुढील आयुष्यात चित्रकार होण्याची  महत्वाकांक्षा पुंडलिकाने  उराशी बाळगली होती. म्हणून १९११ नंतर नासिक सोडून तो मुंबईस आपल्या दुसऱ्या मामांकडे , म्हणजे वामनरावांकडें राहावयास आला. मुंबईला स्कूल ऑफ आर्ट चे पैंटिंग व ड्राफ्ट्समन असे दोन्हीही कोर्से मध्ये त्याने आपले नाव घातले होते. पण , मुंबईची हवा त्याला मानवली नाही. लहानपणापासूनचे सर्व जीवन मोकळ्या हवेत, पौष्टिक अन्नसेवनात व देशी व्यायाम व तालीमीत आणि मामाच्या प्रेमात व्यतीत झालेले होते.
      नाशिकात असतांना तालिमखान्यात देशी  बैठका, मुद्गल, मलखांब, कुस्ती ह्या प्रकारच्या व्यायामात वेळ जात असे. उलट मुंबईची हवा व मलेरिया मुळे त्याची प्रकृती  ढासळली. म्हणून मग चित्रकलेचा नाद टाकून , मुंबई सोडून नागपूरला आपल्या वडिलांच्याकडे यावे लागले. त्यावेळी इ.स. १९११ मध्ये हरिभाऊ , नागपूर येथील रामजी कणव जिनिंग फॅक्टरीत इंजिनीअर होते. एकाएकी एक दिवस काहीच पूर्वसूचना नसतांना पुंडलिक टांग्यातून आजारी अवस्थेत घरी आलेला बघून त्याच्या मातापित्याचे काळीज थरारले. त्याच्या वामनमामाने मुंबईहुन अश्या आजारी स्थितीत त्याला  दिले, ह्याबद्दल विस्मयचकित होणे साहजिकच होते. अंगात ताप , कंबर व पाय सुजून दुखत होते. आपल्या एकुलत्या एक मुलाचे दुखणे बघून हरिभाऊ घाबरून गेले .  लगेच त्याला डॉ बाळासाहेब परांजपे यांच्याकडे नेऊन त्याचा इलाज सुरु केला. खाण्यापिण्याची आबाळ , मुंबईच्या कोंदट हवेतील सहवास व मलेरिया तापाचा हा आजार आहे, असे डॉक्टर ने निदान केले. घाबरण्यासारखे काही नसून लौकरच तुमचा मुलगा बरा होईल, अश्या प्रकारे डॉक्टरने सांगितल्यामुळे सर्वांना धीर आला. २ महिन्यांनंतर त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली.
       पुंडलिकाने एके दिवशी हरिभाऊंचे त्यांच्या मित्राशी झालेले असे बोलणे ऐकले कि त्याचा, त्यांच्या पुढील आयुष्यावर फार खोल परिणाम झाला. हरिभाऊ म्हणत होते, " अहो, माझ्या वडिलांनी मला इंग्रजी शिकवले नाही व त्यामुळे माझ्यात बरीच योग्यता असूनही माझे जीवन खडतर निपजले. आमच्या संत कुटुंबात इंग्रजी शिकून अजून कोणीच मॅट्रिक झाले नाही. पुंडलिक मॅट्रिक होईल अशी मला फार आशा होती, पण ह्या पोरात तसे काहीच दिसत नाही. चित्रे काढण्याच्या मागे लागून तो आता बापाच्या जीवावर ऐतोबा बनून बसणार झाले. पुढे काय व कसे करावे हे मला कळेनासेच झालेले आहे. हा आपला एकुलता एक मुलगा . तेव्हा त्याला खूप पुढे आणायचे ह्या माझ्या आकांक्षेवर त्याने पाणीच फिरवले आहे. " हे भाषण दुःखातून बारा झालेला पुंडलिक लपून ऐकत होता. पि. डब्ल्यू .डी च्या ऑफिसमध्ये अँप्रेन्टिस ट्रेसर म्हणून जागा मिळवण्यासाठी तो त्या ऑफिस मध्ये खेट्या घालीत असे. त्याला वडिलांचे हे बोलणे फारच लागले. मग त्याने निश्चय केला कि एका वर्षात मॅट्रिक पास होऊन वडिलांना प्रसन्न करायचेच. अश्या प्रकारचा स्वतःशीच निर्णय करणे व्यक्तिगत दृष्टिकोनातून सोप्पे असले तरी त्याला वास्तव यशाचे दृश्य स्वरूप मिळवून देताना ज्यांची काहीही कल्पना नसते अश्या अडचणी उत्पन्न होत असतात. हाच कटुतर अनुभव पुंडलिकास येऊ लागला. एका रात्री त्यांनी आपली सर्व तर्हेची पैंटिंग्स आणि चित्रकलेचे सामान नागनदी मध्ये टाकून दिले. नदीच्या तीरावर बसून शोक केला व परत ध्येयसिद्धीकडे वळले.
      नागपुरातल्या हायस्कूलात मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून सर्व हायस्कूलच्या हेडमास्तरांकडे खेटे घालण्यास सुरुवात केली. त्याकाळी नागपूर विभागाच्या मॅट्रिकच्या परीक्षा ह्या अलाहाबाद विश्वविद्यालयाकडून होत असत. मॅट्रिक कोर्से तेव्हा दोन वर्षांचा असे व तो ६व्या व ७व्या  वर्गात शिक्षण देण्याच्या दृष्टीने विभाजित केलेला असे. २ वर्षापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे नाव शाळेच्या हजेरी बुकात नसेल त्याला मॅट्रिकच्या परीक्षेला बसायचा फॉर्म हेडमास्तर देऊ शकत नव्हते. त्याशिवाय मुंबईकडील स्कूल फायनल व अलाहाबाद विद्यालयाचे मॅट्रिक ह्या दोन्हींचा अभ्यासक्रम आणि विषय हे भिन्न असत. चित्रकला हा केवळ छंद म्हणून घरी शिकता येण्यासारखा विषय होता. पण, इंग्रजी बीजगणित भूमिती केमिस्टरी फिज़िक्स इंग्लंडचा इतिहास हे सर्व विषय मुंबईच्या स्कूल फायनल मध्ये नव्हते. ते येथे आवश्यक विषय होते. ह्या सर्व विषयांचे अर्धे शिक्षण नागपुरातील हायस्कूलमधून अगोदरच ६व्या वर्गात पूर्ण करीत असत. पण, पुंडलिकाच्या प्रत्येक हेड मास्तर पाशी हट्ट असे कि मला एका वर्षात म्हणजे १९१३ साली च मॅट्रिक व्हायचे आहे. मुंबईच्या स्कूल फायनल पास झाल्याचा दाखल मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी उपयोगी पडत नव्हता. मग हेडमास्तरांनी तरी काय करायचे ? प्रत्येकाने पुंडलिकाला समजावून सांगावे कि , "तू ६व्या वर्गात बैस म्हणजे २ वर्षांनी १९१६ मध्ये मॅट्रिक होशील. तू आमच्या शाळेची प्री -मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर मॅट्रिक मध्ये बसण्याची परवानगी आम्ही तुला देऊ. " पण पुंडलिकाला हे काबुल नव्हते. तो म्हणायचा , "मला यंदा (१९१६) च मॅट्रिक मध्ये बसायचेच आहे व पास करून दाखवायचे आहे. असा माझा निश्चय आहे."

(क्रमशः)

        

Friday 14 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सतगुरूचरित्र...भाग ८...

उदार कल्पतरू अर्थात सतगुरूचरित्र

बालपण व शिक्षण

लेखक :- श्री दिनकर यादवराव मार्डीकर

     आमचे कथानायक पुंडलिक हरी संत , ह्यांचे शैशव व बालपण फार थोडे दिवस मुंबईस गेले.जन्म झालेल्या विठ्ठल मंदिरात एका शिक्षकाने मुलांची खाजगी शाळा काढली होती. तिथे ते, वयाच्या चौथ्या वर्षापासूनच , त्यावेळी प्रचारात असलेल्या धूळपाटी पद्धतीने मुळाक्षरांचे वाचन लेखन शिकले. श्री गणेशाय नमः ह्या प्रथम पाठातील श्री हे अक्षर वळविताना "श्री " ह्या अक्षराला ते विठ्ठलमंदिराचा दरवाजा म्हणत असत. त्यांचे वडील , हरिभाऊ मुंबईतील अनेक कारखान्यातून यांत्रिक भागात काम करून कुटुंबाचे पालनपोषण करत असत. साधारण खालच्या स्तराचे काम करीत  असतांना सुद्धा त्यांचे यंत्रकलेचे विज्ञान  इतक्या उच्च प्रतीचे असे कि त्या काळातील उच्च परीक्षा उत्तीर्ण झालेले पदवीधर यांत्रिक काम  करणारे,त्यांना आपले त्या कलेतील गुरु मानत असत, आणि त्यांच्या अनुभवापासून फायदा घेत असत. अश्या उच्च यांत्रिक कलेच्या पदवीधर हितचिंतकांनी एकदा त्यांना म्हंटले, " तुमचे ज्ञान, विज्ञान ह्या कलेत इतके उच्च असूनही तुम्ही आमच्या प्रमाणे परीक्षेस बसून इंजिनियर चे प्रमाण पत्र का प्राप्त करून घेत नाही ?" त्यावर, हरिभाऊ म्हणाले, "या कलेचे परीक्षेत लागणारे सर्व ज्ञान इंग्रजीत आहे. माझ्या वडिलांनी हि भाषा मला शिकविली नाही . मग मला ते कसे जमावे ?" त्यांना त्यांच्या एका पारशी इंजिनीअर ने एक गुजराथी भाषेत लिहिलेला यांत्रिक विषयाचाच ग्रंथ दिला आणि सांगितले कि हे अध्ययन करून इंजिनीअर च्या परीक्षा पास करता येतात. त्याने अशी आग्रहाची माहिती दिली. त्याप्रमाणे हरिभाऊंनी नोकरी सांभाळून व अभ्यास करून आधी तृतीय श्रेणीचे आणि काही काळानंतर द्वितीयश्रेणीचे प्रमाणपत्र प्राप्त केले व ते इंजिनीअर बनले. त्या प्रमाणपत्रांच्या आधारे मग त्यांना वर्हाड खान्देश गुजरात राजपुताना इत्यादी प्रांतांतून , जिनिंग व प्रोसससिंग फॅक्टरीतून इंजिनीअर पदाच्या वरच्या नोकऱ्या मिळू लागल्या.
       तेव्हा मुंबई सोडून त्यांचे वास्तव्य नोकरीच्या निमित्ताने वारंवार बदलणाऱ्या शहरी होऊ  लागले.  इंजिनीअर च्या पहिल्या क्लास ची परीक्षा त्यावेळच्या रिवाजानुसार इंग्रजी भाषेतून होत असे.  परीक्षा हरिभाऊंनी पास करणे शक्य नव्हते व त्यामुळे ते फर्स्ट क्लास इंजिनियर होऊ शकले नाहीत. तरी त्यांचे अनुभवी ज्ञान कोणत्याही फर्स्ट क्लास इंजिनियरपेक्षा जास्तच  होते यात काही संशयाच नाही. त्यावेळच्या स्टीम व ऑइल पॉवरवर चालणाऱ्या मशिनरीचे ज्ञान विज्ञान त्यांना पूर्ण माहित होते. त्या वेळचे फर्स्ट क्लास इंजिनियर त्यांना आपल्या गुरूच्या असत व त्यांच्या अगाध अनुभव व ज्ञानापासून उपदेश व फायदा घेत असत.
      सन १९२४ साली त्यांनी वर्हाडातील खामगाव येथील श्रीराम गोपाळ फॅक्टरी ची  मशिनरी बदलवून कुणाही सुशिक्षित इंजिनीअर ची मदत न घेता  नवी मशिनरी  बसविली . त्यावेळी त्यांचे चिरंजीव पुंडलिक मराठी ३ऱ्या वर्गात तेथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होते. व त्यांचे वय १० वर्षाचे होते. तो काळ स्वदेशी मालाचा वापर व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या चळवळीचा होता. शाळेमध्ये एक आंदोलनकर्त्या व्याख्यात्याचे भाषण झाले. त्यात त्यांनी मुलांना चहा न पिणे व दिवाळीत फटाके न उडविणे, ह्या  विषयावर व्याख्यान दिले. त्याचा परिणाम  ध्येय विषयक संवेदनशील मनावर इतका जबर झाला कि , वयाच्या २१व्या वर्षापर्यंत सुद्धा घरातील इतर सगळे लोक चहा पीत असतांनासुद्धा तो स्वतः चहा घेत नसे. तसेच दिवाळीत फटाक्यांची हट्ट तर करणे दूरच राहिले पण आणलेल्या फटाक्यांना तर त्याने हातसुद्धा लावला नाही.
      त्यापूर्वी  पुंडलिक आपल्या वयाच्या सातवे वर्षी, आजोळी - मामाकडे नाशकात असतांना त्याने तेथील काळ्या  रामाच्या मंदिरात ह.भ.प. श्री पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली विदेशी कापडाची होळी करून स्वदेशी च्या पुरस्कर्त्यांनी सभा भरलेली असतांना, सात वर्षाच्या पुंडलिकाने नुकतीच घेतलेली जरी ची टोपी घातलेली होती. आपल्या मामासह तो तिथे व्याख्यानाला आला होता पण, तिथे इतर वक्त्यांची भाषणे ऐकून त्याने स्वतः व्याख्यान देण्याचा आपल्या मामांजवळ हट्ट धरला . हा त्याचा हट्ट पुरवण्याकरता मामाने त्याला १० ओळींचे व्याख्यान तिथेच तयार करून दिले. सभा मंडप चिक्कार भरला असतांना टेबलावर उभे राहून , ह्या चिमुकल्या वक्त्याने हावभावासकट पाठ केलेले १० ओळींचे भाषण केले. नंतर झालेल्या कपड्यांच्या  होळीत आपली जरीची टोपी पण  जाळून टाकली. याचा परिणाम घरी आल्यावर मातोश्रीने दिलेल्या त्याच्या पाठीवरील रामराट्टयात झाला हे वेगळे.  पण, लहानपणापासूनच  मनास पटेल त्या लहरींत अत्यंत ध्येयाने कर्म प्रवृत्त होणे हा त्याचा स्वभाव जन्मजातच म्हणावा लागेल.
      हरिभाऊंचा स्वभावसुद्धा फारच स्वाभिमानी. मालकांची हांजी हांजी करून नोकरी करणे त्यांना कधीच आवडले नाही. भांडवलशाहीची लुटालूट त्यांना जशी पसंत नव्हती तसेच मालकाच्या धंद्याकरता त्यांच्या हुकूमशाहीपुढे मान झुकवून त्याच्या कारस्थानात सहयोग  त्यांची नेहेमीच इच्छा नसे. असे प्रसंग येताच हरिभाऊ म्हणत, " हि सांभाळा तुमची नोकरी. मी, ती सोडून चाललो. " ह्या त्यांच्या स्वभावामुळे वाढत्या कुटुंबाचे पालनपोषण , मुलामुलींचे शिक्षण इत्यादी जबाबदाऱ्या असतांनासुद्धा हरिभाऊ फार वर्षे कुठेच टिकून राहू शकले नाहीत. त्यामुळे इंग्रजी ३ऱ्या वर्गाच्या खामगावास झालेल्या शिक्षणानंतर , पुंडलिकास नासिक येथे आपल्या मामा डॉक्टर धोंडोपंत ह्यांच्या घरी पुढील शिक्षणाकरता आईवडिलांना सोडून राहणे भाग पडले. तिथे त्यांनी नासिक हायस्कूलात प्रवेश घेतला.

(क्रमशः )

Wednesday 12 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ७ ...

सद्गुरू चरित्र
२ 
लेखक : श्री दिनकर य मार्डीकर


      डॉ पुंडलिक संत यांचा जन्म कार्तिकशुध्द एकादशी , गुरुवार शके १८१६ इंग्रजी ता २३ नोव्हेंबर १८९४ रोजी परळ, मुंबई येथील एका विठ्ठल मंदिरात झाला. श्री क्षेत्र पंढरपूर च्या यात्रेचा तो शुभ दिन म्हणून त्यांच्या आईवडिलांनी आपल्या बालकाचे नाव पुंडलिक ठेवले . त्यांचे आजोबा आप्पाजी संत हे त्यांच्या पुणे जिल्ह्यातील खेड मंचर जवळच्या चासना रोडी ह्या वतनाच्या व शेतीच्या गावावरून येऊन बऱ्याच वर्षांपूर्वी , त्या मंदिरात राहून पूजा अर्चा व विठ्ठल सेवा  करीत असत.
      डॉ संतांच्या जन्मकाळी त्यांचे वडील हरी अप्पाजी संत हे मुंबईतील अनेक कारखान्यात यांत्रिक विभागात नोकरी करून विठ्ठलसेवेचे वृत्त हि चालवत असत. श्री क्षेत्र चिंचवड येथील भूतपूर्व दिवाण - बाळोबा देव पुढे नामनिदान बदलून क्ष्रीसागर ह्यांच्या यमुनाबाई कन्येशी हरिभाऊ संतांचा विवाह होऊन डॉ पुंडलिक संत ह्यांचा जन्म झाला. अप्पाजी संतांच्या हयातीत ते मंदिर अजूनही भाऊंचे मंदिर ह्या नावाने ओळखल्या जाते. हे देवस्थान एका प्रभू जातीच्या श्रीमंत सार्वजनिक काम करणाऱ्या ठेकेदार इसमाचे होते.त्याचे नाव आणि त्याच्या नावाचा भाऊंचा धक्का अजूनही मुंबई बंदरात आहे, भाऊ ठेकेदाराच्या मृत्यूनंतर ते मंदिर त्यांच्या जावयाच्या मालकीचे झाले. मंदिराजवळ त्यांचा बंगला असे. विठ्ठलाचे मंदिरात मांस मटण आणणे, मदिरापान करून मंदिराच्या पावित्र्यात बाधा आणणे इत्यादी  प्रकार मालक म्हणून बाबाजी दिनकर ह्या जावयाने जेव्हा आरंभिले तेव्हा, हरिभाऊ व सौ यमुनाबाई यांनी एका रात्री जवळ जवळ वीस वर्षांचे त्यांचे विठ्ठल मंदिरातील त्यांचे वास्तव्य सोडले आणि मुंबईतील एका भोईवाडा नामक भागातल्या नरगुणदासाच्या चाळीतील लहानश्या खोलीत आपला शांत स्वभावी गरीबाचा संसार थाटला.
      अनेक हितचिंतकांनी हरीभाऊला सल्ला दिला , कि कायद्याप्रमाणे वहिवाटीचा हक्क प्रस्थापित करून तुम्ही मंदिराचे मालक होऊ शकता. परंतु हरिभाउने त्यांना सांगितले कि , "परधनापाहार मला करावयाचा नाही. संत कुटुंबात कर्तबगारी असेल तर मी किंवा मुले, स्वतः ची घरे , मंदिरे आणि धर्मशाळा बांधू शकतील."
       संत आडनाव असणारी देशस्थ ब्रह्मण कुटुंबे ,  खेडमंचर , वाडगाव , चासकमान, महाकुंगे,  घोडे, ओतूर,इत्यादी पुणे जिल्ह्यातील अनेक  शहरातून  तसेच ग्वाल्हेर, झाशी , सागर इत्यादी शहरातूनही आहेत. परंतु ह्या सर्व संत कुटुंबांची मूळ शाखा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर ह्या गावची आहे. तिथे संत घराण्याच्या मूळ पुरुषाची समाधी आहे, त्यांनी सन्यास घेऊन ह्या गावातून प्रयाण केले होते. या मूळ पुरुषावरूनच सर्व शाखा - उपशाखा 'संत' हे नामनिदान मिळाले असले पाहिजे.


(क्रमशः )

Friday 7 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ६ ...

ll श्री सत्गुरुवे नमः ll
 उदार कल्पतरू ...
लेखक :- श्री दिनकर यादवराव मार्डीकर
   
      एखाद्या निर्जन खडकाळ  मार्गानी भर मध्यान्ही उन्हाळ्यात पायी प्रवास करण्याचा प्रसंग यावा, शरीर श्रमाने क्लान्त  झालेले , घामाने निथळत असलेले,  तृष्णेने त्रस्त व विश्रांती करता आळसलेले असावे पण त्याकरता एकही  योग्य जागा दृष्टीस पडत नसावी, अशावेळी शरीराची व मनाची  काय केविलवाणी  अवस्था होते ह्याची कल्पना त्या प्रसंगातून गेलेल्या माणसांनाच करता येईल. अश्या अवस्थेत वाटेवरच्या पथिकाला अचानक  दूर एखादा वृक्ष दिसला तर त्याला कोण आनंद होतो ! हा हि अनुभव त्याला आलेला असतोच. माझ्या जीवनात मला कष्टप्रद तसेच  सुखपूर्ण असे दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. माझ्या प्रवासाचा रस्ता म्हणजे माझ्या जीवनातील __ वर्षाचे वय होय.
      उच्चशिक्षण , चांगल्या पगाराची व मान प्रतिष्ठेची नोकरी , सुस्वरूप सुस्वभावी प्रेमळ कर्तबगार व सुग्रण भार्या  इत्यादी सर्व वांछित जागतिक सुख समृद्धीने माझा क्रमित जीवन मार्ग विलोभनीय  दिसत होता तरी माझा अंतरात्मा आतल्या आत दुःखितच राहत असे. अधिकाधिक आधिभौतिक  मिळूनही त्याचा  उपभोग घेणे व  कनक आणि कीर्ती यांच्या चतुःसिमेत नेहेमी गुरफटून राहणे - हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असावे काय ? या  नित्य परिवर्तनशील व  परिणामी असंतुष्टतेत  होणाऱ्या सुखाशिवाय आदी परमोच्च सुख मिळवण्याचे शाश्वत स्थान कोणते ? व मानव ते ह्या जन्मी प्राप्त  शकतो का ? आणि तसे काही प्राप्त होत असले तर  साधना कोणती ?
      ह्या प्रकारच्या अनेक प्रश्नरूपी उन्हाळ्याच्या उष्णतेने मी आतल्याआत  कासावीस होत असे. पौर्वात्य व  पाश्चिमात्य  तत्वज्ञान विषयांचा , तसेच भगवदगीता, बायबल, कुराण, तुकाराम, समर्थरामदास, कबीर साहेब, सूरदास,  तुलसीदास,ज्ञानेश्वर इत्यादी संतांच्या  रोमांचकारी भक्तिरसाने भक्तिरसाने ओथंबलेल्या ग्रंथांच्या सखोल अभ्यासाने माझ्या तळमळालेल्या जीवनाची ज्ञानतृष्णा  शांत होईल , या  आशेने प्रयत्न करण्यात बराच काळ  लोटला. परंतु माझ्या जीवन  आत्म्याचा प्रवास पुर्वीप्रमाणेच कष्टप्रद खडकाळ निर्जन उन्हाळ्यातील मध्यान्हकालीन प्रवासाप्रमाणेच मला प्रतीत होत राहिला. श्रमातीशयाने येणारी बौद्धिक मूर्च्छा , अंतिम परमोच्च सुखाची पिपासा व घनघोर निराशा यांच्या संगतीत मी त्या जीवनमार्गावरून सर्व साधने करीत आशायुक्त निश्चयाने चालतच राहिलो. परत फिरून पुन्हा भौतिक सुखवासनेच्या परिपूर्तीच्या प्रलोभनास बळी पडावयाचे नाही अशी एक पुढे पुढे ओढणारी आंतरिक ओढ मला मागे परतूही देईना व स्वास्थही बसू देईना, अशा शारीरिक आणि मानसिक तळमळणाऱ्या केविलवाण्या अवस्थेंत एक वृक्ष मला दिसला. तो माझ्या मार्गात जणू काही माझ्या व्यथेने कृपावंत होऊन माझ्या मागे  स्वतः च आला.
      "बैठ जाता हूं जहां छाह घनी होती है" असे एका हिंदी भाषेच्या कवीने म्हंटल्याप्रमाणे मी , त्या वृक्षाखाली  श्रमपरिहारार्थ जाऊन बसलो.
      परंतु क्षणार्धात मला या वृक्षाच्या परम शीतल छायेचा जो अनुभव आला तो अवर्णनीय आहे. थोडक्यात सांगायचे तर, असे म्हणावे लागेल कि हा वृक्ष साधारण उद्बिज सृष्टीतील नसून, ज्याचे वर्णन पूर्वीच्या काळच्या प्रतिभावान कवींनी केलेले आढळते, हा तो कल्पतरू वृक्षच होता. आधिभौतिक सुख समृद्धीच्या सर्व वांछित कामना पूर्ण करणारा वृक्ष म्हणजेच , कल्पतरू - जो कि ,  पुराणात वर्णन केलेल्या कल्पवृक्षाहूनहि , मला आश्रय देणारा सर्वश्रेष्ठ व उदार कल्पतरू असला पाहिजे म्हणून मी त्याला उदार कल्पतरूंची उपमा दिली आहे. कारण साधारण कल्पतरू मनोवांछित पूर्ण  अशाप्रकारची कवी कल्पना आहे, पण हा उदार वृक्ष मनोवांछित तर पूर्ण करतोच  करतो,परंतु ह्याचे औदार्य , प्रेम आणि कृपा अवर्णनीय , अनिर्वाच्य एवं अद्वितीयच म्हणावी लागेल.कारण तो सर्वकाम  कल्पद्रुम असून आश्रितांना सरवैश्वर्य योगयुक्तीने सर्व कामना मुक्त करून टाकतो. " उभा कल्पवृक्षा तळी भीक मागे असा सर्व भूमंडळी कोण आहे" ह्या संतांच्या  उक्तींची साक्ष मला त्या माझ्या आयुष्यातील एका चिरस्मरणीय प्रसंगाने पटली.
      ह्या माझ्या लाक्षणिक वर्णातील आपल्या प्रेमकृपेची मला औदार्याने जन्मभर सावली देणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून तो उदार कल्पतरू म्हणजेच माझे सद्गुरू डॉ पुंडलिक हरी संत माझ्या उद्धारासाठी ज्या दिवशी नरसिंह परमात्म्याप्रमाणे स्तंभातून सद्गुरू रूपाने म्हणजे उदार कल्पतरू प्रमाणे प्रकट झाले त्या दिवशीच्या माझ्या परमानंदाचे वर्णन करण्यास  भक्तशिरोमणी देविदास म्हणतात त्याप्रमाणे , "अठरा भार वनस्पतीची लेखणी l समुद्र भरला मशी करुनि l  तरी माझा आनंद लिहिता धरणी l लिहिला ना जाय गोविंदा ll "ह्या मूळ रचनेत थोडा फरक करून मला म्हणावे लागते. ध्यानी मनी नसता तो अविस्मरणीय उगवलेला शुभदिन ता. ६ जुलै १९४८ चा होता.
      डॉ संतांच्या व्दितीय चिरंजीव गजानन ह्याच्या लग्नाचा समारंभ , नागपूर येथील मेयो हॉस्पिटल मध्ये त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे डॉ विनायकराव संत रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर - यांच्या घरी होता. त्यांच्या बंगल्यात हा सोहोळा डॉ विनायकराव ह्यांच्या इभ्रतीला शोभेल अश्या भव्य प्रमाणात साजरा झाला.
      डॉ पुं ह संत आपल्या व्दितीय पुत्राच्या लग्नानिमित्त बिलासपूरहुन नागपूरला सहकुटुंब सहपरिवार घेऊन आले होते. नागपूरच्या त्यांच्या अनेक नातलग मंडळीत ते माझे मेव्हणे म्हणून मलाही ह्या समारंभाचे निमंत्रण होते. लग्न प्रसंगाच्या अनेक धार्मिक व लौकिक कार्यक्रमातून निवृत्त झाल्यावर रात्री भोजनानंतर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता - तो म्हणजे डॉ पुं ह संत ह्यांचे भागवदगीतेवरील प्रवचन हा होय. यापूर्वी मी गीतेवर अनेक विद्वानांची प्रवचने ऐकली होती . परंतु लग्नासारख्या प्रसंगात गाण्याबजावण्याचे मनोरंजक कार्यक्रम न ठेवता , विहहित वरच्या वैद्यकीय व्यवसायातील पिता , गीतेवर प्रवचन करणार आणि त्यासाठी सर्वांस आमंत्रण दिले आहे , हे जाणून मला फारच आश्चर्य वाटले. विशेष श्रद्धेने नसेल , पण कुतूहल म्हणून मी हि श्रोतेवृंदात जाऊन बसलो. गीतेवर भाष्य करताना कोणाही भाष्यकाराने आजपर्यंत  स्पर्श केला नव्हता असा श्री डॉ संतांच्या प्रवचनाचा अलौकिक व अपूर्व विषय होता.
      भगवान श्रीकृष्णांनी गीतेतून अर्जुनाला दिलेला "दिव्यचक्षुचा प्रत्यक्ष प्रयोगात्मक साक्षात्कार" हा विषय त्यांच्या वक्तव्याचा होता. त्यांच्या ओजस्वी वैखरी वाणी ने व सहज आकलनिय सिद्धांतिक युक्तीने या दिव्यचक्षुतत्त्वाचा मला त्याच वेळी प्रत्यक्ष अनुभव आला. देशकाल, परिस्थितीची जाणीवच नाहीशी झाली. अंतःकरण उपदेश प्रसादाने प्रफुल्लित होऊन उचंबळून आले. अष्टभाव प्रगटीकरणामुळे तिथे बसणे  अशक्य होऊन मी त्याच वेळी एकटाच स्वगृही परतलो. रात्रभर डॉ संतांनी दिलेल्या अपरोक्ष अनुभवाची पूर्वीच्या ग्रंथवाचनाने प्राप्त झालेल्या परोक्ष ज्ञानाशी तुलना करतानाच प्रातःकाळ केव्हा झाला हे कळलेच नाही.  निद्रा, क्षुधा,तृष्णा, इत्यादींचे भान हरपून सकाळी जाऊन डॉ संतांच्या चरण कमलावर लोटांगण घालून त्या सद्गुरू माऊलींचे जेव्हा दर्शन घेतले तो सुख सोहोळा अवर्णनीय होता, मगच माझ्या चित्ताला समाधान लाभले. अशा प्रकारे - " गुरुमहाराजगुरु l जय जय परब्रम्ह सद्गुरू l चारी मुक्तिदायकदाता l उदार कल्पतरू ll "   - ह्या  सद्गुरूस्तवनाचे रहस्य मला माझ्या काहीतरी पूर्वसुकृताने प्रगट  झाले.
      तसे म्हणले तर डॉ संतांचे लौकिक व्यक्तिमत्व मला अपरिचित नव्हते. स. १९२२ मध्ये व त्याच्या काही वर्षांपूर्वीच ते माझ्या जीवनात आले होते. बिलासपूरच्या जेल व पोलीस हॉस्पिटल च्या  सरकारी नोकरीत  ते डॉक्टर असताना , त्यांनीच आपल्या भगिनीशी माझा विवाह घडवून आणला होता. त्यांच्या बहिणीवर त्यांचे नितांत पितृतुल्य प्रेम असल्यामुळे , तिच्याकरता म्हणून त्यांच्या नित्य होणाऱ्या नागपूरच्या दौऱ्यात ते अधून मधून मला भेटत असतंच. परंतु  त्यांच्या , त्या  दिवशी प्रगट झालेल्या अध्यात्मिक अधिकाराची  पुसटशी कल्पनाही मला त्यांनी कधीही दिली नव्हती. त्यावेळच्या मध्य प्रांतीय मेडिकल एक्झामिनेशन बोर्ड, मेडिकल कौन्सिल , नर्सेस कौन्सिल, रेडक्रॉस मध्य प्रांतीय कमेटी , मध्य प्रांतीय ऑल इंडिया मेडिकल सायसेन्शिएट डॉक्टर्स अससोसिएशन इत्यादी संस्थेत ते नियुक्त व निवडून आलेले सदस्य असल्याने, नागपुरात होणाऱ्या त्या संस्थांच्या अधिवेशनांकरता त्यांना आपले बिलासपूरचे खासगी काम सांभाळून दर ३-४ महिन्यांनी नागपुरास यावे लागे. तेव्हाही त्यांचा माझा संबंध भेटीगाठींच्या रूपाने बराच वेळा आला होता. परंतु त्यांनी अध्यात्मिक विषयाबद्दलचे बोलणे माझ्याशी केले नव्हते. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या सद्गुरूपदावरून "दिव्यदृष्टी" प्रदानाचा प्रसाद दिल्यावर आजपावेतो त्यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील विशाल कार्य व त्यांचा व माझा अधिकधिक घनिष्ठ संबंध वारंवार आला. माझ्या कौटुंबिक जीवनात आजपर्यंत अनेक संकटे व दुर्धर दुःखाचे अनेक प्रसंग आले. डॉ संतांच्या सदगुरुत्वाची व प्रेमाची साथ मिळाली नसती , तर त्या सर्व संकटांतून मी सुखरूप निभावली नसतो.
      अश्या तर्हेने आपल्या संपूर्ण जीवनाचे सिंहावलोकन करताना - ता. ३० जुलै १९६७ रोजी प्रातःकाळी ४ वाजता मला अशी एक अंतस्थ प्रेरणा झाली कि सद्गुरू ऋणातून अंशतः तरी मुक्त  दृष्टीने मी सद्गुरू डॉ संत यांचे आत्मचरित्र संक्षिप्तरित्या लिहून काढावे. त्या अनिवार्य प्रेरणेमुळे प्रस्तुतचा , "उदार कल्पतरू " हा  लहान ग्रंथ लिहावयास घेतला आहे. ह्या लेखनाचा हेतू आत्मश्लाघेचा नाही परंतु केवळ सद्गुरूपदाबद्दल मला वाटणारी कृतज्ञता हा आहे. ह्या आधी मी, बुद्धावतार चरित्र, Divine Vision , गीतायण  इत्यादी अनेक ग्रंथ आणि कविता  हिंदी,मराठी व इंग्रजी भाषेतून लिहिल्या. हे सर्व मी जनताजनार्दनच्या सेवेत सादर केलेलेच आहेत. आणि हे सर्व ग्रंथ अध्यात्म विषयी तज्ञांच्या आदरास पात्र झाले आहेत. परंतु हा लहान ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन कृतज्ञेच्या भावनेचे असून सद्गुरूच्या प्रेमाचे व भक्तीचे द्योतक आहे. वास्तविक सद्गुरुपद आत्यंतिक निरपेक्ष असते. ज्यांनी सर्वैश्वर्य योगाचे आणि विश्ववैभवाचे दान, न मागताच माझ्या पदरी बांधून दिले व मला आजन्म कृतकृतज्ञ केले त्यांची उतराई होणे , इतर कोणत्याही  मार्गाने अशक्य आहे. परंतु परमोच्च सुखाचा स्वानुभव प्रदान करणाऱ्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता वाटणे व ती यथाशक्ती यथामती कोणत्या न कोणत्या तरी रूपाने प्रगट होणे हाही  मनुष्यस्वभावच आहे. त्या प्रकृतीतीनुसार त्यांनी नको नको म्हंटले तरी बालहट्ट धरून त्यांचे आत्मचरित्र  एक प्रयत्न माझ्याकडून केल्या  गेला आहे. त्यात यश  अपयश देणे हे विधिलिखित असते म्हणून त्याची काळजी करण्याचे मला काहीच कारण  नाही,
सद्गुरू समर्थ आहेत.


(क्रमशः)   
      

Sunday 2 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ५ ...

प्रकाशकाचे हृद्गत 
विश्वसेवक 
प्रकाशानंद चैतन्य

' सद्गुरुचरणी , दंडवत असो, l
प्रेम सदा वसो चित्ती माझ्या ' ll (सर्वांगयोग  १-१ )
यावरी 'भक्ती'चे पीक उगवते ;  l
'अकर्म' द्वारे ते दिसू लागे ll (सर्वांगयोग  ८-१ )

प्रस्तुत 'उदार कल्पतरू' नामक , विज्ञानाचार्य श्री दी.या. मार्डीकर लिखित , सिद्धाचार्य श्री सर्वांगानंद चैतन्य (पुर्वाश्रमीचे डॉ.पुं.ह.संत) यांचे जीवन चरित्र जनता जनार्दनाचे सेवेत प्रकाशित करण्यात मला अतीव आनंद होत आहे. वर उद्घृत केलेल्या अभंगानुसार सद्गुरू व सत् शिष्य यांचे अनन्य प्रेम संबंधातून परिपक्व झालेले हे भक्तीरसाचे पीकच प्रगट झाले आहे , असे म्हणणे सार्थ होईल.

भाग्वद्गीतेसारखा दिव्यचक्षुजान्यअनुभवमूलक अप्रतिम सिद्धान्तिक ग्रंथ लिहूनसुद्धा श्री व्यासजींना आत्मशान्त्यार्थ आपले सद्गुरू श्रीकृष्ण यांचे चरीत्रवर्णन करण्याची आवश्यकता भासून 'भागवत' ग्रंथाची निर्मिती झाली. तत्वतः तश्याच प्रेरणेची हा चरित्रग्रंथ फलश्रुतीच होय.

भग्वदकृपेने या अनुक्रमे नर-नारायण बीजधारण करणाऱ्या दिव्य विभूतींचा व माझा , ह्यांनी दिव्यदृष्टीचा अनुभव ग्रहण केल्यापासून अर्थात वीस-पंचवीस वर्षांचा निकट संबंध असल्याने हे 'प्रकाशकाचे हृद्गत' देण्याचे कार्य माझेकडे आले आहे ते यथामती पार पाडण्याचा हा प्रयत्न आहे.

श्री सर्वान्गानान्द्जी हे जीवनचरित्र छापून प्रसिद्ध करण्याविषयी एका पत्रात म्हणतात , -
"आमच्या दृष्टीने ह्या घटनेस मुळीच किंमत नाही. पूर्वी झालेली, होत असलेली व भविष्यात होऊ शकणारी विश्वरूपाची सेवा यालाच आम्ही जीवन चरित्र समजतो. हे सर्व चरित्र भगवंताचेच असून करता करविता सद्गुरूच आहे. ही आमची अटल धारणा. परंतु भक्तांचे लाड पुरविणे कधी कधी क्रमप्राप्त होते , म्हंणून आम्ही या कार्यास अनुमती दिली."

सद्गुरुस्वरूप व्यक्तीची ही धारणा व प्रेरणा , यथार्थ असून हा चिरस्थायी भाव आहे , हे भक्त जाणतो. तथापि परम्काल्यानाचा मार्गदर्शन करणाऱ्या सद्गुरुन्विषयी त्यास कृतकृत्यता वाटून जीवन चरित्र लिहिण्याची क्वचित याप्रमाणे स्फूर्ती होणे हेसुद्धा स्वाभाविकच आहे, हे मानवी जीवनाचा आध्यात्मिक इतिहास पाहिल्यास स्पष्ट होईल. अश्याप्रकारचे चरित्रवर्णनात विश्वप्रेम एवं भक्तिरसाची पदोपदी अभिव्यक्ती होऊन साहित्य रचनेत त्यास एक आगळेच स्थान प्राप्त होत असते व विश्वजीवानाचा परम आनंद प्राप्त करण्यास इतरांसही ते प्रेरक होते.

मागे श्री मार्डीकरांना नवंबुद्ध अवतार भगवान श्री मायानंद चैतन्य यांचे जीवनचरित्र लिहिण्याची प्रेरणा होऊन अल्पावधीतच हिंदी भाषेत तो चरित्रग्रंथ लिहून त्यांनी पूर्ण केला व तो १९५२ मध्ये प्रकाशित झालाच आहे. श्री मायानान्दांचा प्रत्यक्ष संबंध आला नसता, त्यांनी वर्तमांयुगी आविष्कृत केलेली दिव्यदृष्टी परंपरेने श्री डॉ.संतांकडून १९४८ च्या सुमारास श्री मार्डीकरांना प्राप्त झाल्यावर विश्वहीतार्थ ग्रंथादी लेखनाद्वारे विज्ञान क्षेत्रात प्रचंड गतीने पदार्पण करून ह्यांनी स्वतःचे अद्वितीय विभूती तत्व स्वयं प्रस्थापित केले आहे. १९५० मध्ये Divine Vision, १९५१ मध्ये गीतायण , १९५२ - भगवानाचे चरित्र , मराठी व हिंदीत बहुविध पथ्य काव्य रचना ती वेगळीच. अशी त्यांची कार्याची विलक्षण झेप आहे. भगवंताच्या व्यापक विश्वचरित्राचे परिपूर्णतेचा साक्षात्कार त्यांना आता आपले सद्गुरुस्थान श्री सर्वांगानंद चैतन्य यांचे द्वारा झाल्याने , भगवंताचे चरित्रलेखनात शेष राहिलेली त्यांची अतृप्तता या चरित्रग्रंथात तृप्त होणे हा ईश्वरी संकेतच म्हणावा लागेल.

श्री मार्डीकर यांची अर्धांगिनी सौ चंद्रिकादेवी यांना पण श्री डॉ संतांकडून , १९४८ मध्येच दिव्याचक्शुचा अनुग्रह (श्री मार्डीकरंबरोबरच ) झाला, तेव्हापासून त्या भगवत्कार्यात आपले पतीस सर्वोतोपरी साहाय्य करीत आल्या आहेत. अर्थात त्यांची प्रेरणापण ह्या चरित्रग्रंथ लेखनात संमिलीत आहेच. वर्तमानकाळी भगवतसेवेत अनन्य भावाने असा रत झालेला पुरुष -प्रकृर्ती (दिनकर-चंद्रिका ) योग क्वचितच दृष्टोत्पत्तीस येतो.
भक्तिरसाची गंगा वाही , पावन होती घट l
विश्वप्रेम हे दुथडी वाहे, अमर ज्योती प्रगट  ll
मानव जीवन सुखी कराया , प्रभू हो अवतरला l  
दिव्य दृष्टीचा शंख फुंकुनी , दिव्य नाद केला  ll 
ऐका ऐका सर्व विश्वजन , प्रभूचा संदेश  l 
कृतार्थ जीवन प्राप्त होऊनी , हरण होती क्लेश ll    

विश्वप्रकृर्तीचक्राचे नियमानुसार वर्तमान कलियुगाचा लय होऊन आगामी काळात सतयुगाची अभिव्यक्ती होणार आहे. तन्निमित्त गीतेतील , 'यदा यदा हि धर्मस्य ...' ह्या संकल्पानुसार भगवन मायानंद चैतन्य ह्यांचे अवतरण होऊन त्यांनी कालगतीत लुप्त झालेला दिव्यचक्षुयोग पुनश्च आविष्कृत करून युगक्रांतीचे हे बीज भारत देशात सर्वत्र पेरले आहे. ही प्रवाहित झालेली अनुभावगंगा परंपरेने श्री डॉ.संत यांच्यात १९४३ मध्ये प्रविष्ट होऊन त्यांचे दिव्य विभूतीत्व तत्काल जागृत झाले व अल्पावधीतच त्यांनी विज्ञान क्षेत्रात स्वस्थान ग्रहण केले . अशा अनेक जन्मासंसिद्धीवान दिव्यचक्षुमधे स्ठीतीप्राप्त महापुरुषाचे जीवन चरित्र विज्ञानी भक्तजनांस निःसंशय मार्गदर्शक तथा स्फूर्तीदायक व इतरांसही भगवदसिद्धांत ग्रहण करण्यास प्रेरक होईल.



अशा पुरुषाचे दृश्य चरित्र सदैव विश्वैक्यात्मभावास परीलाक्षित करून असते, हे स्वयं श्री सर्वान्गानन्द्जींच्यावर उद्घृत केलेल्या पत्राच्या उतार्यावरून स्पष्टच होते व धर्मासंस्थापनेस मुलभूत असलेली ही भगवदकार्य भूमिकाच आहे. अर्थात ह्या चरित्रग्रंथात अनुभव एवं सिद्धान्तनिरुपण जरी नसले तरी चरित्रनायकाच्या अनुभवप्रेरित विश्वजीवानाच्या प्रवासाशी समरस झालेल्या लेखकाचे हृदगतसुद्धा अमरजीवनरसाने परिपूर्ण होऊन त्याचीच पखरण सर्व चरित्रग्रंथात व्यक्त होणे ही लेखकाच्या निज आत्मसाक्षात्काराची सिद्धीच होय - गुरुशिष्य भावाची विलयावस्था येवून विश्वरूप सदगुरुत व्यष्टीभावाची आत्माहुती एवं आत्मसमर्पण ते हेच. हा अत्यंत हृद्य प्रसंग आहे.

या अनुपम भक्तीरसगाथेत या स्वल्पलेखनाद्वारे मला श्री मार्डीकरांनी सहभागी केले आहे, हे मी स्वतःचे महत्भाग्य समजतो.

विज्ञानी भक्तजन य चरित्रग्रंथाचे सहृदयतेने स्वागत करतीलच व इतरजन पण यापासून अवश्य प्रेरणा घेऊन भगवंताचे धर्मस्थापना कार्यात उत्ततोत्तर सहभागी होऊन आत्मकल्याण तथा विश्वकल्याण साधण्यास प्रवृत्त होतील अशी माझी निश्चित धारणा आहे.

औरंगाबाद
दिनांक :०६-०२-१९६८

(क्रमशः )