Wednesday 26 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १० ...


मॅट्रिक नंतर 

लेखक :- श्री दी या मार्डीकर 

      माणसाच्या जीवनात काही  घटना अशा घडतात कि त्यामुळे त्याचे पुढचे आयुष्य अचानक वेगळेच वळण घेते. त्याच प्रमाणे मॅट्रिक ची परीक्षा १९१३ मध्ये पास झाल्याने पुंडलिकाचे पुढील जीवन सर्वस्वी बदलले हे  मात्र खरे. त्याच्या वडिलांना आनंद झाला . अर्थात तो आनंद अवर्णनीय असा होता.
      हरिभाऊंचे मासिक उत्पन्न जेमतेमच होते व वाढत संसार होता. ३ मुली शाळेत शिकत होत्या व त्यांचे वय लग्नाचे होत चालले होते. त्यांच्या अतिशय स्वाभिमानी स्वभावामुळे आणि पुंजीपती मालकाच्या लहरीपणामुळे त्यांची नोकरी कधीही एके ठिकाणी कायमची टिकत नसे.  तरी पण इतक्या हिरीरीने व अविश्रांत श्रम घेऊन, मॅट्रिक पास होणाऱ्या पुंडलिकास त्याच्या मनासारखे विश्वविद्यालयीन उच्च शिक्षण  देण्याचा  त्यांनी आपला मनोनिग्रह  सांगून,त्याला पुढच्या शिक्षणाची विचारणा केली. पुंडलिकाने काही आपल्या मित्रांच्या सल्ल्याने वैद्यकीय शिक्षणाची निवड  केली. त्याकरिता मुंबई च्या ग्रांट मेडिकल कॉलेज मध्ये त्यावेळच्या एल. एम अँड एस च्या डिग्री कोर्से मध्ये प्रविष्ट होण्याचे पुंडलिकाने ठरवावे , असे हरिभाऊंचे मत होते. परंतु कुटुंबाची इतर जबाबदारी लक्षात घेऊन सतत ५ वर्षे दरमहा रु १००/- खर्च होतील, या कारणामुळे पुंडलिकाने मुंबई चे हे शिक्षण  घेण्याचे नाकारले. हरिभाऊंनी  अनेक रीतींनी त्याची समजूत घालून पहिले व सांगितले कि, यासाठी त्यांच्या मिळकतीचा अर्धा हिस्सा जरी खर्च झाला तरीही  हरकत नाही. ५ वर्षे गरिबीत काढून पुंडलिकाचे शिक्षण पूर्ण करण्याचे  ठरवले . परंतु पुढे येणार असणाऱ्या धाकट्या बहिणीचा  लग्नाचा विचार करून , पुंडलिकाने स्पष्ट सांगून टाकले कि, वडिलांचा उदारपणाचा फायदा घेऊन सर्व कुटुंबास दीर्घ आर्थिक अडचणीत ठेवण्यास मी कधीही तयार होणार नाही. म्हणून त्याने ह्या गोष्टीस साफ नकार दिला.
      परंतु सुदैवाने त्याच वर्षी सन १९१४ मध्ये नागपुरात नव्यानेच स्थापन झालेल्या रॉबर्टसन स्कूल मध्ये पुंडलिकास प्रवेश मिळाला. ह्या एल. एम. पी च्या वैद्यकीय शिक्षणात हरिभाऊंचा विशेष खर्च ही झाला नाही. कारण विद्यार्थ्यांना ४ वर्षेपर्यंत दरमहा रु १२ शिष्यवृत्ती व अभ्यासाची सर्व पुस्तके सरकारी खर्चाने मिळत असत. त्याशिवाय शरीर शास्त्र (anatomy) व शरीर स्वास्थ्य शास्त्र   (physiology) ह्या विषयांचे नकाशे   (Diagrams)  चित्रित करून ते शाळेला विकून पुंडलिक द्रव्य मिळवत असे. १९१८ सालच्या अंती येथील ४ वर्षाचा मेडिकल शिक्षण क्रम पूर्ण करून त्याने त्याच वर्षांपासून मध्य प्रांतीय सरकारी वैद्यक खात्यामध्ये दरमहा ४५ रु  सब - अससिस्टन्ट सर्जन ची नोकरी मिळवली. पहिल्या ३ वर्षे पावेतोची नोकरी अत्यंत हाल अपेष्टांची अशीच होती. संसर्गजन्यक रोगप्रतिबंधक खात्यातील त्या नोकरीत नित्य प्रवास करावा लागेच पण, मध्य प्रदेशाच्या त्या वेळच्या २२ जिल्ह्यात जेथे जेथे प्लेग , कॉलरा इत्यादि रोगांचा प्रसार होत असे त्या ठिकाणी पुंडलाकीची म्हणजे डॉ पुं ह संत यांची बदली होत असे. बुलढाणा अकोला यवतमाळ रायपूर मंडला सागर इत्यादी जिल्ह्यातील गावोगावी बदली होत असे आणि खेड्यापाड्यातून बैलगाडीतून  कुठल्याही अवेळी प्रवास करावा लागत असे. स्वतःची  व अतिशय परिश्रमी डॉक्टर म्हणून पुंडलिकाची ख्याती पसरली होती. या कारणामुळे केंद्रीय खात्याकडून इतर डॉक्टर उपलब्ध असतांनाही डॉ संत यांचीच नेमणूक होत असे.
      डॉ संत यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना ता १८ जुलै १९१७ ला  झाले होते. त्याचे नाव विनायक ठेवले होते. डॉ संत ची नोकरी सुरुवातीस फिरतीची असल्याने त्यांना आईवडील पत्नी व पुत्र ह्यांच्यासह कौटुंबिक सहवासात राहण्याची संधीच  मिळाली नाही,ते रायपूर जिल्ह्यात जंगलातील फिरतीच्या नोकरीवर असतांना  अत्यंत दुःखदायक प्रसंग ओढवला. त्यांचे वडील मलकापूर येथे इंजिनीअर असतांना १९१८ च्या भारतव्यापी इन्फ्लुएंझा च्या प्राणघातक साथीत त्यांचे कुटुंब सौ दुर्गादेवी सापडल्या व त्याला बळी पडले. पत्नीच्या स्वर्गवासाची हि बातमी तारेने कळताच ते घाईने स्वगृही परतले, परंतु आपल्या धर्मपत्नीचे अंतिमदर्शन म्हणजे तिच्या शवाचे दर्शनच त्यांच्या नशिबी लिहिले होते. या दुःखाच्या जबरदस्त आघाताने त्यांचे जीवनातील सर्व लक्षच उडाले. तेव्हा  विनायक हा अवघा ६ महिन्यांचा होता. त्याला टाकून  स्वर्गवासी झाली होती आणि आपल्या नातवाचे  कार्य हरिभाऊ व सौ यमुनाबाई ह्या आजोबा आजीवर येऊन पडले. तो असहय्य दुःखहाभार हृदयाशी बाळगून डॉ संत पुन्हा नोकरीवर हजर झाले.
      रायपूरच्या निर्जन भयानक जंगलातील खेड्यापाड्यातून इन्फ्लुएंझा च्या रोगावर उपचार करीत करीत ते हिंडत असत व सभोवार माणसे कुत्र्यामांजरासारखी मरत असत. डॉ संत हिरीरीने त्यांच्यावर उपाय करून त्यांची शुश्रूषा करत असत. इच्छा एकाच कि  सर्वस्व हरपल्यामुळे , इतर रोग्यांप्रमाणे ईश्वराने आपल्यालाही घेऊन जावे. परंतु ईश्वर संकेत निराळाच असल्याने त्यांना कधीही अपाय झाला नाही. त्याच वेळी जगातले १ले महायुद्ध सुरु झाले होते. डॉ  युद्धाच्या आघाडीवर जाण्याकरिता सैन्याच्या डॉक्टरी  विभागात अर्ज केला. हि गोष्ट त्यांच्या एका मित्राला समजताच , त्यांनी ती मालकापुरास त्यांच्या वडिलांना  कळवली. वडिलांकडून तातडीचे बोलावणे येताच , ते घरी गेले. त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री इत्यादिकांस इन्फ्लुएंझाचा तडाखा बसला होता. सर्वांनी डॉ संतांची मनधरणी करून युद्धावर न जाण्याचा आग्रह केला. डॉ संतांचे नाव पुंडलिक होते व त्या पुंडलिक भक्ताप्रमाणे स्वभावाने ते परममातृभक्त होते. मातेच्या मनाविरुद्ध न  वागण्याचे वाचन त्यांनी दिले. याचा परिणाम असा झाला कि त्यांना आपल्या मनाविरुद्ध द्वितीय विवाहाच्या बंधनात पडावे लागले. सन १९१९ मध्ये पुण्याच्या मोरोबादादाच्या वाड्यात त्यांचा विवाह  प्रसिद्ध ह. भ.प  श्री लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या द्वितीय कन्या श्रीमती शांताबाई यांच्याशी मोठ्या थाटामाटाने पार पडला.

(क्रमशः )
      

No comments:

Post a Comment