Tuesday 24 May 2016

वाचाल तर वाचाल

आपण सगळेच जगण्याच्या धडपडीत गुंतलेले जीव आहोत. रोजची धावपळ व निर्माण होणारे नवनवीन प्रश्न सोपे राहीलेले नाहीयेत. 

त्यात, स्त्रीयांना तर अगदी तारेवरची कसरतच् करावी लागते. मुंबईसारख्या शहरात, लोकलच्या वेळेवर जगणारी स्त्री- खरोखर एक यांत्रिक जीवन जगते आहे. घर, मुलंबाळं, नोकरी, समारंभ, नातलग, मित्र परिवार या सर्वांची सांगड घालणे जिकरीचे जरी झाले असले तरी, कौतुक वाटते त्या महिलांचे ज्या, लोकलमध्ये उभे रहायला थोडी जरी जागा मिळाली, की त्या वेळेत काहीतरी वाचन करतात. मग ते देवाचे स्तोत्र, वर्तमानपत्र असो वा आवडीचे पुस्तक. मिळालेला वेळ "वाचन" सारख्या आवडीच्या गोष्टीत घालवतात. 

कौतुक वाटते कारण, "स्त्रिया  वाचत नाहीत" असे एक सर्वसाधारण आणि लोकप्रिय मत आहे. अशा प्रकारची मते बर्याच वेळा वरवरची असतात, व्यवस्थीत निरिक्षण न करता केलेली असतात. तरीसुद्धा वाचन करण्यामध्ये, महिलांचा वेगळा गट केला तरी त्यात किती टक्के येतील ही शंकाच आहे!! 

का वाचत नाहीत स्त्रिया? याची कारणेसुद्धा एक नाही - अनेक आहेत..जसे दैनंदिनी सांभाळत स्वत: च्या आवडीसाठी तेही 'वाचनाची' आवड असेल तर-क्वचितच वेळ मिळतो. इतर ठिकाणी म्हणजे, कष्टकरी समाजातल्या नवरा-बायको किंवा कुटुंबात वाचनाची चैन परवडत नाही. शेतकाम किंवा मोलमजूरी, घरकाम किंवा स्वत: चा व्यवसायात स्त्रीया इतक्या बुडालेल्या असतात की, वाचण्याची शक्तीच त्यांच्यात उरतच नाही. 

शहरातही वेगळे चित्र नाहीए. घरकाम करणार्या असो वा नोकरी करणार्या - नवरा, घर, मुलं, सासू-सासरे ह्या सर्वांची खातिरदारी करता करता, स्वत:साठी वेळ व त्राण उरत नाही. 

आता पुढचा प्रश्न!! या सगळ्या चक्रातून सुटलेल्या आणि लिहू वाचू शकणार्या महिला तरी वाचतात का? हा खरा प्रश्न आहे. या शिवाय , वाचले तरी काय वाचतात हेही महत्वाचे!! पुस्तके २ प्रकारची असतात- माहिती देणारी आणि आनंद देणारी. एखादे चांगले पुस्तक वाचल्याचा आनंद काही निराळाच असतो. 

पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते. आज आपल्याकडे अनेक लेखिका आहेत , शिवाय वाचनासाठी भरपूर साठा आहे - अगदी लहान लेखांपासून ते कथा कादंबर्या, निसर्ग, पाककृती, व्यावसायिक, छंद, आत्मकथा इ. 
        
सुनिता देशपांडेंचे पु.लं वर लिखाण, किरण बेदींचे, "आय डेअर", सुधा मूर्ती - एक ना अनेक!! 
 आत्मचरित्र वाचताना - असेही जगणे असते!?! असेच वाटत रहाते , पण जगतांना वेगवेगळ्या प्रसंगात माणसे कशी वागतात, हिंम्मत धरतात, मोडून पडली तरी पुन्हा कशी उभी रहातात, आधार मिळवतात व कटू प्रसंग गिळायला कसे शिकतात .. ह्यावरून समजते. चरित्र-आत्मचरित्रे ही तर माणसे समजून घेण्याची मोठी वाटच् दाखवतात. माणसांचे चुकणे, नाती सांभाळणे, सहजरित्या क्शमा करणे, स्वार्था पलिकडचा विचार करणे - अशा गोष्टी शिकायला मिळतात. शौर्यकथा बळ देतात- जीवनात येणार्या नवनवीन आवाहनांना तोंड द्यायला. निसर्ग चित्रण - एखाद्या रम्य जागी घेऊन जातात! 

वर्णन कमी पडेल इतक्या पुस्तकांचे प्रकार आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर , जगाच्या पाठीवर - कायमचा सोबती ज्यात आपण रमून जाऊ शकतो म्हणजे - पुस्तक!! 
अनेकवेळा पुस्तक वाचताना आपली प्रश्नेसुद्धा सहज सुटतात. वाचनाने आपण काळाबरोबर रहातो. वेगवेगळ्या क्शेत्रातली पुस्तके ज्ञानवर्धक, आरोग्यासंबंधीची पुस्तके दैनंदिनी सांगतात, योगा-व्यायाम , धार्मिक -हजारो विषयांवर लाखो पुस्तके आहेत - तेही प्रत्येक भाषेत. वर्तमानपत्रातून देशोदेशींच्या रोजच्या घडामोडी वाचायला मिळतात. 
तेही सर्व आपल्या सवडीप्रमाणे, मात्र अट एकच् " वाचाल तर वाचाल".
ह्या विषयावर काही ओळी...खास करून माझ्या मैत्रिणींसाठी !!

कवितेचे शीर्षक - " वाचाल तर वाचाल"

वाचाल तर वाचाल 
नाहीतर फुशारक्या 
कशा माराल !!!!

     अहो, वाचाल तरच होईल
      बुद्धी मोठी,
      नाहीतर सतत घ्यावी लागेल
      कुणाची तरी काठी!!

वाचाल सतत तरच होईल
मन मोकळं,
नाहीतर लावावी लागतील
सतत त्याला ठिगळं!!

     वाचाल तरच सुटतील 
      प्रश्नांची उत्तरं,
      नाहीतर मिरवावी लागतील
      सतत ह्याच प्रश्नांची लक्तरं!!

आवडीचे पुस्तक वाचण्यासाठी
आहेत की हो वाचनालय,
रोज रोज नवीन नवीन 
पुस्तक ज्यात आलंय!!

      करूयात संकल्प
       वाचूयात रोज एकतरी पान,
       चला ग सख्यांनो, राखूयात
        मिळालेल्या शिक्षणाचा मान !!!!

5 comments:

  1. Congratulations Rasika.. chaan lihiles..
    Arvind More

    ReplyDelete
  2. एकदम झकास

    ReplyDelete
  3. रसिका आपला लेख अगदी मनापासून भावला. वाचनाचे अत्यंत अमूल्य लाभ असताना दुर्दैवाने आज बहुतांशी लोक ह्या पासून वंचित राहतात वेळेच्या अभावी . परंतु आपला लेख वाचून नवीन उमेदीने काही अंशी तरी वाचनाकडे वळतील ही आशा !
    जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर , जगाच्या पाठीवर - कायमचा सोबती ज्यात आपण रमून जाऊ शकतो म्हणजे - पुस्तक!! ह्या आपल्या मताशी मी संपूर्णत: सहमत आहे.

    ReplyDelete