Friday 7 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ६ ...

ll श्री सत्गुरुवे नमः ll
 उदार कल्पतरू ...
लेखक :- श्री दिनकर यादवराव मार्डीकर
   
      एखाद्या निर्जन खडकाळ  मार्गानी भर मध्यान्ही उन्हाळ्यात पायी प्रवास करण्याचा प्रसंग यावा, शरीर श्रमाने क्लान्त  झालेले , घामाने निथळत असलेले,  तृष्णेने त्रस्त व विश्रांती करता आळसलेले असावे पण त्याकरता एकही  योग्य जागा दृष्टीस पडत नसावी, अशावेळी शरीराची व मनाची  काय केविलवाणी  अवस्था होते ह्याची कल्पना त्या प्रसंगातून गेलेल्या माणसांनाच करता येईल. अश्या अवस्थेत वाटेवरच्या पथिकाला अचानक  दूर एखादा वृक्ष दिसला तर त्याला कोण आनंद होतो ! हा हि अनुभव त्याला आलेला असतोच. माझ्या जीवनात मला कष्टप्रद तसेच  सुखपूर्ण असे दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. माझ्या प्रवासाचा रस्ता म्हणजे माझ्या जीवनातील __ वर्षाचे वय होय.
      उच्चशिक्षण , चांगल्या पगाराची व मान प्रतिष्ठेची नोकरी , सुस्वरूप सुस्वभावी प्रेमळ कर्तबगार व सुग्रण भार्या  इत्यादी सर्व वांछित जागतिक सुख समृद्धीने माझा क्रमित जीवन मार्ग विलोभनीय  दिसत होता तरी माझा अंतरात्मा आतल्या आत दुःखितच राहत असे. अधिकाधिक आधिभौतिक  मिळूनही त्याचा  उपभोग घेणे व  कनक आणि कीर्ती यांच्या चतुःसिमेत नेहेमी गुरफटून राहणे - हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असावे काय ? या  नित्य परिवर्तनशील व  परिणामी असंतुष्टतेत  होणाऱ्या सुखाशिवाय आदी परमोच्च सुख मिळवण्याचे शाश्वत स्थान कोणते ? व मानव ते ह्या जन्मी प्राप्त  शकतो का ? आणि तसे काही प्राप्त होत असले तर  साधना कोणती ?
      ह्या प्रकारच्या अनेक प्रश्नरूपी उन्हाळ्याच्या उष्णतेने मी आतल्याआत  कासावीस होत असे. पौर्वात्य व  पाश्चिमात्य  तत्वज्ञान विषयांचा , तसेच भगवदगीता, बायबल, कुराण, तुकाराम, समर्थरामदास, कबीर साहेब, सूरदास,  तुलसीदास,ज्ञानेश्वर इत्यादी संतांच्या  रोमांचकारी भक्तिरसाने भक्तिरसाने ओथंबलेल्या ग्रंथांच्या सखोल अभ्यासाने माझ्या तळमळालेल्या जीवनाची ज्ञानतृष्णा  शांत होईल , या  आशेने प्रयत्न करण्यात बराच काळ  लोटला. परंतु माझ्या जीवन  आत्म्याचा प्रवास पुर्वीप्रमाणेच कष्टप्रद खडकाळ निर्जन उन्हाळ्यातील मध्यान्हकालीन प्रवासाप्रमाणेच मला प्रतीत होत राहिला. श्रमातीशयाने येणारी बौद्धिक मूर्च्छा , अंतिम परमोच्च सुखाची पिपासा व घनघोर निराशा यांच्या संगतीत मी त्या जीवनमार्गावरून सर्व साधने करीत आशायुक्त निश्चयाने चालतच राहिलो. परत फिरून पुन्हा भौतिक सुखवासनेच्या परिपूर्तीच्या प्रलोभनास बळी पडावयाचे नाही अशी एक पुढे पुढे ओढणारी आंतरिक ओढ मला मागे परतूही देईना व स्वास्थही बसू देईना, अशा शारीरिक आणि मानसिक तळमळणाऱ्या केविलवाण्या अवस्थेंत एक वृक्ष मला दिसला. तो माझ्या मार्गात जणू काही माझ्या व्यथेने कृपावंत होऊन माझ्या मागे  स्वतः च आला.
      "बैठ जाता हूं जहां छाह घनी होती है" असे एका हिंदी भाषेच्या कवीने म्हंटल्याप्रमाणे मी , त्या वृक्षाखाली  श्रमपरिहारार्थ जाऊन बसलो.
      परंतु क्षणार्धात मला या वृक्षाच्या परम शीतल छायेचा जो अनुभव आला तो अवर्णनीय आहे. थोडक्यात सांगायचे तर, असे म्हणावे लागेल कि हा वृक्ष साधारण उद्बिज सृष्टीतील नसून, ज्याचे वर्णन पूर्वीच्या काळच्या प्रतिभावान कवींनी केलेले आढळते, हा तो कल्पतरू वृक्षच होता. आधिभौतिक सुख समृद्धीच्या सर्व वांछित कामना पूर्ण करणारा वृक्ष म्हणजेच , कल्पतरू - जो कि ,  पुराणात वर्णन केलेल्या कल्पवृक्षाहूनहि , मला आश्रय देणारा सर्वश्रेष्ठ व उदार कल्पतरू असला पाहिजे म्हणून मी त्याला उदार कल्पतरूंची उपमा दिली आहे. कारण साधारण कल्पतरू मनोवांछित पूर्ण  अशाप्रकारची कवी कल्पना आहे, पण हा उदार वृक्ष मनोवांछित तर पूर्ण करतोच  करतो,परंतु ह्याचे औदार्य , प्रेम आणि कृपा अवर्णनीय , अनिर्वाच्य एवं अद्वितीयच म्हणावी लागेल.कारण तो सर्वकाम  कल्पद्रुम असून आश्रितांना सरवैश्वर्य योगयुक्तीने सर्व कामना मुक्त करून टाकतो. " उभा कल्पवृक्षा तळी भीक मागे असा सर्व भूमंडळी कोण आहे" ह्या संतांच्या  उक्तींची साक्ष मला त्या माझ्या आयुष्यातील एका चिरस्मरणीय प्रसंगाने पटली.
      ह्या माझ्या लाक्षणिक वर्णातील आपल्या प्रेमकृपेची मला औदार्याने जन्मभर सावली देणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून तो उदार कल्पतरू म्हणजेच माझे सद्गुरू डॉ पुंडलिक हरी संत माझ्या उद्धारासाठी ज्या दिवशी नरसिंह परमात्म्याप्रमाणे स्तंभातून सद्गुरू रूपाने म्हणजे उदार कल्पतरू प्रमाणे प्रकट झाले त्या दिवशीच्या माझ्या परमानंदाचे वर्णन करण्यास  भक्तशिरोमणी देविदास म्हणतात त्याप्रमाणे , "अठरा भार वनस्पतीची लेखणी l समुद्र भरला मशी करुनि l  तरी माझा आनंद लिहिता धरणी l लिहिला ना जाय गोविंदा ll "ह्या मूळ रचनेत थोडा फरक करून मला म्हणावे लागते. ध्यानी मनी नसता तो अविस्मरणीय उगवलेला शुभदिन ता. ६ जुलै १९४८ चा होता.
      डॉ संतांच्या व्दितीय चिरंजीव गजानन ह्याच्या लग्नाचा समारंभ , नागपूर येथील मेयो हॉस्पिटल मध्ये त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे डॉ विनायकराव संत रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर - यांच्या घरी होता. त्यांच्या बंगल्यात हा सोहोळा डॉ विनायकराव ह्यांच्या इभ्रतीला शोभेल अश्या भव्य प्रमाणात साजरा झाला.
      डॉ पुं ह संत आपल्या व्दितीय पुत्राच्या लग्नानिमित्त बिलासपूरहुन नागपूरला सहकुटुंब सहपरिवार घेऊन आले होते. नागपूरच्या त्यांच्या अनेक नातलग मंडळीत ते माझे मेव्हणे म्हणून मलाही ह्या समारंभाचे निमंत्रण होते. लग्न प्रसंगाच्या अनेक धार्मिक व लौकिक कार्यक्रमातून निवृत्त झाल्यावर रात्री भोजनानंतर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता - तो म्हणजे डॉ पुं ह संत ह्यांचे भागवदगीतेवरील प्रवचन हा होय. यापूर्वी मी गीतेवर अनेक विद्वानांची प्रवचने ऐकली होती . परंतु लग्नासारख्या प्रसंगात गाण्याबजावण्याचे मनोरंजक कार्यक्रम न ठेवता , विहहित वरच्या वैद्यकीय व्यवसायातील पिता , गीतेवर प्रवचन करणार आणि त्यासाठी सर्वांस आमंत्रण दिले आहे , हे जाणून मला फारच आश्चर्य वाटले. विशेष श्रद्धेने नसेल , पण कुतूहल म्हणून मी हि श्रोतेवृंदात जाऊन बसलो. गीतेवर भाष्य करताना कोणाही भाष्यकाराने आजपर्यंत  स्पर्श केला नव्हता असा श्री डॉ संतांच्या प्रवचनाचा अलौकिक व अपूर्व विषय होता.
      भगवान श्रीकृष्णांनी गीतेतून अर्जुनाला दिलेला "दिव्यचक्षुचा प्रत्यक्ष प्रयोगात्मक साक्षात्कार" हा विषय त्यांच्या वक्तव्याचा होता. त्यांच्या ओजस्वी वैखरी वाणी ने व सहज आकलनिय सिद्धांतिक युक्तीने या दिव्यचक्षुतत्त्वाचा मला त्याच वेळी प्रत्यक्ष अनुभव आला. देशकाल, परिस्थितीची जाणीवच नाहीशी झाली. अंतःकरण उपदेश प्रसादाने प्रफुल्लित होऊन उचंबळून आले. अष्टभाव प्रगटीकरणामुळे तिथे बसणे  अशक्य होऊन मी त्याच वेळी एकटाच स्वगृही परतलो. रात्रभर डॉ संतांनी दिलेल्या अपरोक्ष अनुभवाची पूर्वीच्या ग्रंथवाचनाने प्राप्त झालेल्या परोक्ष ज्ञानाशी तुलना करतानाच प्रातःकाळ केव्हा झाला हे कळलेच नाही.  निद्रा, क्षुधा,तृष्णा, इत्यादींचे भान हरपून सकाळी जाऊन डॉ संतांच्या चरण कमलावर लोटांगण घालून त्या सद्गुरू माऊलींचे जेव्हा दर्शन घेतले तो सुख सोहोळा अवर्णनीय होता, मगच माझ्या चित्ताला समाधान लाभले. अशा प्रकारे - " गुरुमहाराजगुरु l जय जय परब्रम्ह सद्गुरू l चारी मुक्तिदायकदाता l उदार कल्पतरू ll "   - ह्या  सद्गुरूस्तवनाचे रहस्य मला माझ्या काहीतरी पूर्वसुकृताने प्रगट  झाले.
      तसे म्हणले तर डॉ संतांचे लौकिक व्यक्तिमत्व मला अपरिचित नव्हते. स. १९२२ मध्ये व त्याच्या काही वर्षांपूर्वीच ते माझ्या जीवनात आले होते. बिलासपूरच्या जेल व पोलीस हॉस्पिटल च्या  सरकारी नोकरीत  ते डॉक्टर असताना , त्यांनीच आपल्या भगिनीशी माझा विवाह घडवून आणला होता. त्यांच्या बहिणीवर त्यांचे नितांत पितृतुल्य प्रेम असल्यामुळे , तिच्याकरता म्हणून त्यांच्या नित्य होणाऱ्या नागपूरच्या दौऱ्यात ते अधून मधून मला भेटत असतंच. परंतु  त्यांच्या , त्या  दिवशी प्रगट झालेल्या अध्यात्मिक अधिकाराची  पुसटशी कल्पनाही मला त्यांनी कधीही दिली नव्हती. त्यावेळच्या मध्य प्रांतीय मेडिकल एक्झामिनेशन बोर्ड, मेडिकल कौन्सिल , नर्सेस कौन्सिल, रेडक्रॉस मध्य प्रांतीय कमेटी , मध्य प्रांतीय ऑल इंडिया मेडिकल सायसेन्शिएट डॉक्टर्स अससोसिएशन इत्यादी संस्थेत ते नियुक्त व निवडून आलेले सदस्य असल्याने, नागपुरात होणाऱ्या त्या संस्थांच्या अधिवेशनांकरता त्यांना आपले बिलासपूरचे खासगी काम सांभाळून दर ३-४ महिन्यांनी नागपुरास यावे लागे. तेव्हाही त्यांचा माझा संबंध भेटीगाठींच्या रूपाने बराच वेळा आला होता. परंतु त्यांनी अध्यात्मिक विषयाबद्दलचे बोलणे माझ्याशी केले नव्हते. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या सद्गुरूपदावरून "दिव्यदृष्टी" प्रदानाचा प्रसाद दिल्यावर आजपावेतो त्यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील विशाल कार्य व त्यांचा व माझा अधिकधिक घनिष्ठ संबंध वारंवार आला. माझ्या कौटुंबिक जीवनात आजपर्यंत अनेक संकटे व दुर्धर दुःखाचे अनेक प्रसंग आले. डॉ संतांच्या सदगुरुत्वाची व प्रेमाची साथ मिळाली नसती , तर त्या सर्व संकटांतून मी सुखरूप निभावली नसतो.
      अश्या तर्हेने आपल्या संपूर्ण जीवनाचे सिंहावलोकन करताना - ता. ३० जुलै १९६७ रोजी प्रातःकाळी ४ वाजता मला अशी एक अंतस्थ प्रेरणा झाली कि सद्गुरू ऋणातून अंशतः तरी मुक्त  दृष्टीने मी सद्गुरू डॉ संत यांचे आत्मचरित्र संक्षिप्तरित्या लिहून काढावे. त्या अनिवार्य प्रेरणेमुळे प्रस्तुतचा , "उदार कल्पतरू " हा  लहान ग्रंथ लिहावयास घेतला आहे. ह्या लेखनाचा हेतू आत्मश्लाघेचा नाही परंतु केवळ सद्गुरूपदाबद्दल मला वाटणारी कृतज्ञता हा आहे. ह्या आधी मी, बुद्धावतार चरित्र, Divine Vision , गीतायण  इत्यादी अनेक ग्रंथ आणि कविता  हिंदी,मराठी व इंग्रजी भाषेतून लिहिल्या. हे सर्व मी जनताजनार्दनच्या सेवेत सादर केलेलेच आहेत. आणि हे सर्व ग्रंथ अध्यात्म विषयी तज्ञांच्या आदरास पात्र झाले आहेत. परंतु हा लहान ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन कृतज्ञेच्या भावनेचे असून सद्गुरूच्या प्रेमाचे व भक्तीचे द्योतक आहे. वास्तविक सद्गुरुपद आत्यंतिक निरपेक्ष असते. ज्यांनी सर्वैश्वर्य योगाचे आणि विश्ववैभवाचे दान, न मागताच माझ्या पदरी बांधून दिले व मला आजन्म कृतकृतज्ञ केले त्यांची उतराई होणे , इतर कोणत्याही  मार्गाने अशक्य आहे. परंतु परमोच्च सुखाचा स्वानुभव प्रदान करणाऱ्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता वाटणे व ती यथाशक्ती यथामती कोणत्या न कोणत्या तरी रूपाने प्रगट होणे हाही  मनुष्यस्वभावच आहे. त्या प्रकृतीतीनुसार त्यांनी नको नको म्हंटले तरी बालहट्ट धरून त्यांचे आत्मचरित्र  एक प्रयत्न माझ्याकडून केल्या  गेला आहे. त्यात यश  अपयश देणे हे विधिलिखित असते म्हणून त्याची काळजी करण्याचे मला काहीच कारण  नाही,
सद्गुरू समर्थ आहेत.


(क्रमशः)   
      

No comments:

Post a Comment