Wednesday 12 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ७ ...

सद्गुरू चरित्र
२ 
लेखक : श्री दिनकर य मार्डीकर


      डॉ पुंडलिक संत यांचा जन्म कार्तिकशुध्द एकादशी , गुरुवार शके १८१६ इंग्रजी ता २३ नोव्हेंबर १८९४ रोजी परळ, मुंबई येथील एका विठ्ठल मंदिरात झाला. श्री क्षेत्र पंढरपूर च्या यात्रेचा तो शुभ दिन म्हणून त्यांच्या आईवडिलांनी आपल्या बालकाचे नाव पुंडलिक ठेवले . त्यांचे आजोबा आप्पाजी संत हे त्यांच्या पुणे जिल्ह्यातील खेड मंचर जवळच्या चासना रोडी ह्या वतनाच्या व शेतीच्या गावावरून येऊन बऱ्याच वर्षांपूर्वी , त्या मंदिरात राहून पूजा अर्चा व विठ्ठल सेवा  करीत असत.
      डॉ संतांच्या जन्मकाळी त्यांचे वडील हरी अप्पाजी संत हे मुंबईतील अनेक कारखान्यात यांत्रिक विभागात नोकरी करून विठ्ठलसेवेचे वृत्त हि चालवत असत. श्री क्षेत्र चिंचवड येथील भूतपूर्व दिवाण - बाळोबा देव पुढे नामनिदान बदलून क्ष्रीसागर ह्यांच्या यमुनाबाई कन्येशी हरिभाऊ संतांचा विवाह होऊन डॉ पुंडलिक संत ह्यांचा जन्म झाला. अप्पाजी संतांच्या हयातीत ते मंदिर अजूनही भाऊंचे मंदिर ह्या नावाने ओळखल्या जाते. हे देवस्थान एका प्रभू जातीच्या श्रीमंत सार्वजनिक काम करणाऱ्या ठेकेदार इसमाचे होते.त्याचे नाव आणि त्याच्या नावाचा भाऊंचा धक्का अजूनही मुंबई बंदरात आहे, भाऊ ठेकेदाराच्या मृत्यूनंतर ते मंदिर त्यांच्या जावयाच्या मालकीचे झाले. मंदिराजवळ त्यांचा बंगला असे. विठ्ठलाचे मंदिरात मांस मटण आणणे, मदिरापान करून मंदिराच्या पावित्र्यात बाधा आणणे इत्यादी  प्रकार मालक म्हणून बाबाजी दिनकर ह्या जावयाने जेव्हा आरंभिले तेव्हा, हरिभाऊ व सौ यमुनाबाई यांनी एका रात्री जवळ जवळ वीस वर्षांचे त्यांचे विठ्ठल मंदिरातील त्यांचे वास्तव्य सोडले आणि मुंबईतील एका भोईवाडा नामक भागातल्या नरगुणदासाच्या चाळीतील लहानश्या खोलीत आपला शांत स्वभावी गरीबाचा संसार थाटला.
      अनेक हितचिंतकांनी हरीभाऊला सल्ला दिला , कि कायद्याप्रमाणे वहिवाटीचा हक्क प्रस्थापित करून तुम्ही मंदिराचे मालक होऊ शकता. परंतु हरिभाउने त्यांना सांगितले कि , "परधनापाहार मला करावयाचा नाही. संत कुटुंबात कर्तबगारी असेल तर मी किंवा मुले, स्वतः ची घरे , मंदिरे आणि धर्मशाळा बांधू शकतील."
       संत आडनाव असणारी देशस्थ ब्रह्मण कुटुंबे ,  खेडमंचर , वाडगाव , चासकमान, महाकुंगे,  घोडे, ओतूर,इत्यादी पुणे जिल्ह्यातील अनेक  शहरातून  तसेच ग्वाल्हेर, झाशी , सागर इत्यादी शहरातूनही आहेत. परंतु ह्या सर्व संत कुटुंबांची मूळ शाखा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर ह्या गावची आहे. तिथे संत घराण्याच्या मूळ पुरुषाची समाधी आहे, त्यांनी सन्यास घेऊन ह्या गावातून प्रयाण केले होते. या मूळ पुरुषावरूनच सर्व शाखा - उपशाखा 'संत' हे नामनिदान मिळाले असले पाहिजे.


(क्रमशः )

No comments:

Post a Comment