Tuesday 18 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ९ (a)...

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र

पहिला विवाह काळ
१९०८  ते  १९११

४ (अ )

लेखक : श्री दि.या. मार्डीकर

      पुंडलिकाची आई सौ यमुनाताई व मामा डॉ धोंडोपंत सुदुम्बरेकर यांचे बंधू भगिनी प्रेम असामान्य असे होते. दोघांचेही बालपण अत्यंत गरिबीच्या हलाखीत गेलेले. पण पुढील आयुष्यात सामाजिक प्रतिष्ठा व सांपत्तिक स्थिती दोघांनाही  समाधानकारक प्राप्त झालेल्या होत्या. हरिभाऊ संतांना जवळचे प्रेमाचे नातेवाईक कोणी नव्हते, त्यामुळे त्यांचाही ओढा सुदुम्बरेकर कडे साहजिकच असे. त्यात डॉ धोंडोपंतांना  वर्षे  झाली,तरी पोटी पुत्रसंतान नव्हते. लहानपणापासूनच मामा मामीचे प्रेम पुत्रवत पुंडलिकावर जडले होते. हरिभाऊ नोकरीनिमित्त वर्हाड, खान्देशातील अनेक शहरी असतांना उन्हाळ्याचे २ महिने यमुनाताई व मुले  नाशकास आपल्या बंधू कडे अनेकवेळा येणे  होत असे. तात्पर्य हे कि, पुंडलिकाच्या शिक्षणास्तव त्याचे  मामा मामीस आवडले. इ.स. १९०५ मध्ये पुंडलिकाच्या वडिलंबहीणीचे लग्न व त्याची मौंज हि कार्ये नाशकास त्यांच्या मामाच्या घरीच झाली होती. धोंडोपंतांची पत्नी गंगाबाई हि विंचूर येथील असल्यामुळे ह्या शुभ कार्यासाठी तिच्या माहेरची सर्व नातलग मंडळी पाहुणे म्हणून आलेली होती. गंगाबाईंची मावशी गोजराबाई व तिचे कृष्णराव यार्दी आपल्या मुलाबाळांसह आले होते. कृष्णराव यार्दी ह्यांची सुकन्या दुर्गा उर्फ चमी हि पण त्यात होती.
       डॉ धोंडोपंतांचे घर म्हणजे नेहेमीच पाहुण्यांच्या सत्काराचे घर होते. आलेले पाहुणे खुशाल महिना महिना वास्तव्य करीत. एके दिवशी पुंडलिक व दुर्गा ह्यांना खेळीमेळीने खेळताना पाहून कृष्णराव यार्दी  धोंडोपंतांना म्हणाले, " आमच्या दुर्गीला सून कराल काय ?  दोघांचा  जोडा कसा छान दिसतो पहा. " तेव्हापासूनच म्हणजे पुंडलिक ११ वर्षाचा व दुर्गा आठ वर्षाची असतांना गंमतीगमतीत त्यांच्या विवाहाचा वाङ्निश्चयाच झाला . पुढे सन १९०८ मध्ये बालविवाहाचे मूर्त स्वरूप धुमधडाक्यात साकार झाले.
      कृष्णराव यार्दी हे विंचूरकर संस्थानिकाकडे नोकरी करत होते. हे विंचूरकर  नाशकास राहावयास लागले होते. इ.स .१९०८ मध्ये वर्हाड मधील खामगावच्या हायस्कूलातील ३ऱ्या इंग्रजीचे शिक्षण पूर्ण करून पुंडलिकाने त्यानंतर नासिकच्या हाय स्कूल मध्ये मामाचे घरी राहून चवथ्या वर्गात प्रवेश मिळवला. तो आपल्या वयाच्या १४व्या  वर्षीच विवाहबद्ध झाला. त्या काळात मुलामुलींची लग्ने बहुतेक करून अश्याच प्रकारे बाल्यावस्थेतच वडीलधारी मंडळी उरकून घेत असत.
      विवाहापूर्वीच २ वर्षे पुंडलिक व दुर्गा दोघे एकमेकांना कित्येक प्रसंगी वाग्दत्त वधूवरांप्रमाणे भेटत असत. इ.स. १९११ मध्ये नासिकचे स्कूल फायनलचे शिक्षण संपले. पुंडलिकाला तेव्हा हायस्कूलात असतांना  ओढा लागला होता. त्यावेळेच्या स्कूल ऑफ आर्ट , मुंबई च्या ३हि परीक्षा तो अतिशय उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. चित्रकलेचे त्याचे शिक्षक त्याच्या चित्रांचे नमुने इतर विद्यार्थ्यांना आदर्श म्हणून अभ्यासावयास सांगत असत. त्याचा परिणाम म्हणून पुढील आयुष्यात चित्रकार होण्याची  महत्वाकांक्षा पुंडलिकाने  उराशी बाळगली होती. म्हणून १९११ नंतर नासिक सोडून तो मुंबईस आपल्या दुसऱ्या मामांकडे , म्हणजे वामनरावांकडें राहावयास आला. मुंबईला स्कूल ऑफ आर्ट चे पैंटिंग व ड्राफ्ट्समन असे दोन्हीही कोर्से मध्ये त्याने आपले नाव घातले होते. पण , मुंबईची हवा त्याला मानवली नाही. लहानपणापासूनचे सर्व जीवन मोकळ्या हवेत, पौष्टिक अन्नसेवनात व देशी व्यायाम व तालीमीत आणि मामाच्या प्रेमात व्यतीत झालेले होते.
      नाशिकात असतांना तालिमखान्यात देशी  बैठका, मुद्गल, मलखांब, कुस्ती ह्या प्रकारच्या व्यायामात वेळ जात असे. उलट मुंबईची हवा व मलेरिया मुळे त्याची प्रकृती  ढासळली. म्हणून मग चित्रकलेचा नाद टाकून , मुंबई सोडून नागपूरला आपल्या वडिलांच्याकडे यावे लागले. त्यावेळी इ.स. १९११ मध्ये हरिभाऊ , नागपूर येथील रामजी कणव जिनिंग फॅक्टरीत इंजिनीअर होते. एकाएकी एक दिवस काहीच पूर्वसूचना नसतांना पुंडलिक टांग्यातून आजारी अवस्थेत घरी आलेला बघून त्याच्या मातापित्याचे काळीज थरारले. त्याच्या वामनमामाने मुंबईहुन अश्या आजारी स्थितीत त्याला  दिले, ह्याबद्दल विस्मयचकित होणे साहजिकच होते. अंगात ताप , कंबर व पाय सुजून दुखत होते. आपल्या एकुलत्या एक मुलाचे दुखणे बघून हरिभाऊ घाबरून गेले .  लगेच त्याला डॉ बाळासाहेब परांजपे यांच्याकडे नेऊन त्याचा इलाज सुरु केला. खाण्यापिण्याची आबाळ , मुंबईच्या कोंदट हवेतील सहवास व मलेरिया तापाचा हा आजार आहे, असे डॉक्टर ने निदान केले. घाबरण्यासारखे काही नसून लौकरच तुमचा मुलगा बरा होईल, अश्या प्रकारे डॉक्टरने सांगितल्यामुळे सर्वांना धीर आला. २ महिन्यांनंतर त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली.
       पुंडलिकाने एके दिवशी हरिभाऊंचे त्यांच्या मित्राशी झालेले असे बोलणे ऐकले कि त्याचा, त्यांच्या पुढील आयुष्यावर फार खोल परिणाम झाला. हरिभाऊ म्हणत होते, " अहो, माझ्या वडिलांनी मला इंग्रजी शिकवले नाही व त्यामुळे माझ्यात बरीच योग्यता असूनही माझे जीवन खडतर निपजले. आमच्या संत कुटुंबात इंग्रजी शिकून अजून कोणीच मॅट्रिक झाले नाही. पुंडलिक मॅट्रिक होईल अशी मला फार आशा होती, पण ह्या पोरात तसे काहीच दिसत नाही. चित्रे काढण्याच्या मागे लागून तो आता बापाच्या जीवावर ऐतोबा बनून बसणार झाले. पुढे काय व कसे करावे हे मला कळेनासेच झालेले आहे. हा आपला एकुलता एक मुलगा . तेव्हा त्याला खूप पुढे आणायचे ह्या माझ्या आकांक्षेवर त्याने पाणीच फिरवले आहे. " हे भाषण दुःखातून बारा झालेला पुंडलिक लपून ऐकत होता. पि. डब्ल्यू .डी च्या ऑफिसमध्ये अँप्रेन्टिस ट्रेसर म्हणून जागा मिळवण्यासाठी तो त्या ऑफिस मध्ये खेट्या घालीत असे. त्याला वडिलांचे हे बोलणे फारच लागले. मग त्याने निश्चय केला कि एका वर्षात मॅट्रिक पास होऊन वडिलांना प्रसन्न करायचेच. अश्या प्रकारचा स्वतःशीच निर्णय करणे व्यक्तिगत दृष्टिकोनातून सोप्पे असले तरी त्याला वास्तव यशाचे दृश्य स्वरूप मिळवून देताना ज्यांची काहीही कल्पना नसते अश्या अडचणी उत्पन्न होत असतात. हाच कटुतर अनुभव पुंडलिकास येऊ लागला. एका रात्री त्यांनी आपली सर्व तर्हेची पैंटिंग्स आणि चित्रकलेचे सामान नागनदी मध्ये टाकून दिले. नदीच्या तीरावर बसून शोक केला व परत ध्येयसिद्धीकडे वळले.
      नागपुरातल्या हायस्कूलात मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून सर्व हायस्कूलच्या हेडमास्तरांकडे खेटे घालण्यास सुरुवात केली. त्याकाळी नागपूर विभागाच्या मॅट्रिकच्या परीक्षा ह्या अलाहाबाद विश्वविद्यालयाकडून होत असत. मॅट्रिक कोर्से तेव्हा दोन वर्षांचा असे व तो ६व्या व ७व्या  वर्गात शिक्षण देण्याच्या दृष्टीने विभाजित केलेला असे. २ वर्षापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे नाव शाळेच्या हजेरी बुकात नसेल त्याला मॅट्रिकच्या परीक्षेला बसायचा फॉर्म हेडमास्तर देऊ शकत नव्हते. त्याशिवाय मुंबईकडील स्कूल फायनल व अलाहाबाद विद्यालयाचे मॅट्रिक ह्या दोन्हींचा अभ्यासक्रम आणि विषय हे भिन्न असत. चित्रकला हा केवळ छंद म्हणून घरी शिकता येण्यासारखा विषय होता. पण, इंग्रजी बीजगणित भूमिती केमिस्टरी फिज़िक्स इंग्लंडचा इतिहास हे सर्व विषय मुंबईच्या स्कूल फायनल मध्ये नव्हते. ते येथे आवश्यक विषय होते. ह्या सर्व विषयांचे अर्धे शिक्षण नागपुरातील हायस्कूलमधून अगोदरच ६व्या वर्गात पूर्ण करीत असत. पण, पुंडलिकाच्या प्रत्येक हेड मास्तर पाशी हट्ट असे कि मला एका वर्षात म्हणजे १९१३ साली च मॅट्रिक व्हायचे आहे. मुंबईच्या स्कूल फायनल पास झाल्याचा दाखल मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी उपयोगी पडत नव्हता. मग हेडमास्तरांनी तरी काय करायचे ? प्रत्येकाने पुंडलिकाला समजावून सांगावे कि , "तू ६व्या वर्गात बैस म्हणजे २ वर्षांनी १९१६ मध्ये मॅट्रिक होशील. तू आमच्या शाळेची प्री -मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर मॅट्रिक मध्ये बसण्याची परवानगी आम्ही तुला देऊ. " पण पुंडलिकाला हे काबुल नव्हते. तो म्हणायचा , "मला यंदा (१९१६) च मॅट्रिक मध्ये बसायचेच आहे व पास करून दाखवायचे आहे. असा माझा निश्चय आहे."

(क्रमशः)

        

1 comment:

  1. Really Nice article Rasikaji... waiting for next part too..
    Thank you.

    ReplyDelete