Thursday 3 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ११ (b) ...

उदार कल्पतरू 
द्वितीय विवाहानंतर ... 
६... 

      डॉ संतांना द्वितीय विवाहापासून तीन पुत्र व एक कन्या प्राप्त झाले होते. प्रथम विवाहापासून एक पुत्र ज्याचे नाव - विनायक होते. ह्या सर्वांचे उच्च विश्वविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ज्येष्ठ पुत्र विनायक हा मुंबई हुन M.B.B.S. पास करून डॉक्टर झाला होता व त्याचा विवाह सौ उषा B.A. भूतपूर्व डिस्ट्रिक्ट जज श्री अंबर्डेकर यांची कन्या हिच्याशी झाला होता. त्याला मध्य प्रांतीय मेडिकल खात्यात नोकरी लागली होती. तो आपल्या उत्तम कर्तबगारीमुळे सिव्हिल सर्जन झाला व पुढे त्याला डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थची जागा मिळाली. तो M.S.देखील झाला होता. सन १९५६ पर्यंत द्वितीय पुत्र गजानन , तृतीय पुत्र रघुनाथ व कन्या मालती ह्यांचे हि विवाह यथोचित रीतीने पार पाडले होते . फक्त कनिष्ठ पुत्र यशवंत, तो लहान असल्यामुळे त्याचे कॉलेज चे शिक्षण आणि विवाह हे करायचे राहिले होते.
      त्यांच्या बिलासपूरच्या सामाजिक कार्यात त्यांनी अनेक उल्लेखनीय लोकोपयोगी गोष्टी केल्या. पैकी व्यायामशाळा व महाराष्ट्राची शाखा ह्या फार प्रसिद्धीस आल्या. त्यांच्या परिश्रमाने बिलासपूर येथे छत्तीसगढ येथे मराठी साहित्य संमेलन उमरावतीचे नामांकित श्री बाबासाहेब खापर्डे ह्यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी रीतीने पार पडले. बिलासपूरच्या मराठी भाषिक मुलांच्या उन्नतीकरिता डॉ संतांनी हायस्कूल चे शिक्षण मराठी भाषेच्या माध्यमातून व्हावे हा परिश्रम करून प्रयत्न केला होता. तसेच मराठी माध्यमातून खाजगी मिडलस्कूलमधून शिक्षणाची व्यवस्था केली होती. ह्या कामासाठी एक प्रायव्हेट शाळा त्यांनी उघडली होती. त्यानुसार ते  प्रयत्न करीत होते. पण ह्या गोष्टीला स्थानीय मराठी भाषिक जनतेचाच बरोबर पाठिंबा नसल्यामुळे त्यांचा मनोदय असफलच राहिला.
      डॉ संतांचे नाट्यकलेचे प्रेम हे त्यांच्या बिलासपूर सारख्या मागासलेल्या शहरातील वास्तव्याचे व त्यातून त्या कलेला  जनतेला उच्च स्थान मिळवून देण्याचे प्रतीक आहे. त्यांच्याच प्रयत्नाने तेथील मराठी व इतर जनतेमध्ये मराठी नाटकांविषयी व नाट्यकलेबद्दल आदर व प्रेम निर्माण झाले. ते स्वतः उत्तम दिग्दर्शक व अभिनयकुशल नट होते. 'भाऊबंदकी', ' म्युनिसिपालिटी' , 'सोन्याचा कळस' , ' लग्नाची बेडी ' , 'घराबाहेर ' , ' उद्याचा संसार' , इत्यादी प्रख्यात नाटके तेथील तरुण मंडळींना हाताशी घेऊन त्यांचे प्रयोग करून तेथील मंडळींना त्यांच्या बिलासपूरच्या वास्तव्यात दाखविले होते.
      अनेकांना हे ठाऊक नसेल कि, डॉ संत हे मराठीतील एक उत्तम कवी हि आहेत. त्यांना भावस्पर्शी व निसर्गवर्णनपर कविता करण्याचा छंद लहानपणापासूनच आहे. एवढेच नव्हे तर , हिंदी त्यांची  मातृभाषा नसून देखील ते ह्या भाषेतून सुद्धा उत्तम काव्यरचना करतात तसेच, ते हिंदीत व्याख्यानेही देतात. ते हिंदी काव्यगायक आहेतच, पण ते भारतेंदु सभेचे एक प्रमुख सभासद होते. श्री प्र.के. अत्रे यांच्या 'लग्नाची बेडी' या नाटकाचे हिंदी भाषेत 'लग्न शृंखला' म्हणून भाषांतर केले आणि याचे प्रयोग रायपूर आणि बिलासपूर शहरी करून त्यांनी रेडक्रॉस फंड यात उदारपणे हजारो रुपयांची मदत केली.

(क्रमशः)

No comments:

Post a Comment