Monday 7 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १२ ...


उदार कल्पतरू ... 
दोन कौटुंबिक घटना 

लेखक - श्री दिनकर यादवराव मार्डीकर

      बिलासपूरच्या डॉ संतांच्या इ. स. १९२४ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन खाजगी प्रॅक्टिस सुरु कारण्यापूर्वीच्या वास्तव्यात त्यांच्या कौटुंबिक जीवनात ज्या अनेक घटना घडल्या त्यापैकी, दोन विशेष उल्लेखनीय आहेत.
      पहिली घटना अत्यंत हृदयविदारक होती. त्यांना दोन बंधू होते. एकाचे वय १२ वर्षे व दुसऱ्याचे ८ वर्षाचे होते. ही दोन्हीही मुले एक ८ दिवसात घटसर्पाच्या आजारामुळे दिवंगत झाली. आधीच ते प्रथम पत्नीच्या निधनामुळे अति दुःखी व कष्टी होते. परंतु आपल्या मातृभक्तीला  प्रेरित होऊन त्यांनी द्वितीय संबंध केला व आपले स्वतःचे सर्व प्रकारचे दुःख गिळून उत्तम प्रकारे संसार करीत असतांना, ही दुर्दैवी घटना झाली. ह्या प्रसंगी त्यांच्या दुःखाची परिसीमा लोटली. परंतु यत्किंचितही आपल्या कर्ममार्गापासून डॉ संत डळमळले नाहीत.
      डॉ संतांचे घर म्हणजे त्यांच्या बहिणी व इतर नातेवाईकांना सर्व अडीअडचणीच्या प्रसंगी एकमेव आश्रयस्थान असे. कुटुंबातील सर्व लोकांना , इतकेच नव्हे तर मित्र व ओळखीच्या लोकांना, सर्वपरीने सुखी ठेवण्यात त्यांनी कधीच हेळसांड केली नाही. प्रथम पत्नीच्या निधनाचे दुःख व नंतर लगेच दोघेही बंधू निवर्तल्याचे दुःख त्यांना फारच जाणवले. अंतर्यामीच्या शोकाच्या उर्मी हृदयात बाळगुन वरपांगी सर्वांच्या सुखाकरिता आपणही सुखी आहोत, असे दाखवणे , अविश्रांत परिश्रम करून काळजीपूर्वक स्वतःहाचा डॉक्टरकीचा खाजगी व्यवसाय  चालवणे,व सर्वांचे आदरातिथ्य करून घराची व कुटुंबाची काळजी वाहणे , इत्यादींचा त्यांच्या शरीर प्रकृर्तीवर परिणामही झाला. सन १९२६ पासून त्यांना मधुमेहाचा विकार जडला आणि मधून मधून हृदयातही कळा येऊ लागल्या अशी परिस्थिती झाली.
      नंतर एक आनंददायक घटना अशी घडली कि , आपल्या सख्ख्या बहिणीहून अधिक जास्त प्रिय असलेली मामेबहीण , तिच्या मातेचे देहावसान झाल्याने , तिच्या लग्नाची सर्व जबाबदारी डॉक्टरांकडे होती. त्यांनी तिचे लग्न जमवून आणले कारण ती त्यांच्याच कुटुंबात वाढत होती. तिचे मूळचे नाव सीता व सासरचे चंद्रिका असे होते. तिचे वडील श्री वामनराव सुदुंब्रेकर ह्यांनी त्यांच्या मृत्यूसमयी , डॉ संतांना बोलवून चंद्रिकेच्या विवाहाची सारी जबाबदारी त्यांचेवर सोपविले होती. चंद्रिकेची सावत्र आई माईसाहेब हि मुंबईस राहत असे. तिने हि डॉ संतांनी अंगिकारलेल्या जबाब्दारीस अनुमती दिलेली होती.
      माझे (लेखक), नागपूरचे विश्वविद्यालयीन शिक्षण चालू होते. माझे वडील यादवराव व मातोश्री सौ राधाबाई, वडील बंधू वगैरे कुटुंबातील मंडळी बिलासपूरलाच राहात असे. डॉ संतांचे आमच्या घरी नेहेमीच येणे जाणे होते, आणि दोन्ही कुटुंबात बराच घरोबा निर्माण झाला होता. कॉलेजच्या सुट्टीमध्ये मी, नागपूरहून घरी आलेलो असतांना डॉ संतांनी मला पहिले. व दुसऱ्या दिवशी मी घरी नसतांना , डॉ संत माझ्या वडिलांना भेटून चंद्रिकेसाठी माझ्या वडिलांजवळ माझी मागणी घातली. परस्पर कुटुंबाची माहिती व औपचारिक बोलणी झाल्यावर माझ्या वडिलांनी त्यांना  विचारिले,"तुमची बहीण दिसायला कशी काय आहे ?" त्यावर डॉ संतांनी उत्तर दिले, "थोडक्यात सांगायचे म्हणजे राजघराण्यात शोभेल इतकी सुंदर आहे. " माझ्या वडिलांचा डॉ संताच्या वचनावर एकदम विश्वास बसून माझे लग्न ठरले. लौकरच इतर बाबतीतले बोलणे होऊन, हे लग्न मुंबई मुक्कामी करण्याचे निश्चित झाले आणि तिथीदेखील ठरविण्यात आली. परंतु एक अनपेक्षित अडचण यात उत्पन्न झाली. चंद्रिकेच्या स्वतंत्र मातेशी व काकांशी आमचा किंचितही परिचय नव्हता . लग्न ठरविण्यापासून निर्विघ्न पार पडण्याची जबाबदारी डॉ संतांनी घेतली होती. ते त्यावेळच्या सिव्हिल सर्जनच्या हाताखाली सरकारी नोकरीत होते. लग्नासाठी डॉ संतांनी १० दिवसाची रजा मागितली होती . परंतु सिव्हिल सर्जनने ही रजा देण्याचे साफ नाकारले. त्यावेळी जणू काय डॉ संतांची कर्तव्यनिष्ठाच पणास लावली गेली.
      डॉ संतांनी सर्व परिस्थिती आपल्या अर्जात लिहिली होती व आपली रजा मंजूर होण्यास आटोकाट प्रयत्न केले तरी सिव्हिल सर्जनने ती अमान्य केली , तेव्हा डॉ संत अर्जाच्या उत्तराची वाट न पाहता आपल्या वरिष्ठ अधिकार्यास आपल्या जाण्याची सूचना देऊन बिनधोक लग्नाच्या पार्टीबरोबर मुंबईस निघून गेले. हा त्यांचा गुन्हा अक्षम्य होता , म्हणूनच त्यांना नोकरीतून डिसमिस्स करण्यात आले आहे, असे त्यांच्या ऑफिसर ने त्यांना कळविले. त्यास त्यांनी उत्तर दिले कि मी नोकरी एवढ्यासाठी करतो कि मला कौटुंबिक जबाबदारी सांभाळता यावी. पण जेव्हा नोकरी माझ्या ह्या हेतूला विघातक होत आहे , तेव्हा हि नोकरी गेली तरी बेहत्तर , पण मी मुंबईस लग्न पार पाडण्याकरिता जाणारच. आणि थोड्या दिवसात लग्न कार्य व्यवस्थित पूर्ण करून डॉ संत पुन्हा नोकरीवर रुजू झाले.
      आल्यावर त्यांनी, इन्स्पेक्टर जनरल ऑफ सिव्हिल हॉस्पिटलकडे अपील केले व या नागपूरच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आपला निकाल डॉ संतांच्या बाजूने देऊन, सिव्हिल सर्जन बिलासपूर ला दोष दिला. त्यानंतर डॉ संत ने दोन वर्षे आणखी नोकरी केली व मग सन १९२४ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन आपला स्वतःचा दवाखाना काढून खाजगी प्रॅक्टिस करण्यास प्रारंभ केला.

(क्रमशः)

No comments:

Post a Comment