Tuesday 6 September 2016

बदल !! .... भाग २ .....

      ४० वर्षांपूर्वी आमच्या नाशिकच्या महात्मा गांधी रोड वर दुतर्फा झाडी होती , इतकी कि सूर्य किरण सुद्धा क्वचितच पडायचे त्या रस्त्यांवर. कालांतराने मात्र त्याच ठिकाणी संपूर्ण concrete जंगल झालय. आज प्रत्येक गावात शहरात आपण हीच परिस्थिती बघत आहोत. मानव शहाणा झाला आणि त्याची उत्पत्ती वाढत गेली , त्याच प्रमाणे त्याच्या गरजा वाढत आहेत आणि त्यासाठी - त्या पूर्ण करण्यासाठी त्याने निसर्गावर घाव घालायला सुरुवात केली. मुंबई सारख्या शहरांमध्ये नदी किनार्यांवर भर घालून वस्त्या उभ्या राहिल्या आणि त्याचीच आज छोटी छोटी उपनगर झालीत.

      मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी , माणूस विविध उपाय शोधत गेला आणि त्यातूनच उद्योग धंदे उदयास येऊन छोट्या मोठ्या कारखान्यांची उभारणी झाली. कारखान्यातला विषारी धूर आकाशात आणि सांडपाणी जवळच्याच नदी नाल्यात सोडले गेल्यामुळे - पाण्यातील  (समुद्री) प्राण्यांचा जीव धोक्यात आला  शिवाय कारखाने आणि इमारती वाढल्यामुळे आपोआपच पर्यावरणाचा तोल ढासळत गेला आणि निसर्गाचा कोप वाढतीस लागला. कारखाने व इमारती बांधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील झाडांचे कत्तल करण्यात आले. विषारी धुरामुळे आणि झाडांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वन्य जीवाचे प्राण धोक्यात आले. पक्षी प्राण्यांच्या अनेक जाती आज लुप्त झाल्यात नामशेष झाल्या आहेत - केवळ आणि केवळ मानवाच्या प्रगती पायी.

      गावातला माणूस शिकून नौकरी निम्मिताने शहरांकडे वळू लागला. शेतीकडे पाठ फिरवू लागला कारण शेतमालाला हवा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला . ज्यामुळे बळीराजाची नवी पिढी शहरांकडे धाव घेते आहे. त्यामुळे त्याचे income वाढत गेले तश्या गरजा हि वाढल्या. सगळ्याच एकमेकांना पूरक अश्या गरजा हातात हात घालून माणसासमोर उभ्या राहिल्या.  

      कुटुंब वाढल्यामुळे छोटी घर लहान पडू लागली आणि त्यासाठी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. माणसाचे status आजच्या काळात महत्वाचे ठरू लागले आणि हेसुद्धा एक कारण बनले - एकत्रकूटुंब पद्धतींना तडा जाण्यासाठी व आता तर "छोटी कुटुंबे -घरे मोठ्ठी " असे समीकरण झाले. (अपवाद )

      शाळांमध्ये पाटीची जागा अवजड दप्तरांनी घेतली नि बालक वर्ग नवनवीन स्पर्धांत उतरून अवकाश गाठू लागला, मात्र पालकवर्गाच्या सुप्त इच्छेची जागा क्वचित न पेलवणाऱ्या आकांक्षानी घेतली आणि कोवळया वयातच लहान मुले शाळेत जाऊ लागली. (अपवाद)

      पुस्तक वाचनाची आवड आता संगणकाने घेतली आणि शाळा कॉलेजचे प्रोजेक्ट्स / गृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी पूर्णपणे संगणकावर दिसू लागले. वेळ कमी व अभ्यास जास्तं - ह्यामुळे मोकळ्या हवेत बाहेर पडणे जणू बंदच झाले आणि मैदाने ओस पडू लागली. अवेळी खाण्याच्या सवयींमुळे आपोआपच शरीरावर नकारात्मक परिणाम पडू लागला. छोट्या घरांमध्ये पालक घरात नसल्यामुळे जेवणाचे हाल होऊ लागले , बाहेरील खाणे वाढून त्यामुळे साहजिकच शरीर आणि मनांवर परिणाम होऊ लागले. (अपवाद)

      पूर्वी एखाद्या घरी पंखा किंवा फोन असला तरी ते घर - समृद्ध समजले जाई. मात्र आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे कि बहुतेक ठिकाणी म्हणजे ऑफीस किंवा घरीसुद्धा पंख्याची जागा air conditioner  ने घेतली आहे आणि दूरध्वनीची जागा मोबाईल फोन ने घेतली. स्वहस्ते करायच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वस्तू घरात आल्या आणि घरातील स्त्रीसाठी मोठ्ठी मदत झाली. कारण एकल कुटुंबासाठी असो वा उच्चशिक्षण घेतल्यामुळे - आज स्त्रीदेखील घरच्या वाढत्या खर्चांना सामोरे जाण्यासाठी नोकरी निमित्त बाहेर पडली , ज्यामुळे तिला ह्या नवीन वस्तूंचा खूपच फायदा झाला.

      आधुनिक तंत्रज्ञानामुळे मात्र आपण घरातील सुख समाधान हरवून बसलो.माणूस जास्तच तंत्रज्ञानात गुरफटला गेला आणि एकलकोंडा झाला. कधी काळी इमारतींमधील सतत उघडे राहणारे दरवाजे आता क्वचितच उघडतात. आपल्या शेजारी कोण राहत , हे देखील आता कळत नाहीये किंवा आपण त्यात रस घेत नाही आहोत. "मी बरा आणि माझे काम -माझे घरकुल बरे" अशी परिस्थिती आज पाहतोय आपण, इतरांशी संवाद कमी झाला. कोत्या मनाचे झालोत आपण. प्रत्येकाकडे किंवा स्वत:च्या जीवनाकडे पाहण्याची नजर आज बदलली आहे !!

      तसेच काळानुसार व मागणीनुसार वाहतुकी मध्ये सुद्धा अनेक बदल झाले.आधी फक्त सायकल असणे म्हणजे श्रीमंताचे लक्षण मानले जाई  मोठमोठे वकील ,प्राध्यापक ,डॉक्टरसुद्धा कमीपणा न वाटता सायकल वापरत. हळूहळू  चारचाकी वाहने आली आणि माणसाने आज आकाश जमीन आणि पाण्यावर चालणार्या वाहनांचा शोध लावला . ज्यामुळे आज केवळ माणूसच नाही तर त्याच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक वस्तू ह्या तिन्ही मार्गांवरून थेट त्याच्या घरी पोहोचत आहेत .

     काळानुसार मानवाची विचारधारा बदलत गेली आणि समृद्ध देश करण्याच्या हेतू ने राजकीय पक्षांची रेलचेल सुरु झाली. राजकारणाच्या नावाखाली एकमेकांवर कुरघोडीची सुरुवात झाली. मात्र ह्यात सामान्य मानव भरडला जाऊ लागला. श्रीमंत अधिक श्रीमंत होऊ लागले आणि गरीब मात्र आणखीनच तळाला जाऊ लागला.
      शास्त्र व तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर प्रगती करू लागले आणि माणूस मात्र माणुसकी हरवून बसला.
पूर्वीच्या काळी , म्हणजे अगदी १९९० पर्यंतच्या पिढीत मोठ्यांबद्दल धाक होता. आपल्या वयापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आदर होता, माणूस माणसाला समजून घेई, लोकं मोठ्या मनाचे होते.

      आज मात्र खरच सग्गळच बदललंय !! बदल - परिवर्तन पाहिजेच आहे - मात्र माणसाला माणसापासून तोडणारे परिवर्तन काय कामाचे हो !!??!!

समाप्त 

No comments:

Post a Comment