Saturday 17 September 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग २ ...

.....प्रस्तावना 

लेखक - दि.या. मार्डीकर 

      विश्वरूप परमात्म्याच्या कृपे करून आणि पूर्वसंचित व प्रारब्ध चांगले होते म्हणून माझा जन्म , योगीराज श्री बाबाजी महाराज माझे पितामह आणि पूर्वज श्री श्रीधरस्वामी यांच्या पुण्यशील नावाजलेल्या थोर घराण्यात या शतकाच्या आरम्भापुर्वी दोन महिने आधी रायगड संस्थानात झाला. माझे वडील श्री यादवराव मार्डीकर त्यावेळी या संस्थानाच्या दिवाण पदावर होते. माझ्या मातोश्रींचे नाव सौ राधिकाबाई होते. माझे आईवडील आचरणाने अत्यंत पवित्र, वर्तनाने धार्मिक , हृदयाने प्रेमळ तसेच दानशील उदार व सत्यप्रिय होते. वडील कर्मठ किंवा जातीपन्थाभिमानी नव्हते, कदापि कोणालाही ते कधीही अश्या वृत्तीत आढळले नाही. एकंदर आम्ही सहा भाऊ व पाच बहिणी असे आमचे मोठे कुटुंब होते. ह्यात मी आठवा होतो. वडील सेवानिवृत्त होऊन यांच्याकडे रहात असत. त्यावेळी मी हिस्लोप कॉलेज मध्ये विद्यार्थी होतो.
   
      मे १९२२ मध्ये माझं विवाह पूजनीय डॉ पी.एच. संत यांचे मामा कै.श्री वामनराव सुदुम्बरेकर यांच्या कन्येशी झाला. तिचे माहेरचे नाव सीता व सासरचे नाव सौ चंद्रिकाबाई आहे. हि गोष्टदेखील सद्गुरू प्रसादानेच घडून आली. मी व्यवसायानिमित्त नागपूर येथे राहत असे. १९४७ मध्ये मला सद्गुरुप्राप्ती होऊन प्रत्यक्ष आणि यथार्थ दर्शनाचा अलभ्य लाभ झाला व नंतर हळूहळू सद्गुरुकृपेने विज्ञानारूढ स्थिती प्राप्त झाली. माझे सद्गुरुस्थान म्हणजे परमपूजनीय डॉ सर्वांगानंद चैतन्य उपाख्य डॉ पी.एच.संत हे आहेत.
   
      अध्यात्म विज्ञान प्राप्ती नंतर अनेक प्रकारच्या भौतिक आपत्तीतून आम्हा उभायान्तांना आपला जीवन मार्ग क्रमवा लागला, हे सर्व विज्ञानी जन जाणतात. विशेष उल्लेख त्यांचा इथे करण्याची जरुरी भासत नाही. संत कवी श्री कबीरदासच्या खालील उक्तीनुसार आमचे रक्षण पालन व पोषण होत गेले....
दोहा :-         जाको राखे साईया मारन सीक है कोय l
                    बाल न बांका कर सके, जो जग बैरी होय ll
   
      हे सर्व सद्गुरूच्या कृपेचेच फळ आहे, असे आम्ही समजतो. परंतु ह्या सर्व जीवनात एक महान घात झाला. - म्हणजे आमचा एकुलता एक तरुण मुलगा १९५८ च्या एप्रिल मध्ये एकेकी दिवंगत झाला. पुत्राशोकाचे हे तीव्र दु:ख आता निवळले असले , तरी पण त्याची स्मृती कधी कधी असह्य होते. आम्ही उभयता विश्वरूप परमात्म्याची परम भक्तीने सर्वत्र यथाशक्ती यथामती सेवा करीत असतांना ही दुर्घटना आमच्या जीवनात का व्हावी , ही एक आधिभौतिक गूढ समस्या आहे. ती आम्हास कळली नाही.        असो.

      या प्रकारे भौतिकतेला न जुमानता आम्ही उभयतांनी १९४७ पासून ते आज पावतो अविरल भक्तीने नवं अवतार श्री भगवान मायानंद चैतन्य यांच्या गीता प्रणीत 'दिव्यदृष्टी ' सिद्धांताचा प्रचार व प्रसार करण्यात आपल्या जीवनातील उर्वरित काळ घालवीत आहोत. आम्हा उभयताचा वृद्धापकाळ आता जवळ आला आहे. पुढे काय होईल व जीवन प्रवाह पुढे कसा वाहू लागेल - ह्याचा काहीएक विचार न करता , सद्गुरूच्या प्रियत्वच्या आधाराने व सहाय्याने विश्वसेवा व्रत करीत आहोत व तशी काही वेळ आलीच तर विश्वर्पण होऊन ह्या महान व्रताची पूर्ती करू. परंतु आमचा मार्ग जरी कठीण असला तरी तो सद्गुरू कृपेने आमच्या अंतिम दशेपर्यंत सरळ होत जाईल , अशी आमची खात्री आहे.

      सद्गुरूच्या कृपेने १९५० नंतर अनेक ग्रंथ व कविता लिहिण्यात आल्या , त्याची यादी थोडक्यात खाली दिली आहे :-
१) इंग्रजी दिव्य दृष्टी  ( Divine Vision )
२) गीतायण (हिंदी )
३) गीत चंद्रिका
४) गीत मधु
५) गीत मालती
६) स्फुट काव्य
७) बुद्ध अवतार चरित्र
८) पुनर्जन्म मिमांसा
९) योग कसा करावा
१०) बुद्धीचे श्लोक
११) सुदर्शन (मराठी विज्ञानी नाटक )
१२) दासबोधातील वस्तू दर्शन
१३) विज्ञान गीता ( हिंदी संशोधीत )
१४) मधु स्मृती काव्य
१५) प्रतिमा पूजन
हिंदी, इंग्रजी व मराठीतून अनेक पुस्तके व लेख इत्यादी लिहिण्यात आले.

      हे कार्य होत असतांना , एके दिवशी असा भास निर्माण झाला की , आपल्या ह्या लेखन कार्यात काहीतरी फार मोठी उणीव आहे. हि उणीव धुंडाळण्याचा प्रयत्न करीत असतांना ता १८.०७.१९६८ ला रात्री एक कल्पना हृदयात उसळली , कि सद्गुरू चरित्रामृत आपल्या लेखणीतून उमटले पाहिजे. १९.०७.१९६७ ला हे मनोगत मी प्रथमतः सौ चंद्रिकाबाई यांस कळविले , त्यांनीही कुठलीच हरकत न घेता मला सांगितले कि, "सद्गुरू डॉ पुं.ह.संत यांचे संक्षिप्त जीवन चरित्र तुमच्या हस्ते अवश्य लिहिल्या गेले पाहिजे." संध्याकाळी आम्ही उभयता शंकरनगर येथे डॉ. संतांच्या बंगल्यावर गेलो आणि त्यांच्यासमोर विचार मांडून त्यांना नमस्कार केला. त्यांचे व माझे हृदय प्रेमाने भरून आले. आन्दाश्रू वाहू लागले व त्यांनी माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेऊन, चरित्र लिहिण्याची अनुमती फार आढेवेढे घेऊन माझ्या हट्टामुळे नाईलाजाने दिली.



भगवान मायानंद चैतन्य नवं बुद्धावताराचा चरित्रलेखक - मी व परमपूजनीय सद्गुरू श्री स्वामी सिद्धाचार्य सर्वांगानंद चैतन्य उपाख्य श्री डॉ. पुं.ह.संत , ह्यांचा जीवन चरित्र लेखक बनण्याची पाळी माझ्यावरच आली. हेच आमचे उभयतांचे सौभाग्य मी समजतो. माझे चरित्र लेखन साहित्याच्या दृष्टीने कसेही असो, - ते साहित्यिकांनी पहात बसावे, मला त्याचे काहीच नाही, व साहित्य किंवा लेखन कलेशी माझं दांडगा परिचय नाही, साहित्य व लेखन माझे व्यासंग नाहीत. माझ्या लेखनकार्यात माझी सर्व भिस्त माझ्या परमदयाळू सद्गुरू माउलीच्या कृपेवरच आधारित असते. तेच लिहित असतात व त्यांनीच हे चरित्र लिहिले, असेच मी समजतो आणि आपल्या , माझ्यावरच्या निस्सीमकृपेमुळेच व प्रेमामुळे मला जीवनचरित्र लेखक उपाधी दिली, मी ते मोठ्या प्रेमाने सद्गुरुपायी आदराने लवलीन होऊन ग्रहण करीत आहे.

      सद्गुरूच्या आदेशाप्रमाणे , हे जीवनचरित्र अगदी साध्या मराठी भाषेतून लिहिण्यात आले आहे , कारण निरर्थक प्रशंसा , चमत्कारिक भाव , उदंड श्रद्धेचा देखावा , अलंकारिक परिभाषिक विश्लेषण , भावनांचा उमाळ , भरीव व बोजड शब्द, इ त्यांना पसंत नाही. ज्याप्रमाणे ते, प्रेमळ, रसाळ , साधेसुधे, उदार व कृपाशील आहेत , तितकेच त्यांचे चरित्रही साध्या शब्दयोगाने लिहिण्यात आले आहे. त्यांचे जीवन साधेपण व प्रेम ह्यांचा आदर्शच असल्यामुळे , ते साध्याच भाषेत प्रकट झाले आहे.

      परमपूजनीय सिद्धाचार्य श्री सर्वांगानंद चैतन्य , माजी संचालक , ओंकारेश्वर , जिल्हा निमाड, यांचे जीवनचरित्र लिहिण्याची सर्व सामुग्री , माझ्या विनंतीनुसार त्यांच्याचकडून मला प्राप्त झाली. याबद्दल मी सद्गुरूंचा ऋणी आहे. तसेच पूजनीय श्री प्रकाशानंद चैतन्य यांनी प्रास्ताविक लेख लिहून चरित्र , प्रकाशमय केल्याबद्दल त्यांचे मी हृदय्पुर्वक आभार मानतो. तसेच चरित्र छापण्यासाठी ज्या सज्जनांनी आर्थिक सहाय्य दिलेले आहे , त्यांचे उपकार आमच्यावर अनंत आहेत. ते फेडणे अशक्य असल्यामुळे , त्यांना मी सद्भावनेने नमन करतो.

      "मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान" या काव्य सिद्धांता प्रमाणे , वाचकांनी हे सद्गुरुचारित्र बोधामृत प्राशन करावे व ज्या उणीवा भासतील , त्याबद्दल क्षमतेची भावना मनात ठेवावी हि विनंती.

नागपूर                                                                                                                                 
१९६८                                                                                                                                          
(क्रमशः ) 
  
                      

No comments:

Post a Comment