Monday 12 September 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १ ...

      मूल जन्माला आले आणि थोड्याच दिवसात त्याच्याकडून काहीही चांगल किंवा वाईट काम झाले कि, आपण नेहेमीच " बाळाचे पाय पाळण्यात दिसतात " हे वाक्य हमखास ऐकतो.

      माझ्या बाबतीत मी स्वतःला खरच भाग्यवान समजते कि नक्कीच कुठल्यातरी जन्माचे पुण्य आहे , ज्यामुळे मी श्री प्रकाश आणि सौ विशाखा जोशी च्या पोटी जन्म घेऊन श्री यशवंत आणि सौ सुनीला संत ह्यांच्या घरी त्यांचे धाकटे चिरंजीव राहुल ह्यांच्याशी लग्न करून आले. लहानपण माझं तस इतरांप्रमाणे चांगलेच होते. घरातली एकुलती एक मुलगी आणि लहान दोन भावंड आणि माझ्या पप्पांची मूळ घरापासून वेगळ्या शहरात नोकरीमुळे आमच छोटास कुटुंब. फक्त उन्हाळ्यात शाळेला सुट्टी मिळाली कि पुण्याला जायचे - म्हणजे पप्पांचे घर आणि काकाचे घर इतकीच माझी दुनिया !! माझे दादा ताई आणि इतर सग्गळी भावंडं हेच माझे जग !! घरी आलो कि मित्रमैत्रिणी फार नाही , पण ज्या होत्या त्यांच्यातच स्वतःला विसरून जायचे. घरी आई कायम देवाची पुस्तक वाचायची आणि मी स्वतः वाचायला शिकले , तेव्हा आईने सांगितल म्हणून , आवडीने ती देवाची पुस्तके वाचत होते. समजायचे काहीच नाही तर त्याची श्रेष्ठता कळणार कुठून ? सासरी आल्यावर , इकडेसुद्धा सासूबाई सर्वच सणवार करायच्या . जस आईकडे पाहिल तसच इकडेपण , त्या सांगत आणि घरातली परंपरा म्हणून देवावर विश्वास ठेवत होते इतकच.

     मात्र २००७ हे माझ्या वैयक्तिक आयुष्याला वळण देणारे वर्ष ठरले !! डॉक्टर अनिरुध्द (बापू ) धैर्यधर जोशी ह्यांच्या कडे आकर्षित झालो आणि खरोखर जीवन जगणे म्हणजे काय हे शिकायला लागले !! त्यामुळे अध्यात्मिक गोडी वाढीस लागली आणि बघता बघता मी बापुमय केव्हा होऊन गेले समजलच नाही. "आपल्या पूर्वसंचिता मुळे आपल्या ह्या जीवनात म्हणजेच मानवी जीवनात अनेक सुख-दु:ख , संकट छोट्या मोठ्या प्रमाणावर अचानक येऊन धडकतात आणि अर्थातच त्यातून आपल अख्खं अस्तित्व पणाला लागतं.मात्र एक चांगली गोष्टसुद्धा घडते, कि आपण ह्या दरम्यान आजूबाजूचे  व्यक्तीमत्व शिकायला लागतो. आणि जर आपल नशीब खरोखर बलवान असेल आणि आपण सद्गुरू चरणी लीन असू तर मात्र ह्या सर्व गोष्टी घडतातच , पण आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही. फक्त संकट पेलायची जेवढी आपली स्वतःची ताकत असते , तेवढयाच वजनाचे संकट आपल्यावर येते आणि तरीसुद्धा आपण सहज हसत खेळत त्यातून निघून जातो. आणि संकट येऊ नये म्हणून मी स्वतः कसे जगायचे आहे ह्याची शिकवण मला माझे सद्गुरू वारंवार देत राहतात."

      वाचनाची आवड होतीच पण आता मात्र , हळूहळू मी अध्यात्मिक वाचन करायला सुरुवात केली आणि अचानक एके दिवशी माझ्या आईंनी त्यांच्या सासर्यांची - म्हणजे , माझ्या आजे सासर्यांची काही अध्यात्मिक पुस्तके वाचायला दिली. माझे आजे सासरे - डॉ. पुंडलिक हरी संत ह्यांच्यावर आचार्य दिनकरराव यादवराव मार्डीकर ह्यांनी माझे आजे सासरे ह्यांच्यावर सद्गुरू चरित्र लिहिलं. डॉ. पुंडलिक हरी संत म्हणजे नक्की कोण आणि ते सद्गुरू कसे झाले हेच आपण पुढे पाहणार आहोत.

      आणि तेच आज मी इथे लिहिणार आहे जे आचार्य दि.या.मार्डीकरांनी लिहून ठेवलय. शब्दशः तेच आहे फक्त ह्या ब्लॉगद्वारे आपण सगळेच वाचणार आहोत. माझ्यासाठी तर हा एक अनमोल ठेवा मिळालाय - कारण सुख फक्त पैशातच नसत हो  - जरी आज पैशावरच दुनिया चालते आहे. म्हणजे पैसा असेल तरच तुम्हाला मान सन्मान आहे नाहीतर तुमचे अस्तित्व कवडीमोलाचे सुद्धा राहत नाही. पण आज मी ठणकावून सांगू शकते कि , "हो, माझे कुटुंब म्हणजे - आम्ही दोघ आणि आमची २ मुलं नक्कीच भाग्यवान आहोत , कारण आमच्या पाठीशीच नाही , तर चहु बाजूंनी आमच्या सद्गुरूचे हस्त आमच्या भोवती श्वासागणिक आहेतच. आणि म्हणूनच आम्ही सुखी समाधानी जीवन जगतोय." त्यामुळे जेव्हा मी हे उदार कल्पतरू वाचले तेव्हा सर्वच श्रद्धावानांना ह्याचा लाभ व्हावा म्हणून ह्या डीजिटल डायरिमार्फत लिहायला सुरु करते आहे.

      अर्थातच ह्याची प्रेरणा मला माझ्या सद्गुरूचीच आहे हे मी मनोमन मानतेच . कारण येवढ सग्गळ करून घेणारे फक्त तेच आहेत.
" मी तो केवळ निमित्तमात्र, करता करविता माझे सद्गुरू च. म्हणूनच हे सर्व त्यांच्या चरणी अर्पण करते आहे."

      आता ह्यापुढे आपण आचार्य दि या मार्डीकरांनी स्वतः लिहिलेले - "उदार कल्पतरू अर्थात सद्गुरुचारित्र" वाचणार आहोत, वेगवेगळ्या भागांमध्ये ......

(क्रमश:)

1 comment:

  1. छान, पुढील भागाची उत्सुकता आहे.

    ReplyDelete