Sunday 19 June 2016

नाशिकची बुलेट राणी !! - कल्याणी जोशी

श्री ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई फुले ह्यांचे "प्रत्येक मुलगी शिकलीच पाहिजे " हे स्वप्न अतिशय कष्टाने व खडतर वाट चालून पूर्ण झाले. आणि त्यांच्यामुळेच, आजची स्त्री , फक्त "चूल व मूल" ह्यात न अडकता वेगवेगळ्या क्षेत्रातून पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सक्षमपणे उभी आहे .

"प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा वाटा अस्तोसच" , असे म्हंटले जाते . मात्र यशस्वी होण्यास प्रत्येक स्त्रीला घरच्यांची साथ मिळणे फारच गरजेचे व महत्वाचे !! लग्नानंतर सासू -सासरे व पती आणि मुलं,  ह्यांचा सतत पाठींबा मिळणे का फारच महत्वाचे असते - ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे - नाशिकच्या सौ. कल्याणी विश्वास जोशी (पूर्वीची कल्याणी सौदाणकर  )

कल्याणी मुळची नाशिकची . सारडा कन्या विद्यालय व बी वाय के कॉलेज ची विद्यार्थिनी . पती - श्री विश्वास जोशी ह्यांची स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बदलीची नौकरी , सासू-सासरे नाशिक मध्ये स्थायिक , मुलाचे संगोपन व शिक्षण अशी तारेवरची कसरत करत , कल्याणी टी.व्ही , रेडीओ, Documentary Films आणि News Channels वर Voice Overचे सुद्धा काम करते; ह्याशिवाय सहज सोप्या भाषेत कविता व शायरी सुद्धा !!

एकदा नाशिकला त्यांच्या घरी , त्यांचे एक मित्र Bullet वर त्यांना भेटायला आले असता , कल्याणीला त्या वाहनाने आकर्षित करून मोहात पाडले आणि त्यांची परवानगी घेऊन कल्याणी गाडीशी खेळू लागली आणि तिचे हे Bullet प्रेम विश्वासरावांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही!!

सध्या श्री व सौ जोशी मुंबईत स्थायिक आहेत. इथेच Road Bullet Stallions,विले पार्ले ह्या Groupशी कल्याणीची ओळख झाली. Bulletने कल्याणीला आकर्षित केले व तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या प्रेमाला - ROYAL ENFIELD ची THUNDERBIRD 350 cc ही Bullet घेऊन श्री विश्वासरावनी जणू पावतीच दिली !! आणि अशा रीतीने सुरु झाला नाशिकच्या बुलेट राणीचा नवा प्रवास !!

नाशिक शहरातले रस्ते, आसपासचे घाट - त्यातील अवघड वळणे, चढ-उतार , रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांचे प्रकाशझोत आणि त्यात Royal Enfield चे Thunderbird 350 हे अवजड वाहन (१९२ किलोग्राम वजन) !! त्यावर स्वतःचा ताबा , गाडीचा तोल सांभाळत , काही बिघाड झाले असता ते दुरुस्त करणे असे सर्वकाही अवघ्या थोड्याच दिवसात कल्याणी शिकलीसुद्धा !! विना गेअरच्या अनेक गाड्या आणि चारचाकी चालवायची सवय तर आहेच , तरीसुद्धा , ThunderBird 350 ची बातच काही और आहे !
अश्यातच गेल्या वर्षी नाशिकच्या Bullet Queens कार्यक्रमात सहभाग घेऊन कल्याणीचा आत्मविश्वास वाढला आणि थोड्याच दिवसात Royal Enfield तर्फे Riders Mania चा Goa येथे दरवर्षी होणार्या सोहोळ्यात भाग घेण्याची सुवर्णसंधी चालून आली. २१-२३ नोव्हेंबर २०१५ , Vagator Beach, Goa येथे हा सोहोळा होता. त्यात भारतात्तून तब्बल ३००० Bulletiers सामील झाले . Road Bullet Stallions , मुंबईतून ४५ Bulletiersचा सहभाग होता , ज्यात विले पार्लेमधून १७ सभासद होते. ह्या टीम मध्ये १६ पुरुष व १ महिला होते ; आणि ही एकमेव महिला पटकावणयाचा बहुमान नाशिकच्या कल्याणी जोशीला मिळाला !!

मुंबई - गोवा - मुंबई हा तब्बल १५०० किलोमीटरचा प्रवास १८ नोव्हेंबर ला सकाळी ६ वाजता निघाले व ६५० किलोमीटर एका बाजूचा प्रवास करून १४ तासात गोव्याला पोहोचले!! कल्याणी सांगते कि ह्या प्रवासात फक्त दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठीच विश्रांती घेतली . आणि विशेष म्हणजे ह्या संपूर्ण प्रवासात तिच्या सहकाऱ्यांनी खूपच छान साथ दिली . कल्याणीच्याच शब्दात, " ह्या पूर्ण प्रवासात एक  Bullet Rider म्हणूनच मला गणले गेले. ह्यात स्त्री पुरुष असा भेदभाव नसतोच"
विशेष म्हणजे कल्याणी ने ह्या मोहिमेची सुरुवात आपल्या नाशिकच्या घरापासून केली. म्हणजेच नाशिक - मुंबई-गोवा - मुंबई - नाशिक असा पल्ला यशस्वीरीत्या पार पाडला.

गोव्याला जातांना चिपळूण मार्गे आणि परतीचा प्रवास सातारा, Ambeghat, पुणे असा होता. तिच्याच शब्दात ..... " गोव्याला जाताना सहयाद्रीचा घाट लागला आणि आजूबाजूला घनदाट जंगल!! जंगलातून प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आणि ती ही चक्क बुलेट वर !! इथे बिबटे असतात जे वाहनांच्या प्रकाश्झोतामागे ५५ किलोमीटर ताशीच्या वेगाने पाठलाग करतात असे ऐकले होते. नशीब कुठेही बिबटे महाराज आडवे आले नाहीत!! " असे खळखळून हसत सांगते . "आम्ही जंगलात शिरलो आणि १० किलोमीटर आत गेल्यावर आपण रस्ता चुकलो आहोत असे लक्षात आले!! तरीसुद्धा हिम्मत न हारता मागे फिरलो आणि मुख्य रस्त्याला लागलो. घाटातला थरारक प्रवास अनेकवेळा एकेरीच होता !! एका बाजूला समोरून येणाऱ्या गाड्या आणि दुसर्या बाजूला खोल दरी अशी परीक्षा होती !
रस्त्यावर अनेक जणांनी टाळ्या वाजवून स्वागत केले व एक बाई बुलेट चालावात्ये आहे हे पाहून त्यांच्या चेहेर्यांवर आश्चर्यमिश्रीत भाव होते !! असेच एका सिग्नल वर थांबलेलो असता , एक चिमुरडा जवळ आला आणि , "ह्ये चालवताय तर ह्ये सुद्धा चालवा कि......" असे म्हणत आधी माझ्या बुलेटकडे नंतर हातातल्या विमानाकडे बोट दाखवून निरागसतेने म्हणाला. त्याचा भोळा भाव पाहून हसू आले.

गोव्यात पोहोचल्यावर आम्ही एका ठिकाणी जरा थांबलो. मी माझ्या सहकाऱ्यांना सहज विचारले कि अजून किती वेळ आहे गोव्याला पोहोचायला ? " कल्याणीजी आपण गोव्यातच आहोत आत्ता " हे ऐकल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण गोवा बघायची ही माझी अगदी पहिलीच वेळ होती आणि तीही मी माझ्या बुलेटवर आले !! बुलेटचा पहिला लांबचा प्रवास आणि माझीदेखील गोवाची पहिली भेट !! तो आनंद .... ते क्षण .... अवर्णनीय आहेत.!! शब्दच नाहीत तो आनंद सांगायला !! आणि त्यातही सुखद धक्का म्हणजे  - माझ्या ह्या आनंदाला द्विगुणीत केले माझ्या पतीनी!! ते स्वतः माझ्या आनंदात सामील होण्यास  तिथे गोव्याला आले !!

मुंबईत पोहोचल्यावर कल्याणी आपल्या टीम ला सोडून नाशिकच्या प्रवासास निघाली आणि तब्बल १३०० किलोमीटरचा मुंबई - गोवा - मुंबई मोहिमेची यशस्वी सांगता , आपल्या स्वगृही पोहोचून निर्विघ्नपणे पार पाडली.
" माझ्या ह्या यशस्वी मोहिमेत माझे पती व मुलगा ह्यांची पाहिल्यापासुनची साथ, मित्र मैत्रिणींचा उत्स्फूर्त पाठींबा आणि घरच्या सर्व मोठ्यांचा आशीर्वाद आहे ," असे कल्याणी आवर्जून सांगते.

कल्याणी जोशी ने नाशिक - मुंबई - गोवा - मुंबई - नाशिक हा थरारक व खडतर प्रवास Royal Enfield च्या Thunderbird 350 cc ह्या बुलेटवरून यशस्वीरीत्या निर्विघ्न पार पाडला आहे आणि म्हणूनच ती खर्या अर्थाने " नाशिक ची Bullet Queen ठरली आहे . शिवाय  नाशिकला मानाचे स्थान मिळवून दिले आहे. अश्या प्रकारची मोहीम फत्ते करणारी नाशिक बुलेट राणी हा खिताब मिळवणारी कल्याणी , पहिली महिला ठरली आहे ." 

No comments:

Post a Comment