Tuesday, 18 July 2017

.........दिव्याला पाहून नमस्कार !!

" चला रे बाळांनो दिवे लागण्याची वेळ झाली. हातपाय धुवून शुभंकरोती म्हणायला या रे ..... " हा ओळखीचा आवाज कानी पडला आणि आजही इतक्या प्रेमाने एखाद्या घरात आपली जुनी परंपरा जपली जात आहे , हे पाहून मनोमन त्या घरातल्या मंडळींना धन्यवाद दिले.

" शुभंकरोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा , शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते !
दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार , दिव्याला पाहून नमस्कार !
दिवा जळो सारी रात्र,  घरातली पीडा बाहेर जावो , बाहेरची लक्ष्मी घरात येवो.
घरच्या धन्याला उदंड उदंड आयुष्य मिळो. !
दिवा लावला देवापाशी , उजेड त्याचा तुळशीपाशी,
अन माझा नमस्कार सर्व देवांपाशी !!" 
आणि अंधार पडू लागला तसे सगळीकडे दिवे लागायला लागले आणि हळूहळू सर्व आसमंत जणू दिव्यांनी भारून गेला. !!

आणि तितक्यात , दुसऱ्या घरातून आवाज आला .." चला चिरंजीव दाखवा तुमचे प्रगतीपुस्तक. पाहू तरी द्या काय दिवे लावलेत ते !!

हि झाली दिव्याची गोष्ट !

आजचा आपला विषय ह्या "दिव्यांच्याच " भोवती फिरणारा आहे.

वरील वाक्यात एका आईचे तिच्या लेकरांना बोलावणे आहे कि आता बाहेरील कामे बंद करा आणि घरात या. संध्याकाळची वेळ आहे तर लक्ष्मी घरात यायची वेळ झाली आहे, ह्या दीपोत्सवाची प्रार्थना करूयात सर्वच एकत्र !!
वाह !! दीपोत्सव !!

तेल तुपाची वात लावून निरंजन पेटवली कि देव्हाऱ्यासमोर सुंदर प्रकाश पडतो आणि तोच प्रकाश - पवित्र स्पंदनांच्या रूपात पूर्ण घरात फिरतो !! जेवढा वेळ आपण त्या निरंजनात तेल किंवा तूप घालत राहू तेवढा वेळ ती वात पेटलेली राहते - प्रकाश पसरवते.  हाच दीपोत्सव अंधार घालवून प्रकाश पसरवतो!! म्हणजेच अज्ञान मिटून डोळसपणे सभोवताली पाहता येते !!

आपण शाळेत शिकलोय कि दोन दगड एकमेकांवर घासल्याने जाळ होतो आणि तेव्हापासून उजेड पाडण्यासाठी दगडांचा वापर करण्यास सुरुवात झाली. जंगलातील हिंस्त्र प्राण्यांना घाबरवण्यासाठी लाकूड पेटवून त्याची शेकोटी करून ठेवली जात असे. जेणेकरून ह्या हिंस्त्र श्वापदांपासून मानवाचा बचाव होत असे. त्यानंतर हळूहळू प्रगती झाली आणि विजेचा शोध लागला आणि दिव्यांचे असंख्य प्रकार उदयास आले!! जसे - पणती, निरंजन, समई, मेणबत्ति, ट्यूबलाइट, बल्ब, दिव्यांची माळ, आकाशकंदील!! आणि शिवाय विजेवर चालणारी असंख्य उपकरणे आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत - जसे - कॉम्प्युटर , मोबाईल, मिक्सर, टीव्ही, फ्रिज, पंखे, वॉशिंग मशीन, वजन काटे,वेगवेगळ्या आकारांचे / प्रकारांचे दिवे, पाणी गरम करण्यासाठी हीटर, कारखान्यातील विविध प्रकारची मशीन, दवाखान्यातील, शेतातील विविध उपकरणे, रेल्वे / विमान प्रवास, - एक ना अनेक !! आज ह्यातील एक जरी अचानक बंद पडली , तरी आपला जीव कासावीस होतो ना !!
थोडा वेळ जरी वीज गेली, तरी आपण अस्वस्थ होतो आणि जोपर्यंत वीज येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवात जीव येतच नाही.

पण - एक गोष्ट लक्षात आली आहे का आतातरी आपल्या ? की हे सर्वच विजेचे प्रकार काही काळपुरतेच मर्यादित आहेत.
कायमचे म्हणजे - एकदा पेटवले अथवा लावले की कायमचे तसेच लागलेले राहतात अथवा पेटलेले राहतात का !! नाही !!
प्रत्येक दिव्याची एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा संपली की परत दिवा लावावाच लागतो- मग ती पणती असो वा ट्यूबलाईट . आणि शिवाय प्रत्येक दिवा लावण्यासाठी खर्च लागतो तो वेगळाच !! म्हणजे आली का पंचाईत !!

परवा टीव्ही वर एक जाहिरात पाहिली आणि माझ्याच डोक्यात लख्ख प्रकाश पडला !!
एक लहान मुलगा आपल्या वडिलांना सहज म्हणतो कि, " आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला सायकलच चालवावी लागेल". वडील विचारतात , "का रे ?" , अगदी निरागसपणे तो चिमुकला उत्तर देतो कि, " पेट्रोलच जर राहणार नाहीये तोपर्यंत, तर आम्हाला सायकलच परवडेल ना ?"

आपण घरीसुद्धा अनेकवेळा विजेचा गैरवापर करतच असतो. जसे, सतत टीव्ही चे स्वीच, चार्जर चे स्विच, ऑन / चालू ठेवणे!! कोणाला सांगायला गेलं  कि म्हणतात, " अरे, त्यात काय एवढ ? त्याने काही इतक मोठं बिल येत नाही."
आणि हेच मला सांगावेसे वाटते कि, शेवटी "थेंबे थेंबे तळे साचे " हि म्हण सर्वच ठिकाणी योग्य नाही का ? आपण का म्हणून विषाची परीक्षा जाणूनबुजून घ्यायची ?

अनेक कार्यालयांमध्ये तर आजही अनेक वेळा नको असतांनासुद्धा किंवा कोणी जागेवर नसतांनासुद्धा दिवे आणि पंखे चालूच असतात. अनेक वेळा रस्त्यांवरचे दिवेसुद्धा भर दिवसा सुरूच असतात !! हे एक बरं आहे कि आता , रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या प्रत्येक डब्ब्यांमध्ये मोट्ठ्या अक्षरात लक्ष वेधेल अशा ठिकाणी " नको असतांना दिवे आणि पंखे बंद करून ठेवणे " असे लिहून ठेवले आहे.

आणि थोडावेळ मात्र वीज गेली, तर !!!! आपली सर्व उरलेली कामे डोळ्यासमोर येतात आणि टेन्शन घेऊन आपण अतिशय अस्वस्थ होतो ! का ? तिची मर्यादा संपली कि ती संपणारच आहे कि.
कुठलीही मानवनिर्मित गोष्ट अमर्यादित काळासाठी निर्मित नाहीच.

म्हणजेच काय , आज जर आपण ह्या सर्व मानवनिर्मित वस्तूंची व्यवस्थित काळजी घेतली नाही , त्याचा जपून वापर केला नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेऊन जाणार आहोत ?

तोच नियम जर आपण "घरगुती वीज" च्या वापराबद्दल लागू केला ,  तर आपल्या पुढच्या पिढींना मेणबत्तीचाच वापर करावा लागेल , नाही का ?

आता हेच बघा ना, वेगवेगळ्या सणांचे दिवस येत आहेत. दुकानदार ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी आपापल्या दुकानात भरपूर रोषणाई करतात. गैर काहीच नाहीये त्यात. पण ह्याला काहीतरी मर्यादा पाहिजे.
गणेशोत्सवात प्रत्येक चौकात वेगवेगळी मंडळे आपापले स्वतंत्र उत्सव साजरे करतात आणि ह्यात विदयुत रोषणाईचा अमर्याद वापर होतो - लॉउडस्पिकरवर सतत गाणी चालू असतात, वेगवेगळे देखावे - त्यासाठी रोषणाई , मोठमोठ्या बल्बचा वापर (व्हॉल्ट), शिवाय विसर्जनाच्या दिवशीसुद्धा जनरेटर लावून त्यावर मोठ्या आवाजात गाणी लावून नाचणे - ह्या सर्व प्रक्रियेत विजेचा नको इतका वापर होतो आणि खरोखर जिथे विजेची अत्यंत गरज असते त्या खेड्यातल्या मुलांना मात्र कधीच वीज मिळत नाही आणि ते दिवसभर शेतात राबून, रात्री मेणबत्तीच्या उजेडात आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.

इतर वेळेस आपण शहरी माणसे, ह्या गरिबांबद्दल खूप आस्थेने बोलतो गप्पा मारतो , मग जर आपण आपल्या ह्या उत्सवांमधून विजेचा कमीत कमी वापर केला , तर ह्या मानवनिर्मित मर्यादित गोष्टीचा वापर आपल्या पुढच्या पिढ्यासुद्धा जपून वापर करू शकतील आणि जीवनातल्या प्रकाशाचा आनंद घेऊ शकतील, नाही का ?

मागच्या आठवड्यात मी एका मैत्रिणीकडे गेले होते. तर तेव्हा ती एका मोठ्या बॉक्समध्ये मेणबत्त्यांचे बॉक्स आणि त्याबरोबरच काडीपेट्या (मॅच बॉक्स ) पॅक करत होती. मला ते पाहून आश्चर्य वाटले आणि असे अचानक काय झालय कि हि मैत्रीण असे अनेक मेणबत्त्या काडेपेट्यांसहित पॅक करत होती?
म्हणून मी तिला उत्सुकतेने विचारलं , " आज काय खास ग ? कोणाला गिफ्ट करत्येस हे ?"
तिने हसून उत्तर दिले , " अग, गिफ्ट करत्ये पण काही खास अस नाही. मी दर महिन्याला असे मेणबत्त्या आणि काडेपेट्या आमच्या केंद्रात जमा करत असते. ह्या मेणबत्त्या आणि काडेपेट्या गरीब गरजू मुलांना दान करतो , ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे , पण दिवसभर ते शाळेत जाऊ शकत नाहीत. कारण पोट भरण्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांबरोबर शेतात जावे लागते. मग ही मुले रात्रशाळेत जातात आणि रात्री जमेल तसा ह्या मेणबत्त्यांच्या उजेडात अभ्यास करतात. अनेक वर्षांपासून आम्ही ही सेवा करतोय आणि आज अनेक मुलांना ह्याचा फायदा झाला आहे.  ह्याला "विद्या प्रकाश योजना" असे नाव आहे"

                                       

खरोखर किती सुंदर भावना आहे ही !!
"दिव्या दिव्या दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार " असेच ही गावातली मुले म्हणत असतील, नाही का ?

  (समाप्त )